दिनमान प्रतिनिधी
पुणे।
सफेद भिलावा म्हणजेच बिब्बा जवळ ठेवा लक्ष्मीप्राप्ती होईल, असे सांगणारा एक व्हिडीओ सध्या विविध सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा बिब्बा समोर ठेवल्यास आगकाडी पेटते किंवा त्यामध्ये चुंबकीय प्रतिकर्षण कसे आहे हे व्हिडीओमध्ये सांगितले आहे. याची सत्यता तपासल्यानंतर फक्त पैसे कमविण्यासाठी केलेली फसवणूक असल्याचे उघड झाले. वनस्पतीशास्त्र अभ्यासकांनी पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात किंवा जगात कोठेही असा पांढरा बिब्बा नसल्याचे सांगितले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसते, की या बिब्ब्याचे प्रतिबिंब आरशात दिसत नाही. काळा दोरा सुईद्वारे आरपार नेल्यास पांढरा होतो, समोर आगकाडी धरली असताना ती पेट घेते, बिब्बा पाण्यात ठेवून आगकाडी जवळ धरली तर ती पेट घेते. तांब्याची तार व बिब्बा यामध्ये प्रतिकर्षण आहे. मात्र, बारकाईने पाहिले असता संगणकीय करामती करून व्हिडीओ केल्याचे समोर आले आहे. हा बिब्बा घेतल्यास अल्पकाळात भरपूर पैसे मिळतात, असे सांगत संपर्क क्रमांकही दिले आहेत. यावर चौकशी केली असता 10 फळांची किंमत 25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.
अंधश्रद्धेला बळी पडलेल्या अनेक दुर्मिळ व इतर वनस्पतींचे जंगलामधून मोठ्या प्रमाणावर संकलन केले जात आहे. तसेच, काष्टाऔषधींच्या बाजारामध्ये मूळ औषधांमध्ये हुबेहूब सारख्या दिसणार्या अनेक वनस्पतींची भेसळ करून विकल्या जात आहेत. त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नाही.
– प्रा. किशोर सस्ते, वनस्पती व जैवविविधता अभ्यासक
सध्या निरनिराळ्या कारणांसाठी मोठ्या प्रमाणात वनस्पतींचा र्हास होत आहे. वनस्पतींमध्ये काही चमत्कार घडतात व त्यामुळे आर्थिक वृद्धी होऊ शकेल हे सांगून किंवा चुकीचा औषधी गुणधर्म सांगून सामान्य माणसांमध्ये गैरसमज पसरवणे चुकीचे आहे.
– डॉ. प्राची क्षिरसागर, वनस्पती अभ्यासक