दिनमान प्रतिनिधी
विरार|
गणेशोत्सवानंतर लगोलग नवरात्रौत्सवाचा जल्लोष मोठ्या उत्साहात वसईत रविवारपासून सुरू झाला असून, कामावरून घरी परतणारे भाविक रात्री जेवणानंतर थेट गावातील, चौकातील तसेच गल्लीबोळातील नवरात्रौत्सवाच्या ठिकाणी धाव घेऊ लागले आहेत.
नऊ दिवस गरबा आणि या नवरात्रौत्सवात आयोजित केल्या जाणार्या फॅन्सी ड्रेस स्पर्धांना भाविकांची विशेष पसंती असते. वर्षभर कामात व्यग्र असलेले नागरिक, मित्र परिवार या सणानिमित्त एकत्र येत असल्याने संवाद वाढीस लागत आहे. दरम्यान, सुट्टीच्या दिवशी (रविवार, १५ ऑक्टोबर) घटस्थापना या दिवसापासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली असून, या सणासाठी पोलिस प्रशासनदेखील चोख बंदोबस्त निभावताना दिसून येत आहेत.
वसईत नवरात्रौत्सवानिमित्त प्रसिद्ध असलेली तीर्थस्थानेही सजली आहेत. वसईतील विरार येथील जीवधन गडावरील श्री जीवदानी देवी, जूचंद्र येथील डोंगरावरील श्री चंडिका देवी मंदिर तसेच वसई तालुक्याला लागूनच असलले श्री वज्रेश्वरी तीर्थस्थान, विरार पूर्वेतील खानिवडे-चिमणे येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिर या तीर्थस्थानांच्या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता मंदिर व्यवस्थापन सज्ज झाले आहे.
सणाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, याकरिता पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. तर मंदिर व्यवस्थापनाकडून भाविकांसाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मीचे मंदिर, केळवे येथील श्री शीतला देवीचे मंदिर या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. तसेच वाडा येथील साती आसरा मंदिर आणि विविध ठिकाणची देवींची जागृत मंदिरे या ठिकाणी भाविकांचा नवरात्रौत्सवासाठी मळा फुलला आहे. वसईत पुन्हा एकदा नवरात्रीनिमित्त भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.