दिनमान प्रतिनिधी
दिवा|
सातत्याने रूळ ओलांडताना अपघात होत असल्याने दिवा रेल्वे स्थानकाचे नाव अधिक अपघात होणार्या रेल्वे स्थानकांच्या यादीत येत होते. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांनी रेल्वे फाटक ओलांडू नये, यासाठी स्थानकाच्या पूर्व दिशेला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून स्वयंचलित जिना बसविण्यात आला. त्यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडणे बंद झाले असून, गेल्या एक महिन्याच्या कालावधीत येथे एकाही रेल्वे अपघाताची नोंद झालेली नाही. याबद्दल सर्वच स्तरातून आणि विशेषतः प्रवाशांकडून खासदार डॉ. शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.
मध्य रेल्वेवरील स्थानकांमध्ये ठाणे, डोंबिवली या स्थानकांबरोबरच दिवा स्थानक हे कायम गर्दीने गजबजलेल्या स्थानकांपैकी एक आहे. दिवा स्थानकाला शहराच्या पूर्व भागाला जोडणार्या पुलावर केवळ दोनच अरुंद जिने असल्याने तिथे कायम चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होते. यामुळे बहुतेक प्रवासी थेट रेल्वेरूळ ओलांडून प्रवास करतात. त्यामुळे आतापर्यंत अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. २०२२ मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना १७१ प्रवाशांना प्रवाशांनी प्राण गमावले आहेत. २०२३ मध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत ११० प्रवाशांनी दिवा रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातांत आपला जीव गमावला आहे. केवळ जुलैमध्ये २१ प्रवाशांचा दिवा रेल्वे स्थानकात वेगवेगळ्या अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातांचे मुख्य कारण हे रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करणे होते.
दिवा स्थानकात जाण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी अपुरी व्यवस्था असल्याने बहुतेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडण्याचा पर्याय निवडत होते. दिव्यातील ९० टक्के लोकसंख्या पूर्वेला राहत असूनही या दिशेला तिकिट खिडकी नव्हती. खासदार डॉ. श्री कांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी दिवा स्थानकात पूर्वेला पाहिले तिकिट घर उभारल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले होते. त्यानंतर दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवा पूर्वेला सरकता जिना बसविण्याचे काम मार्गी लावले. गेल्या महिन्यात १६ ऑगस्टला या सरकत्या जिन्याचे लोकार्पण प्रवासी संघटना आणि शिवसेनेकडून करण्यात आले. यावेळी मध्य रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल आणि इतर अधिकारीही उपस्थित होते. प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत दिवा रेल्वे फटकाची पाहणी करून सरकत्या जिन्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने रेल्वे फाटक प्रवाशांच्या रहदरीसाठी पूर्णतः बंद करण्याचे निर्देश दिले. १७ ऑगस्ट २०२३ पासून रेल्वे रूळ ओलांडणे पूर्णतः बंद झाल्यामुळे दिवा रेल्वे स्थानकात महिनाभरात रेल्वे रूळ ओलांडताना एकही अपघात झाला नाही. प्रवाशांना सरकत्या जिन्याचा पर्याय मिळाल्याने इतर अरुंद जिन्यांवरील गर्दीही कमी झाली आहे.
दिवा स्थानकात पूर्व व पश्चिम अशा दोन्ही दिशांना चढणारे व उतरणारे असे प्रत्येकी २ सरकते जिने बसवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे गेटकडे जाताच येणार नाही. तरीही एखादा प्रवासी रूळात आल्यास २४ तास रेल्वे पोलिसांची गस्त असून त्याच्यावर कारवाई केली जात आहे.
– डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
आमच्या दिवेकर रेल्वे प्रवाशांचे जीव वाचावे यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे रेल्वे प्रशासनाकडे सूचना मांडत होतो व मागणी करत होतो. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे प्रशासनाकडे पर्याय उपलब्ध झाला. सरकत्या जिन्याची उभारणी झाली आणि प्रशासनाने पुढे फाटक बंदीची चांगली अंमलबजावणी केली. त्याबद्दल खासदार शिंदे व मध्य रेल्वेचे समस्त दिवावासीयांतर्फे आभार.
– अॅड. आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना