राम जगताप | तर्काचा घोडा
‘माझ्या प्रतिभेला न्याय देणारा सहृदय आत्मा कधी तरी, कोठे तरी भेटेलच. काळ अनंत आहे आणि पृथ्वी विपुल आहे.’, असं श्रेष्ठ संस्कृत नाटककार भवभूतिने म्हटलं असल्याचा दाखला अनेकदा दिला जातो. कुठल्याही गंभीर लेखकाने कुठला दृष्टीकोन बाळगायला हवा, यासंदर्भात भवभूतिचे हे वचन अनुकरणीय नक्कीच आहे. भवभूतिच्या काळात बहुधा विक्रीकला, जाहिरातकला, प्रसिद्धीकला आणि प्रसारमाध्यमं अस्तित्वात नसावीत. या कलांचा वापर करून निदान काही लोकांना तरी आपली दखल घ्यायला लावता येते, किमानपक्षी आपली पुस्तकं त्यांना विकत घ्यायला लावता येतात, हे भवभूतिलाही पटायला जड गेलं नसतं. पण या कला हीच मुळीच आधुनिक काळाची देणगी. त्यामुळे भवभूतिला आपल्या जाज्वल्य आत्मविश्वासाचाच आधार घ्यावा लागला. आजकालच्या साहित्यिकांना तसं करावं लागत नाही.
भवभूतिचं हे वचन ‘अक्षर’ आहे, यात काही शंका नाही. पण हेही तितकंच खरं की, आधुनिक काळात अनेक चांगले लेखक आणि त्यांची चांगली पुस्तकं मागे पडतात किंवा दुर्लक्षित राहतात. काहींची जाणता-अजाणता उपेक्षा केली जाते. याउलट अनेक सामान्य दर्जाचे लेखक आणि त्यांची त्याहून सामान्य दर्जाची पुस्तकंही काही काळ तरी नक्कीच टिकून राहतात. ती बहुतांश वेळा विक्रीकला, जाहिरातकला, प्रसिद्धीकला आणि प्रसारमाध्यमं यांच्या जोरावरच. गुणवत्तेपेक्षा भलत्याच कारणांमुळे ‘बाजारपेठ’ आणि वाचकांचा ‘मनोव्यापार’ अडवून बसलेल्या या पुस्तकामुळे अनेकदा चांगल्या पुस्तकांचे नुकसान होतं. ती मागे पडतात, दुर्लक्षित राहतात आणि मग मागेच पडत जातात. कधी कधी गुणवत्ता असूनही वाचकांच्या विस्मृतीतून नाहीशी होतात. किंबहुना ती बहुतेकदा वाचकांपर्यंतही नीट पोहचत नाहीत.
असं अनेक चांगल्या मराठी पुस्तकांच्या बाबतीत घडलेलं पाहायला मिळतं. दै. ‘लोकसत्ता’चे जवळपास 11 वर्षं संपादक राहिलेल्या आणि या दैनिकाला जनसामान्यांसह विचारी वर्गांत ही लौकिक मिळवून देणार्या अरुण टिकेकर यांच्या ‘सारांश’ या पुस्तकाबाबत तसंच घडलेलं आहे. मराठीतल्या गेल्या 20 वर्षांतल्या ‘सर्वोत्तम 20 वैचारिक पुस्तकां’ची यादी करायची ठरवलं तर, त्यात ‘सारांश’चा नंबर पहिल्या दहात नक्कीच लागेल. पण असं असूनही हे पुस्तक आजवर तसं दुर्लक्षितच राहिलेलं आहे.
हे सगळं आज सांगण्याचं कारण म्हणजे या वर्षी या पुस्तकाला 20 वर्षं पूर्ण झाली आहेत. 2001 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात ‘नेतृत्वाचे प्रशिक्षण’, ‘इतिहासाचे ओझे’, ‘साहित्याचे समाजशास्त्र’, ‘अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचे राजकारण’, ‘संस्कृतीचा अपकर्ष’, ‘जीवनशैलीचा अभाव’ आणि ‘समाजमनाचे अस्वास्थ्य’ असे सात निबंध आहेत.
