दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
जिल्ह्यातील भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत आहे. या धरणात पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी, जलाशय परिचलन सूचीनुसार नियमित करण्याकरिता, भातसा धरणाचे पाचही वक्रद्वारे ०.५० मीटरने उघडण्यात आलेले आहेत.
त्यातून २७२.२७ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. त्यामुळे भातसा नदीच्या तिरावरील शहापूर, मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव नदीकाठावरील इतर गावांना सतर्क राहण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या भातसा नगरच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिल्या आहेत.
या भातसा धरणाची पातळी सोमववारी सायंकाळी ६:३० वाजता १४१.६६ मीटर झाली आहे.
या धरणात एकूण पाणी साठा ९६४.४५७ दलघमी व धरणातील साठ्याची टक्केवारी ९८.८० टक्के आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे, धरणात येणारा संभाव्य पाण्याचा येवा वाढत आहे. नदीकाठावरील इतर गावांतील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या व वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याच्या सूचना देण्यात आला आहेत. यासंबंधी नदी काठावरील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.