दिनमान प्रतिनिधी
आळंदी देवाची|
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पावन भूमीत पद्मविभूषण शरद पवार यांच्या उपस्थितीत १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० ते ५.०० या वेळेत वारकरी संमेलन होत आहे. मुक्ताई लॉन्स चरोली फाटा, आळंदी येथे होणार्या या संमेलनात संत साहित्यावर परिसंवाद, चर्चा होणार असून, मान्यवर कीर्तनकार यांचा सन्मान होणार आहे.
वारकरी संत साहित्य आजही ताजे टवटवीत असून, समाजाला दिशा देणारे आहे. संत साहित्यातील योग्य विचार समाजात रुजल्यास समता, स्वातंत्र्य, बंधुत्व वृद्धिंगत होऊन सामाजिक ऐक्य भक्कम होईल, हा आशावाद मनाशी दृढ करून जे कीर्तनकार कार्य करीत आहेत त्यांचा सन्मान या संमेलनात होणार आहे.
भागवत वारकरी महासंघाच्या वतीने आयोजिलेल्या या संमेलनात पद्मविभूषण शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, दिनकरशास्त्री भुकेले या सोहळ्याचे अध्यक्ष आहेत. विलास लांडे हेही या वेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. विकास महाराज लवांडे करणार आहेत. या संमेलनात ‘संत विचार आणि भारतीय संविधान’ या विषयावर परिसंवाद होणार असून, त्याचे अध्यक्ष ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर असणार आहेत. तर ह.भ.प. दिनकर भुकेले शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या परिसंवादाचा विषय आहे
‘मनुस्मृती आणि भागवत वारकरी संप्रदाय.’ उद्धव महाराज शिंदे यांच्या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, ह.प. दु:शासन महाराज क्षीरसागर हे पंचपदी करणार आहेत. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन ह.भ.प. भारत महाराज जाधव हे करणार आहेत.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भारत महाराज घोगरे गुरुजी, देवराम महाराज कोठारे, निरंजन महाराज सोखी, सुरेश महाराज भालेराव, सतीश काळे, राजू भुजबळ, समाधान महाराज देशमुख, तुकाराम महाराज घाडगे, शंकर बहिराट, मुबारकभाई शेख हे सर्वजण प्रयत्नशील आहेत.