दिलीप ठाकूर | चित्रपट समीक्षक | एन्टरटेन्मेट
विख्यात संगीतकार लक्ष्मीकांत 25 मे हा स्मृतिदिन त्या निमित्ताने त्यांच्या बाबतच्या आठवणीना उजाळा…
पंचवीस वर्ष झाली. वांद्य्राच्या मेहबूब स्टुडिओमध्ये कोणत्याही फिल्मी इव्हेन्टसला (मुहूर्त वगैरे) जातो तेव्हा संगीतकार लक्ष्मीकांत यांची आठवण हमखास येतेच. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील लक्ष्मीकांत कुडाळकर यांच्या निधनाला 25 मे रोजी पंचवीस वर्ष पूर्ण कधी झाली हे समजलेच नाही आणि कलेच्या क्षेत्रातील अगदी कोणीही असो ती व्यक्ती त्याच्या कार्यातून सतत आपल्यासोबत अथवा आसपास असते. हेही कलेचे एक देणे. लक्ष्मीकांत यांचा चित्रपट संगीत खजाना इतका आणि असा अफाट, बहुरंगी, बहुस्तरीय आणि लोकप्रिय आहे की कधी त्यांचे सावन का महिना पवन करे सोर (मिलन) कानावर पडते तर कधी ये रेश्मी जुल्फे (दो रास्ते), प्रेम कहानी मे एक लडका होता है (प्रेम कहानी), झिलमिल सितारों का आंगन होगा (जीवन मृत्यू), मै शायर तो नही (बॉबी), गाडी बुला रही है (दोस्त) असे कोणतेही गाणे आठवले, गुणगुणावेसे वाटले तरी एलपी (अर्थात लक्ष्मीकांत प्यारेलाल) नक्कीच आठवतात…
साठच्या दशकात जन्माला आलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील माझ्या पिढीच्या लहानपणी घरी रेडिओ आणल्याबद्दल चाळीत पेढे वाटण्याची पद्धत होती. याच रेडिओने आणि एरियात कधी काही कारणास्तव (पूजा, सण, लग्न, बारसं वगैरे) लाऊडस्पीकर लागल्यावर ‘पिक्चरची गाणी’ भरपूर ऐकायला मिळत. पालकांसोबत चित्रपट पाहताना ती गाणी पाहायला मिळत (एलपीचे संगीत असलेल्या ‘दोस्ती’मधील ‘राही मनवा दुख की चिंता, मेरा तो जो भी कदम है, गुडिया हमसे रुठ रहोगी अशीच पाहता पाहता आवडली’), कॉलेजमध्ये गेल्यावर इराणी हॉटेलमधील ज्यूक्स बॉक्समध्ये आठ आण्याचे नाणे टाकून हसता हुआ नूरानी चेहरा, वो जब याद आये ( एलपींचा पहिला चित्रपट ‘पारसमणी’), तुम गगन की चंद्रमा हो, जीवन डोर तुम्ही संग बांधी (सती सावित्री), यह दर्दभरा अफसाना (श्रीमान फंटूश), मेरे दिल मे आज क्या है (दाग), अच्छा तो हम चलते है (आन मिलो सजना) अशी एलपीची गाणी जवळची होत गेली.
