Site icon महाराष्ट्र दिनमान

वृक्षवल्ली आम्हा… सोयरी…(?)

ऑक्सिजन

ऑक्सिजन

हल्ली मी भल्या सकाळी आमच्या बिल्डिंगच्या टेरेसवर नित्यनेमाने जातो. (म्हणजे बघा, मी किती फिटनेससाठी जागरूक आहे, हे सांगण्याचा हा प्रयत्न नाही.) यानिमित्तानं मला जे काही दिसतं त्याचा नंतरच्या दिवसभराच्या ‘व्हर्च्युअल जगात’ मागमूसही नसतो.
आमच्या बिल्डिंगसमोर रेल्वे स्टेशन आहे. त्याला लागून तीन-चार डेरेदार वृक्ष आहेत. (म्हणजे होते. आता दोनच राहिलेत).
त्यावर बर्‍यापैकी पक्ष्यांचा गेली कित्येक वर्षे किलबिलाट असतो. अर्थात त्यांची संख्या हल्ली लक्षणीयरीत्या घटली आहे.
पण ते वातावरण पहाटे पाच ते अगदी सात वाजेपर्यंत अत्यंत मनमोहक असते.
विविध प्रकारचे पक्षी उडताना, ओरडताना, आवाज करताना दिसतात. अर्थात तुम्ही फार ‘अभयारण्याचा’ फील डोळ्यांसमोर आणू नका.
दोन-पाच हिरवेगार पोपट उडताना जरी दिसले तरी नजरेला सुखावतात. पण त्यांच्या सुखाला मानवी सैतानाची दृष्ट लागली आहे. एक मोठ्ठा मधला डेरेदार वृक्ष रेल्वेनं (रेल्वेत कोण जनरल डायर अधिकारी आलाय कोण जाणे.) तोडायला घेतलाय.
वर्षानुवर्षे आम्ही ( म्हणजे आजूबाजूचा परिसर) चकटफू त्या वृक्षाच्या सावलीत होतो. आता सूर्यनारायण थेट तलवार घेऊन घरात घुसू लागला आहे.
त्या वृक्षाची खोडे कापली असतानाही त्या उघड्या बोडक्या खोडांवर एक अत्यंत सुंदर पक्षी गोंधळलेल्या आणि केविलवाण्या परिस्थितीत बसलेला मला सकाळी सकाळी दिसला. तो ओरडत होता. (बहुदा रेल्वेला तळतळाट देत असणार)
मला तर ते दृश्य पाहून तुफान वादळाने एखादं घर उद्ध्वस्त केल्यावर त्या छप्पर उडालेल्या घराच्या तुटक्या भिंतीला उभी राहून भेदरलेली-थरथरत असलेली एखादी ‘सौंदर्यवती’ पाहात असल्याचा फील आला. असो. एरव्ही या मानवव्याप्त कोरोना विषाणूच्या काळात पशूपक्षी मात्र हजारो वर्षांचं स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात असल्याप्रमाणे खूश होऊन ‘विहार’ करताना सकाळ-संध्याकाळ दिसतायत.
एक कावळा तिरप्या नजरेनं माझ्याकडे पाहात जणू म्हणत होता, ‘अब तुम्हारी बारी हैं गब्बर!’
मी पटकन दचकलो. पक्ष्यांचा मला मनातल्या मनात क्षणभर हेवा वाटला. कारण ते एकत्र बसून गप्पा मारत होते. अंगाला अंग घासत होते, बिनधोक.
कारण त्यांना कोरोना होत नाही, होणारच नव्हता. एक सुतार पक्षी तिरसटपणे म्हणाला, ‘तुम्ही लेको राहा मरेपर्यंत व्हर्च्युअल!’
लै तोंड वाजवले तुम्ही, आता लावा तोंडाला फडकं आयुष्यभर.
मी शहारून म्हटलो, ‘गप्प रे बाबाऽऽ’ तर तो खलनायकासारखा मोठ्ठ्यानं हसला.
पण ती तोडलेली झाडे पाहून मी स्वतःशीच म्हणालो, ‘येस, आम्ही नाही सुधारणार. झाडं लावणं दूर राहिलं, आहे ते निसर्गवैभवही टिकवण्याची अक्कल एवढ्या मोठ्या संकटानं आली नाही आम्हाला.’ ‘झाडे लावा वृक्ष जगवा. अरे, पण लावणार कुठे आता? शहरात जागा तरी उरलीय का?’
