संतोष सोनवणे | शाळेच्या बाकावरून
मूल हे जन्मापासूनच सतत नवे काही तरी ज्ञान, कौशल्य, क्षमता आत्मसात करीत असते. या प्रयत्नांमधून आलेल्या यशापयशाच्या आधारावर ते आपल्या वर्तनात इष्ट असा बदल करून पुढे जात असते. त्याच्या या कृतीलाच शिक्षणशास्त्राच्या अर्थानं अध्ययन हे गोंडस असे शीर्षक दिले जाते. त्यालाच आपण सोप्या भाषेत शिकणे असे संबोधतो.
मूल कसं शिकतं याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. शिक्षणशास्त्राच्या संशोधनानुसार त्यात कालानुक्रमाने बदल होत गेले. त्यामुळे एकच एक पद्धती असे आपण ठामपणे सांगू शकत नाही. तरीही मुलं शिकण्याची सर्वसाधारणपणे प्रक्रिया समाजातल्या प्रत्येक घटकाने प्रथम समजून घेतली पाहिजे, तरच त्याचं शिकणं हे सहज सोपं आणि आनंददायी होऊ शकतं.
मूल हे जन्मापासूनच सतत नवे काही तरी ज्ञान, कौशल्य, क्षमता आत्मसात करीत असते. या प्रयत्नांमधून आलेल्या यशापयशाच्या आधारावर ते आपल्या वर्तनात इष्ट असा बदल करून पुढे जात असते. त्याच्या या कृतीलाच शिक्षणशास्त्राच्या अर्थानं अध्ययन हे गोंडस असं शीर्षक दिले जाते. त्यालाच आपण सोप्या भाषेत शिकणं असं संबोधतो. थोडक्यात शिक्षण म्हणजे व्यक्तीने आपल्या अनुभवाच्या आधारे वर्तनात घडवून आणलेले सापेक्षतः कायमस्वरूपी केलेले बदल होय. शिकण्याच्या या प्रक्रियेमुळे वर्तनात बदल घडून येतो. व्यक्तीचे अनुभव व प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरतात आणि वर्तनात घडून येणारे बदल हे टिकाऊ स्वरूपाचे असतात. मग नेमकं शिकणं होतं कसं? शिकणं ही सतत चालणारी मानवी जीवनातील एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. शिकणं म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण नसून व्यक्ती ही आयुष्यभर सतत काही ना काही शिकत असते. शिकण्याचा प्रयत्न करीत असते. अशा प्रक्रियेचं नेमकं स्वरूप समजून घेतलं पाहिजे.
‘शिकणं’ प्रक्रियेचं स्वरूप
उद्दिष्ट : शिकणं ही प्रक्रिया उद्दिष्टापर्यंत जाणारी अशी प्रक्रिया आहे. शिकण्यात निश्चित हेतू किंवा उद्दिष्ट दडलेले असतात. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यक्तीदेखील प्रयत्न करीत असते. उद्दिष्ट जेवढं अधिक स्पष्ट असतं तेवढं शिक्षण अधिक चांगलं होतं. यामध्ये आपली गरजेची पूर्तता याकरिता शिकणं होत असतं. अर्थात काही वेळेस सहज अनौपचारिक पद्धतीनेही शिकण्याची प्रक्रिया होत असते. ते आपण ही लेखमाला जसजशी पुढे जाईल तसतसे पाहणार आहोत.
प्रेरणा : प्रेरणा अर्थात व्यक्तीला उद्युक्त करणारी एक आंतरिक शक्ती असते. केवळ उद्दिष्ट किंवा हेतू असून भागत नाही तर प्रेरणा ही आवश्यकच असते. शिकण्यासाठी प्रेरणा ही व्यक्तीला उद्युक्त करीत असते. प्रेरणा नसेल तर व्यक्ती प्रयत्नशील राहत नाही. त्यात सातत्य टिकत नाही.
शोधन: ‘शिकणं’ होताना चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणे हे शोधनामध्ये आवश्यक आहे. शोधन प्रवृत्ती हे योग्य दिशेने शिकण्याची प्रक्रिया घडवून आणते. उद्दिष्टप्राप्तीसाठी या अशा शोधनात्मक हालचाली महत्त्वाची भूमिका बजावतात.
हालचालींची पुनर्रचना : शिकणे होताना हालचालींची पुनर्रचना आपोआप होत असते. याच आवश्यक गोष्टींचा त्याग करून आवश्यक गोष्टींमध्ये अधिक सफाईदारपणे कौशल्य प्राप्त होत असते. यातूनच पुढे शिकण्याला गती प्राप्त होते, ज्यामुळे शिकणे सोपे व सहज बनत.
समायोजन : शिकण्यात समायोजानाला फार महत्त्व आहे. मूल हे जन्मापासूनच बाह्य वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असते. यातूनच कळत-नकळतपणे त्याचं शिकणं होत असतं. थोडक्यात शिकणं या प्रक्रियेमागचा नेमका अर्थ व त्याचं स्वरूप समजावून घेणे हे शिक्षक, पालक व एकूण समाजातील प्रत्येक घटकासाठी गरजेचं आहे. यामुळे आपल्याला त्याला प्रोत्साहन देऊन त्याचं शिकणं हे अधिक सहज, सोपं आणि आनंददायी करता येईल.
थोडक्यात शिकणं ही सतत चालणारी अशी प्रक्रिया असून, त्याकरिता मुलाचे कुटुंब, समाज, परिसर आणि औपचारिक शाळा याचा प्रभाव त्यात असतो.
तरीही शाळेचा, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक, परीक्षा आणि निकाल याच्या पलीकडेही शिकणं असतं. फक्त पालकांनी ते समजून-उमजून आपल्या पाल्याशी शिकण्यासाठीचा व्यवहार करणे यात अपेक्षित आहे.