मिडियात आल्यावर अनेक फिल्मवाल्यांच्या ओळखी आणि भेटीगाठींबाबत असलेल्या ओढीत लक्ष्मीकांत यांचीही भेट झाली आणि त्यांच्या ‘खिलौना’, ‘हाथी मेरे साथी’, ‘जीने की राह’ , ‘मेरा गाव मेरा देश ’, ‘अनहोनी’, ‘मनचली’ यातील अनेक गाण्यांचे संदर्भ सांगितल्याने आम्ही खूप लवकर जवळ आलो. आमच्या भेटीसाठी दोन हुकमी स्पॉट होते. एक म्हणजे मेहबूब स्टुडिओतील रेकॉर्डिंग स्टुडिओ (त्या काळात मेहबूबला अनेक चित्रपटांचे मुहूर्त होत, शूटिंग रिपोर्टींगसाठी जाणे होई आणि ते झाल्यावर रेकॉर्डिंग स्टुडिओत गेल्यावर अनेकदा तरी एलपींचा टेक असे. लक्ष्मीकांतजींची भेट झाल्यावर थोड्याफार गप्पा होत. अन्यथा हाय, हॅलो पुरेसे ठरे. त्यांना पाहताच ‘संत ज्ञानेश्वर’पासून ‘सत्यम शिवम सुंदरम’पर्यंत अनेक गाणी आठवत) आणि आमच्या भेटीसाठी हुकमी असे ते त्या काळातील फिल्मी पार्ट्या. त्यांच्या चित्रपटाच्या चित्रपटाची कॅसेट रिलीज असल्यावर ते भेटणार आणि काही वेळ गप्पा होणार हे ठरलेले. त्यात आमचा हुकमी विषय क्रिकेट असे. ते जबरदस्त क्रिकेट फॅन्स. भारत व ऑस्ट्रेलिया या त्यांच्या फेवरिट टीम. या दोन संघात सामना असेल तर ते आपल्या संघाच्या बाजूने. उद्या सामन्यात काय होईल यावर आम्ही एकमेकांना अंदाज सांगत असू, औपचारिक पैज लावत असू. तो कसोटी क्रिकेटचा काळ होता. वन डे कल्चर रुजत होते. त्यांना क्रिकेटमधले डावपेच, उतार चढाव, अनपेक्षितता, अनिश्चितता समजत असे. ते नुसतेच क्रेझी नव्हते. क्रिकेटमधील लयबद्धता, शैली त्यांच्या संगीतात आली असावी. सचिन तेंडुलकर त्यांचा अतिशय आवडता. तरुणपणी आपण थोडसं सचिनसारखे दिसायचो हे कधी ते गंमतीत म्हणत. विदेशी क्रिकेट संघ भारतात आल्यावर मुंबईतील सामन्याच्या वेळी त्यांची मेव्हणी बिंदू (अर्थात रुपेरी पडद्यावरील व्हॅम्प) यांचे पती झवेरी यांच्या बंगल्यावर क्रिकेटर्सना असलेल्या पार्टीचे लक्ष्मीकांतजींना आवर्जून आमंत्रण असे आणि त्या पार्टीत त्यांचे क्रिकेटर्सना भेटणे होई. त्यांचा हा आनंद काही वेगळाच. कलावंत मनाला अशा आवडीचे एकादे टॉनिक हवेच असते. लक्ष्मीकांतजिंना ते क्रिकेट वेडातून मिळत असावे.
छोट्या छोट्या भेटीतून लक्ष्मीकांतजी भेटत होते, कधी प्यारेलाल यांचीही भेट होई. एकदा लक्ष्मीकांतजींना म्हणालो, एकदा सविस्तर मुलाखत करुयात. ते अतिशय तत्परतेने म्हणाले, उद्याच पारसमणी बंगल्यावर ये. (जुहूमध्ये त्यांचा हा बंगला कालांतराने पाडला जाऊन आता भव्य इमारत उभी राहिलीय. पण आपल्या पहिल्या चित्रपटाने नाव त्यांनी बंगल्याला दिले हे विशेष उल्लेखनीय). मनमोहन देसाईंच्या ‘धरमवीर ’, ‘चाचा भतीजा’, ‘परवरीश’, ‘अमर अकबर अँन्थनी’ (हे चारही चित्रपट 1977चे म्युझिकल हिट), सुहाग, नशीब वगैरे चित्रपटांना संगीत देताना मोहम्मद रफीचा आवाज आवर्जून वापरला याचे श्रेय त्यांनी आवर्जून मनजींना दिले असे काही विषय आमच्या गप्पांत आले. ‘कुली’चे संगीत त्यांचे असूनही त्याचे पार्श्वसंगीत अन्नू मलिकचे यावर त्यांचा मनजींशी वाद कसा झाला हेही त्यांनी सांगितले. त्या काळातील जवळपास सर्वच टॉपच्या दिग्दर्शकांच्या (मोहनकुमारपासून मनोजकुमारपर्यंत आणि बी. आर. चोप्रांपासून सुभाष घईपर्यंत) चित्रपटांना संगीत देण्याचा योग त्यांना आला पण, नासिर हुसेन यांच्या चित्रपटाला संगीत देण्याचा योग त्यांना न आल्याचे माझे निरीक्षण त्यांनी मान्य केले. पण एकदा तसा योग आला होता पण तो चित्रपट घोषणेपूर्वीच बंद पडला असे ते म्हणाले. नेहमीच ते दिलखुलास बोलत होते.