1999मध्ये टिकेकरांनी ‘सारांश’ हे साप्ताहिक सदर ‘लोकरंग’ या रविवार पुरवणीत लिहायला सुरुवात केली. या सदराचं 2001मध्ये पुस्तक निघालं, तेव्हा त्याला टिकेकरांनी उपशीर्षक दिलं – ‘समकालीन समाजाच्या संस्कृतीविषयी सात निबंध’. म्हणजे सदर स्वरूपातल्या संपूर्ण लेखांची विभागणी टिकेकरांनी सात दीर्घ निबंधांत केली. आधी सदर लिहिलं आणि त्याचं पुस्तक करताना लेखांची वर्गवारी दीर्घ निबंधांत केली, असा प्रकार या पुस्तकाबाबत झालेला नाही. सदर लिहितानाच टिकेकरांनी निबंधाचे सातही विषय ठरवले होते. त्यांची साधारणपणे विभागणी केली होती. आणि त्यानुसार त्यांनी हे लेखन केलं आहे. थोडक्यात हे पुस्तक सदर स्वरूपात प्रकाशित झालेलं असलं तरी ते केवळ सदरासाठी केलेलं लेखन नाही. विसावं शतक संपत असताना टिकेकरांनी या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय समाजापुढील सात ज्वलंत समस्यांचा धांडोळा या पुस्तकाच्या माध्यमातून घेतला आहे. अगदी थेट सांगायचं तर महाराष्ट्रीय समाजाच्या ‘सामाजिक व वैयक्तिक अनारोग्या’ची कारणं आणि त्यावरील उपाय या पुस्तकातील सात निबंधांतून टिकेकरांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एकविसाव्या शतकात प्रवेश करताना त्यांनी आपल्या संस्कृतीतील सात उणिवांवर बोट ठेवलं आहे. अर्थात हे करताना टिकेकरांची भूमिका शहाजोग पंडिताची नाही की, तथाकथित विचारवंताची नाही, तर ती एका नम्र अभ्यासकाची आहे. सुरुवातीच्या प्रास्ताविकात त्याविषयी त्यांनी म्हटलं आहे आजच्या प्रत्येक सामाजिक समस्येवर माझ्याकडे तोडगा आहे, असा माझा दावा अजिबात नाही. सर्व समस्या मला ज्ञात आहेत, असाही माझा दावा नाही. जी समस्या आढळून आली व ज्या समस्येवर मला तोडगा सुचला तो देण्याचा, व जेथे तोडगा सापडला नाही, तेथे केवळ प्रश्न उपस्थित करून तोडगा शोधण्याची जबाबदारी वाचकांवर सोडण्याचा प्रयत्न मी केला आहे.
एकोणिसावं शतक हे महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या आणि सर्व क्षेत्रांतील सुधारणांचं शतक होतं. त्यामुळे आजच्या कुठल्याही प्रश्नाकडे पाहण्यासाठी, त्याचं यथायोग्य आकलन करून घेण्यासाठी त्या शतकातल्या परंपरा, आदर्श आणि प्रेरणांशिवाय पर्याय नव्हता. पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राने हा समृद्ध वारसा टाकून दिला. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर अवघ्या दोनेक दशकांतच महाराष्ट्राची वैचारिक आघाडीवर आणि सर्व क्षेत्रांत पिछेहाट झाली. त्याची साधार मांडणी टिकेकर यांनी ‘सारांश’मधून केली आहे. थोडक्यात या पुस्तकातून महाराष्ट्राच्या अवनतीची कारणपरंपरा विशद होते आणि आपण समाज म्हणून कुठल्या दिशेकडे भरकटत आहोत, याचीही यथायोग्य जाणीवही.
‘तारतम्यपूर्ण विचार’ म्हणजे काय, तो कसा करायचा असतो आणि त्यासाठीच्या परंपरा, आदर्श आणि प्रेरणा काय असाव्या लागतात, हा टिकेकरांचा एकंदर लेखनाचाच एक महत्त्वाचा विशेष आहे. तो ‘सारांश’मध्येही आहे.