‘फ्लॅटच्या गॅलरीत कुंड्यांमध्ये रोपे लावून त्यांना पसराभर पाणी टाकून काय साध्य होणार ऽऽ.’
‘माझ्यातला ‘आळशी’ माणूस समर्थन करीत होता. पण खरंच जमीन उरली कुठे? सिमेंटने ती पॅक करून टाकलीय ना. झाडे नाही जगली तरी चालेल; पण बिल्डर जगला पाहिजे, कंत्राटदार जगला पाहिजे. कारण खाली अन्नसाखळी आहे ना. एक बिल्डर जगला की बरेच परप्रांतीय मजूर, एक नगरसेवक, एक अधिकारी काही कार्यकर्ते आणि क्लार्क जगतात ना. झाडं कुणाला जगवतायत इथे. पक्ष्यांची लोकसंख्या काही लाखांमध्ये वाढली होती. ती आता शेकड्यांत मोजायला आली आहे. ती हाताच्या बोटांवर येईल. कारण मोबाइल टॉवर्स उभे राहिले की त्याच्या विषारी लहरींनी पक्षी आपोआप मरतात.’
मोबाइल टॉवर्स महत्त्वाचे आहेत. कारण पोरांना, बायबापड्यांना, बाप्यांना नेटवर्क कसं मिळणार?
प्राधान्य समजून घ्यायला हवं.
‘झाडांकडून येणारा ऑक्सिजन कोणत्या लेकाला हवाय इथं. ते झाड कधी मोठं होणार; मग ते कधी ऑक्सिजन सोडणार.’
‘नॉनसेन्स. एवढा वेळ कुठे आहे. अरे, आम्ही रेल्वेच्या वॅगन्स भरून ऑक्सिजन मागवतो. असे शेकडो ऑक्सिजन प्लांट उभे करू. समजला काय तुम्ही.’
‘तर झाडांनो, ऑक्सिजनचा रुबाब कुणाला दाखवताय,’ असं वेड्यावाकड्या विचारांचं मोहोळ उठलेलं असताना एका स्पर्शानं भानावर आलो. वळून पाहतो तो तीच तिरक्या नजरेचा कावळा ऐटीत माझ्या खांद्यावर हात टाकून म्हणत होता, ‘कसला विचार करतोस रे एवढा?’
‘जगण्याची चिंता का? लेका कित्ती हाव रे तुम्हाला जगण्याची. जगलास ना, चाळीस-पन्नास वर्षे. आयला, आमच्या बिरादरीतला एखादा पक्षी किमान पाच सहा वेळा जगला असता रे एवढ्या काळात. आणि तुम्हा मानवांची पैदास डासांसारखी खूप झालेय रे! जरा होऊ दे की कमी.’
‘किती ऑक्सिजन घेता रे आणि आमच्यासाठी कार्बन सोडता हावरटासारखे. शिवाय गाड्यांमधून धूर सोडता तो वेगळा. सगळीकडून घुसमट केली आमची. तो कोरोना विषाणू आमच्यासाठी देवदूतासारखा आलाय बरं. पुन्हा जुने दिवस येतायत आम्हा पशुपक्ष्यांना बहुतेक. कावळ्याचा आनंद त्याच्या चोचीतून प्रतित होत होता. अब तुम्हारी बारी हैं दोस्त!’
आयला, हा कावळा माझ्या कानामध्ये लै काव काव करू लागला होता. पटकन हळूच तो (कावळ्यासारखाच) छद्मी हसून म्हणाला, ‘पण आत्ता तुमची ‘पाळी’ आहे. दोस्त, हवेत आमच्यासाठी मोकळेपणा आला आहे. कधी नव्हे ते आम्ही ‘मोकळा श्वास’ घेतोय. फक्त आमची घरंदारं तुटल्याचं दुःख मोठं असेल. त्याची शिक्षा म्हणून देवानं तुम्हाला तुमच्या घरादारात अडकवून ठेवलंय तुरुंगासारखं.’
असं बोलून मग तो उडाला, आणि हवेत एक गिरकी मारून येऊन पुन्हा माझ्या खांद्यावर बसून म्हणाला, ‘बघ असं येतं का तुम्हाला फिरता हल्ली.’
आज कावळ्याची ‘बोली’ होती आणि माझी बोलती बंद होती.
तोडलेली झाडे मात्र बिचारी मूकपणे रडत होती…..

Exit mobile version