दिलीप ठाकूर | चित्रपट समीक्षक | एन्टरटेन्मेट
शालेय वयात असताना पहिल्यांदा मी हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘नमक हराम’ (रिलीज २३ नोव्हेंबर १९७३. पन्नास वर्षे झालीदेखील) पाहिला तेव्हा राजेश खन्नाच्या अखंड/प्रचंड प्रेमात होतो. अहो, ते दिवस राजेश खन्नाचं दिसणं/असणं/पाहणं/ मॅनॅरिझम/अभिनय याच्या हिस्टेरियाचे होते. आवडत्या हीरोचा पिचर आवडायलाच पाहिजे हा आपल्याकडील फॅन्सचा सर्वकालीन लोकप्रिय अलिखित नियम.
काही वर्षांनी मॅटिनी शोला पुन्हा राजेश खन्नासाठीच ‘नमक हराम’ पाहिला आणि अमिताभ बच्चनच्या अभिनयाने विलक्षण प्रभावित होऊन बाहेर पडलो. कॉलेज कॅन्टीनमध्ये आम्ही मित्र राजेश खन्ना सरस की अमिताभ यावर एक कटिंग चायवर आपसात भांडत असू. मी
कधी राजेश खन्नाच्या तर कधी अमिताभच्या बाजूने असे. असं का ते सांगता येणार नाही.
आमच्या दक्षिण मुंबईतील कोणत्याही थेटरात रिपीट रन अथवा मॅटिनी शोला ‘नमक हराम’ लागला रे लागला की मी धावत जात असे. व्हिडीओ युगात मित्राकडचा व्हीसीआर आपलाही असे हक्काने मानतच ‘नमक हराम’ची कॅसेट दहा रुपये दिवस या फीनुसार आणत असे.
पुनःपुन्हा ‘नमक हराम’ पाहताना लक्षात आले, मैत्रीच्या गोष्टीवरील या चित्रपटात बरेच काही आहे. वयानुसार चित्रपट अधिकाधिक समजत जातो तो हा असा.
‘नमक हराम’ आणखी बरेच काही आहे.
आरएसजे कम्बाइन या चित्रपट निर्मिती संस्थेचा हा चित्रपट. (राजाराम, सतीश वागळे, जयेंद्र पंड्या या नावाचा शॉटफॉर्म म्हणजे आरएसजे)
इंग्लिश रंगभूमीवरील ‘बेकेट’ या नाटकावर आधारित गुलजार आणि डी. एन. मुखर्जी यांनी ‘नमक हराम’ लिहिल्याचा संदर्भ सर्वज्ञात आहे. याच गोष्टीवर ‘बेकेट’ आणि ‘बेईमान’ अशी दोन नाटके मराठी रंगभूमीवर आली आणि गाजलीही. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात दक्षिणेकडील चित्रपट दिग्दर्शक श्रीधर हे दिलीपकुमार व राजकुमार यांना घेऊन या थीमवर चित्रपट निर्माण करणार ही फक्त बातमीच राहिली.
मध्यवर्ती कथा-आशय असा – सोमनाथ अर्थात सोमू (राजेश खन्ना) आणि विक्रम अर्थात विकी (अमिताभ बच्चन) अतिशय जिगरी दोस्त. दोघांच्या मैत्रीमध्ये त्यांच्यातील आर्थिक विषमता येत नाही. सोमू आपल्या आई (दुर्गा खोटे) आणि बहिणीसोबत गरिबीत राहतोय. विकी एका उद्योगपतीचा (ओम शिवपुरी)चा मुलगा. विकी सोमूच्या घरखर्चाला हातभार लावतो. दोघांसाठी एकाच पद्धतीचे शर्ट घेतो. विकीच्या वडिलांना हृदयविकाराचा धक्का आल्याने विकी आपली फॅटरी सांभाळण्यासाठी मुंबईत येतो. दुर्दैवाने त्याला एका प्रकरणात कामगार नेते बिपीन लाल (ए. के. हनगल) यांची माफी मागावी लागते. विकीसाठी हा मोठा धक्का असतो. तो या अनुभवाने फार दुखावतो. सोमूला हे सांगताना त्याच्या डोळ्यात आलेल्या अश्रूने सोमू त्याच्याकडे मदतीचा हात पुढे करतो. तो चंदर नाव धारण करून विकीच्या फॅटरीत कामाला लागतो. चंदरचे ध्येय असते कामगारांचा विश्वास संपादन करून बिपीन लाल यांना पुरते नामोहरम करणे. विकीची तीच तीव्र इच्छा असते. पण चंदर जस जसा कामगारांच्या सुखदुःखात सहभागी होतो. त्यांचे छोटे जग, त्यातील आशा, अपेक्षा, इच्छा, निराशा यांची त्याला कल्पना येते. तो विकीला सांगतो, की एखाद्या कामगाराला कधी नावाने हाक मार, त्याची विचारपूस कर. त्याला कसा आनंद होतो बघ. चंदरचे कामगारांत रमणे मालकापर्यंत पोहोचते. त्यासाठी त्यांचा चमचा अर्थात खबरी (मनमोहन) उपयोगी पडतो. चंदर हा आपला नाही तर ‘मालिक का चमचा’ आहे हे लक्षात येताच कामगार त्याला बेदम मारतात. हे समजताच विकी संतापून कामगार वस्तीत शिरतो आणि त्वेषाने ओरडतो, ‘कौन हैं वो मायका लाल, जिसने मेरे सोमू पर हाथ उठाया… अगर हैं खून में मस्ती आ मैदान में|’ हाऊसफुल्ल थेटरात यावर प्रचंड टाळ्या, शिट्ट्या.
