दिनमान प्रतिनिधी
नवी मुंबई।
वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत शौचालय घोटाळा झाला असून, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल होता. आता त्यात आणखी दोन जणांची भर पडली असून, नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. सुरेश मारू व मनीष पाटील अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, हे दोघेही शौचालय चालवणारे कंत्राटदार आहेत.
आरोपी सुरेश मारू व मनीष पाटील यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बुधवार 22 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती साहाय्यक पोलिस आयुक्त गजानन राठोड यांनी दिली आहे. मेढा मतदारसंघातील आमदार महेश शिंदे यांनी याविरोधात अधिवेशनात आवाज उठविला होता. न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन तपास करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.
फेरचौकशीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या घोाळ्याप्रकरणी दोन जणांना अटक केल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे व बाजार समितीच्या एकूण आठ जणांवर आधीच गुन्हा दाखल असल्याने आगामी हिवाळी अधिवेशनात हा घोटाळा पुन्हा एकदा गाजल्यास त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील शौचालय कंत्राटात मोठा घोटाळा झाला असल्याचे फेरचौकशीत निष्पन्न झाले आहे. तब्बल सात
कोटी रुपयांचा हा घोटाळा उघडकीस आला आहे. राष्ट्रवादीच्या वजनदार नेत्यांसह निवृत्त अधिकारी आणि सध्या कार्यरत अधिकार्यांच्या विरोधात शासनाच्या निर्देशानंतर ही तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या तपासाला आता गती आली असून, या घोटाळ्यात आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.