त्यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1937 चा दिवाळीतील लक्ष्मी पूजनाच्या दिवसाचा. म्हणून नाव लक्ष्मीकांत. लहान वयात त्यांनी भक्त पुंडलिक (1949), ऑखे (1950), तसेच काही गुजराती चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. ते संगीत शिकले हुसेन अली यांच्याकडे. दोन वर्ष मेंडोलिन वाजवायला शिकले. बाळ मुकुंद इंदोरकर आणि हुस्ननाल यांच्याकडेही मग त्यांनी संगीत शिक्षण घेतले. (त्या काळातील संगीतकार हुस्नलाल भगतराम यांतील हुस्ननाल).. तर प्यारेलाल हे पंडित रामप्रसाद शर्मा यांचे पुत्र. ते उत्तम ट्रम्पेट वाजवत. प्यारेभाईना घरातून संगीत शिक्षण मिळाले तसेच ते अँन्थनी गोन्सालवीस यांच्याकडे व्हायोलिन वाजवायला शिकले. काही वर्षातच संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करत असतानाच एलपी जोडी जमली आणि दिग्दर्शक बाबुभाई मिस्री यांनी ‘पारसमणी’ ( 1963)पासून स्वतंत्र संगीतकार म्हणून संधी दिली. पुढच्याच वर्षी म्हणजे 1964 साली राजश्री प्रॉडक्सन्सच्या सत्येन बोस दिग्दर्शित ‘दोस्ती’च्या संगीतासाठी त्यांना फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाला आणि त्यांची सगळीकडेच चर्चा सुरू झाली. (राज कपूर दिग्दर्शित ‘संगम’च्या संगीतासाठी शंकर जयकिशन यांना न मिळता एलपींची निवड झाली होती हे विशेषच). एलपींनी हिंदीसह दहा प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना संगीत दिले, त्याची संख्या पाचशे चित्रपट आहे. लक्ष्मीकांतजी संगीतात इतके आणि असे रमले, एकरुप झाले की आपल्या लग्नानंतर ते दुसर्याच दिवशी रेकॉर्डिंगला आले. त्यांचा डॉक्टर, राजकारणी, उद्योगपती, खेळाडू असा सर्वच क्षेत्रात मित्रपरिवार. चित्रपट संगीतात म्युझिक सिटींग रुम, म्युझिक कंपोझ, म्युझिक रेंज, म्युझिक कंडक्ट आणि रेकॉर्डिंग असा प्रवास असतो. त्या काळात अनेकदा तरी अगोदर गाणे मग संगीत अशी रचना असे. दिग्दर्शकाशी एकेक गाण्यावर चर्चा होई. पडद्यावर हे गाणे कोण साकारणार आहे हेही विचारात घ्यावे लागे. तो कलाकार गातोय असा फिल येणे आवश्यक असे. या सगळ्याचे भान आणि सातत्य संगीतकाराकडे लागे. म्हणून तर जुनी गाणी आजही लोकप्रिय आहेत आणि त्यात एलपींचा वाटा खूपच मोठा आहेच…
अशातच 25 मे 1998 रोजी दुपारी वृत्तसंस्थेने फ्लॅश दिला, संगीतकार लक्ष्मीकांत कालवश. आणि लक्ष्मीकांतजींना श्रद्धांजलीचा लेख लिहिण्यासाठी लगेचच पॅड समोर घेतला आणि हेडिंग दिले… ’दिलखुलास ’