या पुस्तकाचं दुसरं वैशिष्ट्य हे आहे की, हे लेख नाहीत, निबंध आहेत. मराठीमध्ये ‘निबंध’ या वाङ्मयाचा र्हास झाला आहे, अशी खंत व्यक्त करून नाटककार गो. पु. देशपांडे यांनी ‘रहिमतपुरकरांची निबंधमाला 1 व 2 (नाटकी निबंध व चर्चक निबंध)’ या नावानं 1995मध्ये दोन पुस्तकं प्रकाशित केली होती. त्यानंतर 2018मध्ये नाटककार मकरंद साठे यांची ‘निवडक निबंध- 1 व 2’ अशी दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. टिकेकरांचं ‘सारांश’ही निबंधाचे पुस्तक आहे. मुखपृष्ठावर ‘निबंध’ असा थेट उल्लेख असलेली पुस्तक मराठीत हल्ली प्रकाशित होत नाहीत. गोपुंच्या शब्दांत सांगायचं तर ‘काहीएक शिस्तशीर व जोमदार मांडणी करण्यासाठी’ आणि ‘तर्कशुद्ध पण कालसापेक्ष मांडणी करण्यासाठी’ निबंध हा वाङ्मयप्रकार हाताळला जातो. पण तशा पद्धतीचं लेखनच मराठीत दुर्मीळ झालं आहे. त्यामुळे ‘निबंध’ हा शब्दही. गोपुंनी त्याचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण त्यांच्या पुस्तकांची फारशी दखल घेतली गेली नाही, टिकेकरांच्या पुस्तकांचीही नाही आणि साठे यांची पुस्तकं प्रकाशित होऊन तीनेक वर्षंच होत आलीत. पण त्यांचीही अजून तरी विशेष दखल घेतली गेल्याचं फारसं कुठे दिसलं नाही. गोपुंनी प्रबोधनकालीन आधुनिकता मध्ये निबंधाचा उदगम असल्याचं सांगत निबंधांचा र्हास एक प्रकारे त्या आधुनिकतेचा र्हास असल्याचं म्हटलं आहे. तो र्हास नेमका काय आहे, हे या पुस्तकातील सात निबंधांमधून जाणून घेता येतं.
गेल्या 40-50 वर्षांतील भारतीय राजकारणातील राजकीय नेतृत्वाविषयी आपण सगळेच बरेचसे असमाधानी आहोत, कारण हे नेतृत्व दिवसेंदिवस उथळ, बेजबाबदार आणि भ्रष्ट होत आलं आहे. या नेतृत्वाची किमानपक्षी गुणवत्ता सुधारण्यासाठी टिकेकर आपल्या पहिल्याच निबंधात ‘नेतृत्वाच्या प्रशिक्षणा’चा उपाय सुचवतात. राजकारण्यांविषयीची आपली मतं गेल्या काही वर्षांत इतकी कलुषित आणि नकारात्मक झाली आहेत की, टिकेकरांचा उपाय आपल्यापैकी किती जणांना आवडेल माहीत नाही. पण त्यांच्या उपायानं या नेतृत्वाचा गुणात्मक दर्जा नक्की वाढू शकतो. दुसरा निबंध आहे ‘इतिहासाचे ओझे’. महाराष्ट्राच्या मानगुटीवर इतिहास नावाचा समंध बसला आहे, याचा इशारा त्र्यं. शं. शेजवलकरांनी साठच्या दशकात एक घणाघाती लेख लिहून दिला होता. त्याचा एक प्रकारे उत्तरार्धच टिकेकरांनी या निबंधांतून सांगितला आहे. इतिहासाचा समंध आपल्या मानेवरून उतरल्याशिवाय, किमान पक्षी त्याला खांद्यापर्यंत खाली आणल्याशिवाय तरुणोपाय नाही, याची निर्वाळा या निबंधांतून मिळतो.
‘साहित्याचे समाजशास्त्र’ हा तिसरा निबंध साहित्य आणि समाज यांचे परस्परसंबंध आणि वाङमयीन महत्ता कशाच्या जोरावर मिळवता येते, याविषयी मार्गदर्शन करतो. मराठी साहित्यातल्या धुरिणांनी हा निबंध आवर्जून वाचला पाहिजे. कारण त्यातून शेष्ठ वाङमयीन परंपरा कशाच्या जोरावर निर्माण होतात आणि त्यांचं सामाजिक महत्त्व नेमकं काय असतं, हे जाणून घेता येते. टिकेकरांची ही मांडणी प्रा. रा. ग. जाधव यांच्या साहित्य-समीक्षेला समांतर म्हणावी अशी आहे.
