दिनमान प्रतिनिधी
वसई।
यंदाच्या 10 व्या मॅरेथॉन स्पर्धेचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून आयर्न मॅन हार्दिक पाटील यांची निवड करावी, अशी शिफारस पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना केली आहे. तशा आशयाचे पत्र खासदार गावित यांनी आयुक्तांना पाठवले आहे.
यंदाच्या 10 व्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी वसई-विरार शहर महापालिकेने कॉमनवेल्थ गेम्समधील रौप्यपदक विजेता तसेच ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्पर्धक अविनाश साबळे यांची स्पर्धेचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र त्यांच्यासोबतच वसई-विरार महापालिकेने विरारचे सुपुत्र आयर्न मॅन हार्दिक पाटील यांचाही प्राधान्याने विचार करायला हवा, अशी अपेक्षा सर्वात प्रथम वसई भाजपा अल्पसंख्याक उपजिल्हाध्यक्ष तसनिफ शेख यांनी व्यक्त केली होती.
या मागणीसाठी शेख यांनी सोमवारी पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांची भेट घेतली. या भेटीत शेख यांनी हार्दिक पाटील यांची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी आणि जागतिक पातळीवरील सन्मान गावित यांच्यासमोर अधोरेखित केला. त्यानंतर गावित यांनीही हार्दिक पाटील यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे.
हार्दिक पाटील यांनी नुकतीच 17 वी कॅलिफोर्निया आयर्न मॅन स्पर्धा 2022 यशस्वीरीत्या पूर्ण केलेली आहे.