दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक 2023 साठी सोमवार, 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. सकाळी 08.00 ते दुपारी 04.00 या कालावधीत मतदान होईल. या निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या शिक्षक मतदारांनाच केवळ मतदान करता येईल.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे पाच जिल्हे समाविष्ट आहेत. मतदान हे मतपत्रिकेवर होणार असून, त्यावर उमेदवाराच्या नावासमोर असलेल्या पसंतीक्रमाच्या रकान्यातच मतदारांनी पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे.
मतदारांनी मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या पेननेच मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदविणे अनिवार्य आहे. मतपत्रिकेवर पसंतीक्रमाचे आकडे मराठी किंवा इंग्रजी किंवा रोमन या भाषेत नोंदविणे आवश्यक आहे.
मतपत्रिकेवर काही पसंतीक्रम अंकात व काही पसंतीक्रम अक्षरात, शब्दांत नमूद केल्यास मतपत्रिका रद्द करण्यास पात्र ठरेल. मतपत्रिकेवर किमान 1 या अंकाचा पसंतीक्रम नोंदविणे अनिवार्य आहे. मतपत्रिकेवर 1 हा अंक एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर दर्शविल्यास मतपत्रिका अवैध ठरविण्यात येईल.
उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर बरोबर () किंवा चूक () अशी चिन्हे दर्शविल्यास तसेच मतदाराची ओळख पटेल अशा तर्हेचे चिन्ह अथवा लिखाण केलेले असल्यास मतपत्रिका अवैध ठरविण्यात येईल.