‘अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचे राजकारण’ हा चौथा निबंध गेल्या काही वर्षांत अभिव्यक्ती-स्वातंत्र्याच्या नावाखाली जो स्वैराचार माजला आहे, त्याची चिकित्सा करून स्वातंत्र्य, अभिव्यक्ती या संकल्पना आणि त्यांच्या मर्यादाही स्पष्ट करतो. या संकल्पनांचा सतत पुनरुच्चार करणार्या बहुतेकांना त्या नीट समजलेल्याच नसतात, याचाही पुरावा या निबंधातून मिळतो. ‘संस्कृतीचा अपकर्ष’ हा या पुस्तकातला पाचवा निबंध. समाज आणि संस्कृतीचा अनुबंध स्पष्ट करत टिकेकरांनी या निबंधातून महाराष्ट्राची सामाजिक प्रगती आणि सांस्कृतिक प्रगती यांचा आलेख मांडला आहे. संयुक्त महाराष्ट्रानंतर ‘महाराष्ट्र-संस्कृती’चा सातत्यानं अपकर्षच होत आला आहे, तो का, याची टिकेकरांनी केलेली चिकित्सा काहीशी सडेतोड असली तरी ती तितकीच अंतर्मुख करणारीही आहे. ‘जीवनशैलीचा अभाव’ आणि ‘समाजमनाचे अस्वास्थ्य’ हे अनुक्रमे सहा आणि सात क्रमांकाचे निबंध. महाराष्ट्रातील बहुतेक विचारी, सुशिक्षित आणि विचारक्षम (‘इंटेलेक्च्युअल’ या इंग्रजी शब्दासाठी टिकेकर हा मराठी पर्यायी शब्द वापरतात, तर ‘थिंकर’साठी ‘विचारवंत’ हा शब्द वापरतात!) व्यक्तींना जीवनविषयक विचारांची निश्चितीच करता येत नाही, त्यामुळे त्यांची जीवनशैली बिघडलेली असते. अशी माणसं समाजाच्या दृष्टीनं हितकारक न ठरता, अपायकारकच कशी ठरतात, याविषयी टिकेकर या निबंधात सांगतात. तर ‘समाजमनाचे अस्वास्थ्य’ या शेवटच्या निबंधात समाजाचे सांस्कृतिक मापदंड बदलल्यामुळे महाराष्ट्रीय समाजात कशा विकृती निर्माण झाल्या आहेत, याची मांडणी आहे.
पहिल्याच निबंधात टिकेकरांनी ‘तत्त्वहीन राजकारण’, ‘नीतीमत्तारहित व्यापार’, ‘कष्टाविना संपत्ती’, ‘चारित्र्याविना शिक्षण’, ‘मानवतेविना विज्ञान’, ‘विवेकहीन सुखोपभोग’ आणि ‘त्यागरहित भक्ती’ या म. गांधींनी सांगितलेल्या सात सामाजिक पापकर्मांचा उल्लेख केला आहे. ही पापकर्मे हीच आपल्या सर्वक्षेत्रीय अधोगतीची जननी आहे. त्याचा निर्वाळा या पुस्तकातून मिळतो.
कुठलंही पांडित्य प्रदर्शन न करता, शहाजोगपणा चा आव न आणता, कुणाहीबद्दल तुच्छता न बाळगता आणि कुठल्याही विचारसरणीच्या कुबड्या न घेता, टिकेकरांनी निव्वळ बुद्धिवादी दृष्टीकोनातून महाराष्ट्रीय समाजातील उणिवांवर या पुस्तकाच्या माध्यमातून नेमकेपणानं बोट ठेवलं आहे. हे लेखन सदर स्वरूपात प्रकाशित झालं 1999 साली. आधीचा 30-40 वर्षांचा महाराष्ट्रीय समाज टिकेकरांनी पाहिलेला होता. त्याच्याविषयीच्या चिंतनातून त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. ते प्रकाशित होऊन आता 20 वर्षं उलटली आहेत. पण आजही हे सगळेच प्रश्न तेवढेच, किंबहुना कालच्यापेक्षाही जास्त अक्राळविक्राळ झाले आहेत. ज्यांना ते समजून घ्यावेसे वाटते, त्यांनी या पुस्तकाच्या वाटेला जरूर जावं.
पुण्या-मुंबईतल्या काही आळशी लोकांनी ‘टिकेकर बोजड लिहितात, त्यांची भाषा फार क्लिष्ट असते’ असा एक गैरसमज प्रचलित केलेला आहे. त्यांना आपल्यासह आपल्या समाजातील उणिवा जाणून घ्यायच्या असतील, तर त्यांनी हे पुस्तक दोनदा वाचावं. पहिल्यांदा, त्यातील विचारांसाठी आणि दुसर्यांदा टिकेकर यांच्या भाषेची प्रगल्भता आणि सौष्ठव समजून घेण्यासाठी. म्हणजे मग त्यांचा गैरसमजही गळून पडायला मदत होईल.
[email protected]
सुंदर परिचय राम सर!
दुर्दैवाने अशी पुस्तके बाजारात उपलब्ध नसतात. तुमच्या या लेखामुळे हे पुस्तक पुन्हा वाचकांच्या भेटीस येण्याची शक्यता वाढली आहे. उपलब्ध झाले तर हे पुस्तक अवश्य घेईन