डॉ. अनुराधा चं. भडसावळे | लोककथा
कोणत्याही कार्यक्रमाच्या आधी कार्य सिद्धीस जाण्यासाठी गणपतीची पूजा केली जाते.
सूर्य, इंद्र, अग्नी, कार्तिकेय असे अनेक शक्तिमान देव असतानाही गणपतीलाच अग्रपूजेचा मन का मिळतो, याविषयी एक सुरेख कथा आहे.
एकदा सर्व देव कैलासावर जमा झाले होते.
चर्चेचा विषय होता, ‘माणसे विविध कारणांसाठी अनेक यज्ञ करतात. कार्यसिद्धी साठी अग्रपूजा कोणत्या देवाची करायची?’
सूर्य म्हणे, “माझ्यामुळे पृथ्वीवरचे जीवन चालू आहे. याचे स्मरण असावे.”
इंद्र म्हणाला, “मी देवांचा राजा, शिवाय पर्जन्य देवता म्हणून माझी पूजा करायला हवी.”
अग्नी म्हणे, “माझ्याशिवाय अन्न शिजत नाही आणि अन्न पचत नाही. त्यामुळे अग्रपूजेचा मान मलाच हवा.”
कार्तिकेय म्हणाला, “मी देवांचा सेनापती. असुरांपासून सर्वांचे संरक्षण करतो. त्यामुळे अग्रपूजेचा मीच अधिकारी आहे.”
गणेश म्हणाला, “मी १४ विद्यांचा व ६४ कलांचा अधिपती, बुद्धिदाता आहे. मला अग्रपूजेचा मान हवा.”
विष्णू म्हणाले, “हे बघा ही गोष्ट वादाने सुटणारी नाही .आपण एक स्पर्धा घेऊ.”
महादेव म्हणाले, “जो कोणी तीन वेळेला पृथ्वी प्रदक्षिणा घालेल आणि प्रथम येईल त्याला अग्रपूजेचा मान देऊ. मान्य आहे का?”
स्पर्धा सगळ्यांना मान्य झाली. स्पर्धेचा दिवस ठरला. कैलासावरती प्रेक्षक म्हणून विष्णू – लक्ष्मी, नारद, ब्रह्मदेव – सरस्वती, सप्तर्षी , उमा – महादेव, नंदी आणि सर्व गण जमा झाले.
स्पर्धक कोण कोण होते?
इंद्रदेव समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या चार मस्तके धारण करणार्या ऐरावतासह हजर होते. सूर्यदेव आपल्या सात घोड्यांच्या रथात सारथी अरुणासह प्रवासाला सज्ज होते. अग्नीचे वाहन बोकड. त्यावर बसून तो आला होता. कार्तिकेय आपल्या देखण्या मोरावर बसून उड्डाणासाठी केव्हाच तयार होऊन बसला होता. गणेश आपल्या पिटुकल्या उंदराला घेऊन आला होता.
स्पर्धेची सुरुवात नंदीने आपल्या गळ्यातली घंटा घण-घण-घण वाजवून केली.
चौघेजण अत्यंत वेगात निघाले. त्यांच्या त्या वेगाने सोसाट्याचा वारा सुटला. जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. समुद्रामध्ये वादळं निर्माण झाली. विजा कडकडू लागल्या. भूमंडळ डळमळीत झाले. पण ह्या चौघांवर त्या वातावरणाचा काहीच परिणाम झाला नाही. जो तो जिंकण्यासाठी पूर्ण आवेशाने एकमेकांवर मात करण्यासाठी पुढे जात राहिला. त्यांच्या समोरून एकेक जण वेगात जात होते. पण गणेश कैलासावरच थांबला होता.
सर्व देवांनी, सप्तर्षींनी, नारद मुनींनी आणि गणांनी गणेशाकडे पाहिले.
त्यांना गणेश कसा दिसला?
त्याचे रूप अत्यंत भव्य होते. सुप्रसन्न अशा हत्तीच्या मस्तकावर शेंदराचा लेप ल्यालेला होता. त्याच्या गंडस्थळातून सुगंधी मदस्त्राव होत होता. वाकडी सोंड अलंकारांनी नटली होती. एकदंत, चतुर्भुज, मस्तकावर रत्नखचित मुकुट ल्यालेला. पितांबरधारी लंबोदराच्या गळ्यामध्ये फुलांच्या आणि रत्नांच्या माळा शोभत होत्या. श्री गणेशाच्या पोटावर पंच विषयांचा प्रतिनिधी असा नाग फुत्कार टाकत होता. असा तो अत्यंत सुंदर, १४ विद्यांचा आणि ६४ कलांचा स्वामी वेगाने जाणार्या स्पर्धकांकडे पाहात चुपचाप उभा होता.
पार्वतीचं मातृ हृदय.
ती म्हणाली, “बा गणेशा, जा ना आता. सुरुवात कर स्पर्धेला. या सगळ्यांच्या दोन-दोन पृथ्वीप्रदक्षिणा झाल्या सुद्धा.”
