ग्रंथविश्व | अस्मिता प्रदीप येंडे
थकूनभागून घरी आल्यावर हातात गरमागरम चहा आणि सोबत खमंग पदार्थ मिळाला तर तो क्षण म्हणजे स्वर्गसुखच नाही का! निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी, शारीरिक शक्ती मिळवण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. आपण सगळेच जी मेहनत करतो ती त्या अन्नासाठीच. घरातील गृहिणी ही काळजीने विविध पदार्थ बनवून आपल्या कुटुंबीयांना खाऊ घालते. आपल्या घरातील व्यक्तींच्या खाण्याच्या आवडीनिवडी जपत असताना त्यांना सकस आणि पोषक अन्न कसे देता येईल, या दृष्टीने स्त्री विचार करते. घरातील ज्येष्ठांच्या तसेच लहान मुलांच्या स्वास्थ्यासाठी योग्य काय याचा सारासार विचार गृहिणी करीत असते. घरातील पोळी- भाजी, वरण-भात यासोबतच जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ घरात बनवून कुटुंबीयांना खुशीत ठेवत असते. प्रेमाचा मार्ग पोटातून जातो म्हणतात ते काही खोटे नाही.
हल्लीच्या पिढीला सगळं इंस्टंट लागतं. तरुण पिढी फास्ट फूड, चायनीज, पंजाबी, थाय, कॉन्टिनेंटल, इटालियन खाद्य संस्कृतीकडे आकर्षित होताना दिसतात. आपल्या घरातील पारंपरिक खाद्यपदार्थ, न्याहारीचे पदार्थ पुढील पिढीला माहीत असावेत, यासाठी ते पदार्थ घरात बनवले गेले पाहिजेत. खाद्यसंस्कृती ही आपापल्या ठिकाणची संस्कृतीची, प्रदेशाची ओळख असते. आपले पारंपरिक पदार्थ जपण्यासाठी पिढ्यान्पिढ्या ती परंपरा जपली गेली. आधीच्या पिढीने ती जपली म्हणून ती आपल्यापर्यंत पोहोचली. गृहिणी जेव्हा एखादा पदार्थ बनवते तेव्हा त्यात तिच्या भावना, प्रेम सर्व ओतत असते. त्यामुळे घराच्या पदार्थाची चव ही निराळीच असते, हो ना!
आजवर अनेक पाककृतींच्या पुस्तकांनी गृहिणींना आणि नववधूंना मार्गदर्शन केले आहे. पण आता ज्या पुस्तकाविषयी आपण जाणून घेणार आहोत, ते फक्त पाककृतीचं पुस्तक नाही तर आजी आणि नातवंडं यांच्यातील निरागस, प्रेमळ नात्याचं प्रतिबिंब असणारे तसेच एक प्रेमळ, समंजस, कर्तव्यनिष्ठ आई, आजी या भूमिका निभावणार्या अस्सल गृहिणीचा थोडक्यात जीवनपटच अनुभवता येणारे पुस्तक म्हणजे लेखिका मंदाकिनी रघुनाथ तांबवेकर लिखित ‘आज्जीऽऽऽ भूक लागली!’
‘आज्जीऽऽऽ भूक लागली!’ हे पुस्तक अर्थात पाककृतींचं असून हे पुस्तक लेखिकेची नात संध्या रेणुकांबा यांनी संपादित केले आहे. आपल्या आजीच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त तिला आदरांजली म्हणून आजीने लिहिलेल्या पाककृतींचं पुस्तक करावे आणि तिच्या आठवणी जपाव्यात या हेतूने संध्या रेणुकांबा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आजीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आपल्या नातीच्या लग्नानिमित्त भेट म्हणून मंदाकिनी तांबवेकर यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात पाककृती लिहून दिल्या. त्याच पाककृतींचा समावेश पुस्तकात केलेला आहे.
आजीसाठी नातवंडं म्हणजे दुधावरची साय असते. आपल्या नातवंडांचे सगळे हट्ट आजी पुरवत असते. छान छान पदार्थ करून खायला देते आणि ती आजीसुद्धा वयोमान विसरून विविध पदार्थ शिकते. संध्या यांच्या आईवडिलांच्या कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे संध्या आणि त्यांची भावंडे आजीच्या सहवासात राहिली. शाळेतून घरी आल्यावर आजीला भूक लागली आहे, असे सांगितल्यावर आजी खमंग पदार्थ करून खाऊ घालायची. या आठवणी मनात किती रुंजी घालतात, हे पुस्तकाच्या सुरुवातीला असलेल्या मनोगतातून समजते. हे प्रसंग वाचताना प्रत्येकाला आपली आजी आठवत राहते! या पुस्तकात विविध खाद्यपदार्थांच्या पाककृती समाविष्ट केलेल्या आहेत. सूटसुटीत वाक्यरचना, सोपी भाषा आणि पदार्थ बनवण्याची सोपी आणि पारंपरिक पद्धती, आटोपशीर लेखन यामुळे पुस्तक वाचताना किंवा समजून घेताना किंचितही गोंधळ होत नाही. विविध प्रकारच्या भाज्या, आमट्या, लोणची, गोड पदार्थ, पराठे, चटण्या, पुरी, उसळी, लाडू, खीर ह्या आणि आणखी भरपूर पदार्थांच्या पाककृती यात दिलेल्या आहेत. 202 पाककृती फक्त अनुक्रमणिका पाहिली तरी कोणकोणत्या पाककृतींच्या नावांचा उल्लेख करावा, हेच कळेनासे होते.
पारंपरिक पदार्थांसोबतच बदलत्या काळानुसार आलेले नवनवीन पदार्थ, फास्ट फूड, स्नॅक्ससुद्धा मंदाकिनी तांबवेकर सहजपणे बनवत असत. याची प्रचिती पुस्तक वाचताना येते. ब्रेड पिझ्झा, सँडविच, पावभाजी, ब्रेडरोल, डोसा, इडली, बिना ओवनचा रवा केक इत्यादी पदार्थ त्या काळी हॉटेलमध्येही सहसा मिळत नसत.ते नवे पदार्थ बनवण्यास त्या शिकल्या. काळासोबत जगण्याची आणि नवे बदल स्वीकारण्याची त्यांची मनोवृत्ती खरंच वाखाणण्याजोगी आहे.
यातील काही काही पदार्थ हल्ली वेळेअभावी बनवले जात नाहीत, कालबाह्य होऊ लागले आहेत, अशा पदार्थांच्या कृतीसुद्धा यात दिल्या आहेत, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. पौष्टिक आणि सकस पदार्थांचा समावेश आपल्या जेवणात असायला हवा आणि आपले मराठमोळ्या पारंपरिक पदार्थांची परंपरा आपण जपायला हवी, हा मोलाचा संदेश देणारे हे पुस्तक आहे. आकर्षक मुखपृष्ठ, रंगीत छायाचित्रे, उत्तम पुस्तक बांधणी, रंगीत छपाई यामुळे पुस्तक आणखी आकर्षक झाले आहे.
आज्जीऽऽऽ भूक लागली!
लेखिका मंदाकिनी तांबवेकर संपादन : संध्या रेणुकांबा
उद्वेली बुक्स
मूल्य – 600/-
अस्मिता प्रदीप येंडे