दिनमान प्रतिनिधी
उल्हासनगर|
शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याच खड्ड्यांमुळे शहरात अनेक अपघात होत आहेत. यासंदर्भात वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तरी शहरात खड्डेमुक्ती करा, हे प्रशासनाच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी चक्क गणपती बाप्पांच्या वेशभूषेत कार्यकर्ता अवतरला.
मनसे पदाधिकार्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन देऊन खड्डेमुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा मनसेचा आरोप आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असतानाही शहरातील रस्ते खड्ड्यांतच आहेत. गणपती मिरवणुकीदरम्यान खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडल्यास किंवा गणपतीमूर्तीची विटंबना झाल्यास त्याला शासन जबाबदार असेल, असेही मनसेने या वेळी म्हटले आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे मनोज शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली खुद्द गणपती बाप्पांनीच पालिका आयुक्तांना हे निवेदन दिल्याने उल्हासनगरात एकच चर्चेचा विषय बनला होता. या वेळी सचिन चौधरी, गणेश आठवले, प्रेम मोकाशी, अशोक गरड, संदीप गरड, सुनील शेलार, विकी शेलार, मनोज हाथी, देवा कुमावत यांच्यासह इतर पदाधिकार्यांनी पालिका आयुक्त अजीज शेख यांची भेट घेतली.
एमएमआरडीएचे रस्ते खड्डेमय
उल्हासनगर शहरातील विविध रस्त्यांचे एमएमआरडीएने दिलेल्या १२६ कोटी रुपयांच्या निधीतून काँक्रीटकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये नेताजी चौक ते कैलाश कॉलनी, न्यू इंग्लिश हायस्कूल ते लाल चक्की चौक, ए ब्लॉक ते साईबाबा मंदिर, सोनार चौक ते कोयंडे पुतळा, हिराघाट मंदिर ते डर्बी हॉटेल, शामा प्रसाद मुखर्जी ते शांतीनगर, वाक्को कम्पाउंड ते व्हिनस चौक या रस्त्यांचा समावेश आहे. हेच रस्ते खड्डेमय झाले आहेत. ठेकेदार काम करीत नसल्याने पालिका प्रशासनही त्रस्त आहेत. एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता अर्जुन कोरगावकर यांनी सातही रस्त्यांच्या ठेकेदारांना रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिल्याची माहिती शेलार यांनी दिली.