दिनमान प्रतिनिधी
विरार|
गणरायांचे आगमन आज होणार असून, वसई-विरारकर बाप्पांच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत. सर्वत्र गणरायांच्या आगमनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व भाविक सज्ज झाले आहेत. यंदा वसई-विरारमध्ये एकूण ३२ हजार बाप्पांचे आगमन होणार असून, यात ८०० सार्वजनिक तर ३१ हजार २०० खासगी बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांच्या आगमनाआधीच वसईतील सार्वजनिक मंडळांनी बाप्पांसाठी खास सुशोभित मखर तयार केली आहेत. सध्या या मखरात सार्वजनिक बाप्पांच्या मूर्ती विराजमान झाल्या असून, श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तर खासगी गणेशोत्सवासाठी भाविक हरितालिका तृतीयेच्या दिवशी गणेश कला केंद्रातून मूर्ती आणण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाने मागील वर्षीच गणेशोत्सवावरील निर्बंध हटवल्यानंतर आता धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवासारखा सण कोरोना निर्बंधांमुळे भाविकांना जल्लोषात साजरा करता आला नाही. दरम्यान, बच्चे कंपनीदेखील बाप्पांच्या आगमनासाठी सज्ज झाली असून, बाप्पांच्या आगमनासाठी त्यांची स्वारीदेखील आनंदी आणि उत्सुक आहे. यावर्षी गणरायांच्या विसर्जनावर प्रशासकीय नियमावलीचे ढग जमा झाले आहेत. गणेशमूर्तींचे वसईतील सार्वजनिक तलावांत विसर्जन करता येणार नाही, असा इशारा महापालिकेने दिला आहे. तर ग्रामीण भागात तर काही ठिकाणी पारंपरिक चालीरीतीनुसार गणरायांचे विसर्जन हे तलावांतच करणार, असा ठाम पवित्रा भाविकांनी घेतला आहे. अखेरीस भाविकांची नाराजी व धार्मिक अस्मिता विचारात घेत तलावांत विसर्जन करणार्या भाविकांना सूट दिली आहे.
दरम्यान, आकर्षक मखर आणि पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी आहे. विविधरंगी प्लास्टिकची फुले, देखावे, चायना लाइटने बाजारपेठा सजल्या आहेत.
पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात
यंदा गणेशोत्सवाचा जल्लोष मोठ्या आनंदाने रंगणार आहे. लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी भाविक सज्ज झाले असून, १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सवाचा जल्लोष असणार आहे. गणेशोत्सव काळात कोणाच्याही भावना तसेच अस्मिता दुखावल्या जाऊ नयेत तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये, भाविकांच्या गर्दीमुळे वाहतूककोंडी होऊ नये, याकरिता वाहतूक पोलिस सज्ज आहेत. तसेच सणासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांच्या मदतीला होमगार्ड, वेळ पडल्यास राखीव दलाच्या तुकड्या, दंगल नियंत्रण पथके तैनात केली जातील, अशी माहिती मिळत आहे.