दिनमान प्रतिनिधी
बदलापूर|
येथील आस्नोली येथे बारवी नदीत बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. प्रतीक पांडे (२३) असे या तरुणाचे नाव असून, तो कल्याणच्या चक्की नाका परिसरात राहत होता. मंगळवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. प्रतीक त्याच्या ८ मित्र-मैत्रिणींसह संध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास आस्नोली येथील बारवी नदीवर आला होता. ते सर्वजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने प्रतीकसह नेहा तिवारी व अखिल शुला हे बुडू लागले. त्यांचा आरडाओरडा ऐकून या ठिकाणी आलेल्या सिद्धेश पाटील या डोंबिवलीच्या वीस वर्षीय तरुणाने पाण्यात उडी घेतली.
नेहा व अखिल यांना सुखरूप पाण्याबाहेर काढून त्यांचा जीव वाचवण्यात सिद्धेशला यश आले. प्रतीक, नेहा व अखिल यांना पाण्याबाहेर काढून बदलापूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी प्रतीकला तपासून मृत घोषित केले. तर नेहा तिवारी हिला उपचारार्थ उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात असून, ती सुखरूप आहे.
दरम्यान, याप्रकरणी कुळगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भोई यांनी दिली. सुमारे आठवडाभरापूर्वी याच नदीत बुडून बदलापुरात राहणार्या सिद्धेश सावंत (१८) व बाळकृष्ण केदारे (३६) अशा दोघांचा मृत्यू झाला होता.