संजय राणे
विरार ।
वसई-विरार महापालिका क्षेत्रात अनधिकृत नळजोडण्या 15 मार्च 2023 पूर्वी संबंधित प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त व प्रभारी सहाय्यक आयुक्तांकडे लेखी अर्ज करून नियमित करून घ्याव्यात, अशा आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केलेल्या आवाहनाला शून्य प्रतिसाद मिळाला आहे. प्रभाग समिती ‘डी’मधून आलेला एकमेव अर्ज वगळता अनधिकृत नळजोडणीधारकांनी आयुक्तांच्या या आवाहनाकडे पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे अर्जाबाबत लेखी अहवाल मुख्यालयात आलेला नसल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात अवैधपणे घेतलेल्या नळजोडण्या 15 मार्च 2023 पूर्वी नियमित न करून घेतल्यास नळजोडणी घेणार्या व्यक्ती, संस्था पदाधिकारी यांच्याविरोधात फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिला होता.
संबंधित प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त व प्रभारी साहाय्यक आयुक्तांकडे लेखी अर्ज करून या नळजोडण्या नियमित करून घेता येणार होत्या. अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी मालमत्ता प्रकारानुसार अनुज्ञेय नळजोडणी आकाराच्या तिप्पट दराने नळजोडणी आकार भरावा लागणार होता.
नळजोडणी घेतल्याच्या संभाव्य दिनांकापासून तिप्पट दराने पाणीपट्टीही वसूल करून घेतली जाणार होती. याव्यतिरिक्त प्रति नळजोडणी शुल्क रुपये 1,500 आणि रस्ता खोदाई फी एक हजार रुपये पालिकेकडून वसूल करण्यात येणार असल्याचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी काढलेल्या नोटिसीत म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र आयुक्तांच्या या आवाहनाकडे अनधिकृत नळजोडणीधारकांनी पाठ फिरवली आहे.
विशेष म्हणजे आयुक्तांनी दिलेली मुदतही उलटून गेल्याने महापालिका आता अनधिकृत नळजोडणीधारकांविरोधात कशी कारवाई करते, याकडे वसई-विरारकरांचे लक्ष लागले आहे.
अनधिकृत नळजोडणीधारकांच्या संरक्षणार्थ राजकीय पक्षांची धाव
अनधिकृत नळजोडणीधारकांच्या संरक्षणार्थ काही राजकीय पक्षांनी धाव घेतली असल्याचे समजते. आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत या पक्षांनी नळजोडणीधारकांऐवजी त्यांना नळजोडणी मिळवून देणार्या तत्कालीन अधिकारी व नगरसेवकांविरोधात कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे याच बैठकीत पालिकेने 1,270 नळजोडण्या अनधिकृत असल्याची माहिती राजकीय पक्षांना दिली आहे. या रहिवाशांनी आधी कुणाला तरी पैसे दिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पुन्हा पैसे घेणे उचित होणार नाही, अशी पाठराखण या राजकीय पक्षांनी अनधिकृत नळजोडणीधारकांची केलेली आहे. पण पालिका मात्र या नळजोडण्या नियमित करून घेण्याच्या मतावर ठाम असल्याचे कळते.
4,945 नळजोडण्या मंजुरीच्या प्रतीक्षेत
वसई-विरार महापालिकेची लोकसंख्या 24 लाखांच्या आसपास आहे. शहरात पाण्याची वाढती मागणी असून, महापालिकेच्या नऊही प्रभागांत एकूण 60,796 नळजोडण्या अस्तित्वात आहेत. यात 59,077 इतक्या रहिवासी, तर 1,719 वाणिज्य/संस्था नळजोडणी आहेत. तसेच 4,945 नळजोडणी मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, त्यासाठी नऊही प्रभागांतून पालिकेला एकूण 2,108 अर्ज प्राप्त झालेले आहेत. मात्र छाननीअंती या नळजोडण्या देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतून देण्यात आलेली आहे.