नवी दिल्ली । भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने एअरथिंग्स मास्टर्स या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करून मोठा विजय मिळवला. काळ्या सोंगट्यांसह खेळणार्या प्रज्ञानंदने सोमवारी सकाळी कार्लसनचा 39 चालींमध्ये पराभव केला. त्यानंतर प्रज्ञानंद कार्लसनचा विजयी रथ रोखला आहे.
या विजयानंतर भारतीय ग्रँडमास्टर आरा प्रज्ञानंदचे आठ गुण झाले असून आठव्या फेरीनंतर तो संयुक्त 12व्या स्थानावर आहे. मागील फेर्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करणार्या कार्लसनवर प्रज्ञानंदचा विजय अनपेक्षित होता. यापूर्वी प्रज्ञानंदने केवळ लेव्ह अरोनियनविरुद्ध विजय नोंदवला होता. याशिवाय प्रज्ञानंदचे दोन सामने अनिर्णित राहिले, तर चार सामन्यांमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. अनिश गिरी आणि क्वांग लिम यांच्याविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला. तर ते एरिक हॅन्सन, डिंग लिरेन, जॅन क्रिझिस्टोफ डुडा आणि शाखरियार मामेदयारोव्ह यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते.
काही महिन्यांपूर्वी नॉर्वेच्या कार्लसनकडून वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या सामन्यात पराभूत झालेला रशियाचा इयान नेपोम्नियाची 19 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांच्यानंतर डिंग लिरेन आणि हॅन्सन या दोघांकडे 15 गुण आहेत. एअरथिंग्स मास्टर्समध्ये 16 खेळाडू सहभागी झाले आहेत.
आर. प्रज्ञानंद हा पाचवा सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहेत. त्याच्याआधी अभिमन्यू मिशा, सर्गेई करजाकिन, गुकेश डी आणि जावोखिर सिंदारोव यांनीही लहान वयात हे विजेतेपद मिळवले आहे.