दिनमान प्रतिनिधी
महाड।
मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करणार्या मनोज जरांगे पाटील यांचे रविवारी महाडमध्ये स्वागत करण्यात आले. पोलादपूरमध्ये जंगी स्वागत झाल्यानंतर ते किल्ले रायगडावर गेले. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा आरक्षणावर उपस्थित मराठा बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना 70 वर्षे नोंदी कोणी लपवल्या त्यांची नावे जाहीर करा, असे आवाहन केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता गेली अनेक महिने लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी दौरा सुरू केला आहे. शनिवारी महाबळेश्वरमार्गे मनोज जरांगे पाटील पोलादपूर येथे आले. या ठिकाणी सायंकाळी त्यांचे जंगी स्वागत झाले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी किल्ले रायगडावर प्रस्थान केले. रविवारी किल्ले रायगडावर पायी चालत जात छ. शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांचा ताफा महाडकडे रवाना झाला. महाडमध्ये चवदार तळे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी चौक येथे उपस्थित मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
या वेळी मार्गदर्शन करताना मराठ्यांनी लढाया खूप लढल्या, मात्र मराठा आरक्षण ही लढाई आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी शंभर टक्के आरक्षण मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे ठणकावत या लढाईमध्ये एकजूट दाखवाल तरच लढाई जिंकू, असे सांगितले.