गणपती हसला. त्याने आपलं वाहन उंदीर ह्याला बोलावून घेतलं आणि त्याच्या कानामध्ये काही तरी सांगितलं. आपण स्वतः मान सरोवरावर गेला. स्नान करून अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने तो उमा – महेशांजवळ आला. त्यांनी सोवळे परिधान केले होते. कपाळी गंध. गळ्यात जानवे. त्यांनी आपल्या आईवडिलांना उच्चासनावर बसवलं. आपण त्यांच्या पायाशी आसनावर बसला. आईवडिलांची पाद्यपूजा केली. चंदन, फुले अर्पण केली. धूप व दीपाने ओवाळले.
पाच फळांचा नैवेद्य व नंतर तांबूल अर्पण केला. पूर्णभावे त्यांची आरती केली. मग मूषकावर बसून आईवडिलांना अत्यंत मनोभावे तीन
प्रदक्षिणा घातल्या. खाली उतरून दोघांनाही साष्टांग नमस्कार केला.
हा मातृ पितृ पूजनाचा अभूतपूर्व सोहळा ब्रह्मा, विष्णू, नारद लक्ष्मी, सरस्वती, सप्तर्षी, नंदी व शिवगण यांनी अनुभवला.
या सगळ्यांना नमस्कार करून गणेशाने त्यांचा आशीर्वाद घेतला आणि शांतपणे बाकीचे पृथ्वी प्रदक्षिणा आटोपून येण्याची वाट पाहात बाजूला उभा राहिला.
तेवढ्यात हुश्श करीत कार्तिकेय, इंद्र, अग्नी व सूर्य हजर झाले. देवांचा राजा इंद्र मोठ्या गुर्मीत गणेशाला म्हणाला, “बरं झालं रे बाबा तू आला नाहीस! काय तिथे कडायाची थंडी होती! वादळं होती. बोचरे वारे होते. आणि कधी कधी तर उष्णतेचा आगडोंबसुद्धा आम्ही सहन केला. क्वचित आम्ही ढगांमधूनही प्रवास केला. समोर काहीसुद्धा दिसत नव्हतं. विजा कडकडत होत्या, पण तसेच पुढे गेलो. तुझ्या या अगडबंब देहाने ह्या छोट्याशा उंदरावर बसून तू कशी पार पडली असतीस पृथ्वी प्रदक्षिणा? कसं सावरलं असतं त्या वादळात स्वतःला? तेही तीन वेळा!”
हे ऐकणारे श्री विष्णू म्हणाले, “गणेशाने तीन वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केव्हाच पूर्ण केली आहे.
“अरे, असं कसं झालं? आम्ही तर त्याला कधीच प्रवास करताना आकाशात पाहिलं नाही.”
कार्तिकेय रागाने फणफणला. सूर्य कोपला. त्याचा सर्वांना दाह झाला. इंद्र आणि अग्नी रागाने लालेलाल झाले.
महादेव म्हणाले, “गणेशाने शर्यत जिंकली आहे. त्याने आईवडिलांची सेवा, पूजा, प्रसाद, प्रदक्षिणा हे सर्व यथासांग पार पाडले आहे. आम्ही त्याच्यावर प्रसन्न आहोत.
आई वडिलांची सेवा करून त्यांना संतुष्ट करणार्याला पृथ्वीप्रदक्षिणेचे पुण्य मिळते असे शास्त्र सांगते. त्यामुळे त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य सर्वात आधी मिळाले आहे.
ही स्पर्धा गणेशाने जिंकली आहे.”
आता गणपतीने बोलावयास सुरुवात केली.
“खरंतर ही स्पर्धा आपली नसून आपल्या वाहनांची होती. माझा मूषक, कार्तिकेयाचा मोर, सूर्य देवांचाअरुण सारथी असलेला सात घोड्यांचा रथ, ऐरावत यांच्यात स्पर्धा कशी होऊ शकते? अशी स्पर्धा होऊच शकत नाही. ही स्पर्धा आपली होती. आपल्या बुद्धीची होती. आणि त्यामध्ये मी जिंकलो. म्हणून अग्रपूजेचा मान मला मिळणार आहे.” गणेशाचा हा युक्तिवाद बिनतोड होता. तो सगळ्यांना मान्य करावाच लागला.
आणि तेव्हापासून श्री गणेशाला अग्रपूजेचा मान मिळाला आहे.
गणपतीचे वाहन असलेला उंदीर म्हणजे माझं मन आहे. विघनहर्ता गणेश माझ्या चंचल मनावर अंकुश ठेवतो. कोणत्याही प्रसंगी माझ्या मनावर अडचणींचे दडपण न येता त्या सोडवण्याचे कौशल्य आणि योग्य बुद्धी तो मला देतो. म्हणून ज्ञानदेव त्याला सकळमतीप्रकाशु म्हणतात.
समर्थ रामदास स्वामींच्या शब्दांमध्ये त्यांना वंदन करून थांबते.
ऐसा सर्वांगी सुंदरू
सकल विद्यांचा आगरू
त्यासी माझा नमस्कारू
साष्टांग भावे ॥
(दासबोध १-२-२५)
-anu.bhadsavlegmail.com