चंदरचे अपघाती निधन घडवून आणण्यात मालक यशस्वी ठरतो आणि आपल्या मित्राच्या मृत्यूला आपण जबाबदार आहोत असे मानतच विकी तुरुंगात जातो. तो शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर येतो, या दृश्याने चित्रपट सुरू होतो.
चित्रपटाच्या श्रेयनामावलीतील लाल रंग हळूहळू मोठा होत जातो आणि अखेर पडदा व्यापतो याचा अर्थ ते लाल क्रांतीचे प्रतीक आहे, असे मानले जाते.
‘नमक हराम’ घोषणेपासूनच गाजला. ‘आनंद’ (१९७१) नंतर हृषिदांनी एकाच वेळेस ‘अभिमान’ (रिलीज २७ जुलै १९७३) आणि ‘नमक हराम’ अशा दोन चित्रपटांवर काम सुरू केले. राजेश खन्ना एकाच वेळेस अनेक चित्रपटांत बिझी असल्यानेच हृषिदांनी अमिताभवरच्या अनेक दृश्यांचे शूटिंग सुरू केले. हृषिदांसाठी राजेश खन्ना डेट्स बाजूला काढे तरी त्याला सेटवर यायला उशीर होत असे. एकदा त्याची वाट पाहून हृषिदांनी सेटवरच बुद्धिबळाचा डाव मांडला आणि राजेश खन्ना उशिरा आल्यानंतरही त्यांनी तो पूर्ण झाल्यावर शूटिंग सुरू केले.
बरेचसे शूटिंग झाल्यावर हृषिदांनी वितरकांना काही दृश्ये दाखवली तेव्हा त्यांना वाटले, या चित्रपटात अमिताभ हीरो आणि राजेश खन्नाची छोटी भूमिका आहे. अमिताभचा तो पडता काळ असल्याने वितरकांचा फक्त हृषिदांवर विश्वास होता. प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ (रिलीज ११ मे १९७३) सुपर हिट झाला आणि अमिताभ बच्चन या नावाभोवती वलय आणि वजन वाढले. त्याच यशात ‘अभिमान’ही आला. वक्त बदलने में देर नहीं लगता अशा हिंदी चित्रपटातील हुकमी डायलॉगसारखं झालं. यश चोप्रा दिग्दर्शित ‘दाग’ (रिलीज २७ एप्रिल १९७३) यशाने राजेश खन्ना फॉर्मात होता. अशातच ‘नमक हराम’ची ध्वनिमुद्रिका प्रकाशित होताच राजेश खन्ना, किशोरकुमार, आनंद बक्षी आणि राहुल देव बर्मन या सुपर हिट चौकडीची दिये जलते हैं फूल खिलते हैं, नदीया से दरीया, मैं शायर बदनाम ही गाणी बिनाका गीतमालापासून इराणी हॉटेलमधील ज्यूक बॉसपर्यंत सगळीकडेच हिट.
‘नमक हराम’च्या नॉव्हेल्टी थिएटरवरील प्रीमियरला गर्दीचा वेढा पडला. राजेश खन्नाच्या चित्रपटाच्या प्रीमियरचे हे हुकमी चित्र. आता त्यात अमिताभच्या चाहत्यांची भर पडली होती.
प्रीमियरनंतर दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधील पार्टीत राजेश खन्ना जाणीवपूर्वक उशिरा पोहोचला (प्रीमियरनंतर तो आपली गाडी उगाच इकडेतिकडे फिरवत होता अशी खबर गाजली.)पब्लिकने फर्स्ट शोपासून पिचर उचलला. पण ते होतानाच राजेश खन्नाच्या फॅन्सना लक्षात आले, अमिताभचे अस्तित्व फार जाणवतेय. मीडियात यावरून उलटसुलट चर्चा रंगली. काही किस्से रंगले. अमिताभ आपल्याला भारी पडतोय हे लक्षात येताच राजेश खन्ना जाणीवपूर्वक सेटवर उशीराच येई. आल्यावर वारंवार रिटेक घेई, कुठून तरी अमिताभ कंटाळून जावा असा त्याचा हेतू होता, हे तर कायमच गाजलेले. अमिताभने हृषिदांना आपल्याविरुद्ध भडकावले हा राजेश खन्नाचा आरोपही गाजला.
चित्रपटाच्या शेवटी सोमूचा मृत्यू की विकीचा हे हृषिदांनी चित्रपट पूर्ण होत आला तरी लपवून ठेवले. ते फक्त गुलजारना माहीत होते. राजेश खन्नाची अपेक्षा होती आपल्या व्यक्तिरेखेचा मृत्यू म्हणजे पिचर हमखास हिट. (‘सफर’ वगैरे) अमिताभला वाटत होते, विकीचा मृत्यू दाखवावा. हृषिदा म्हणाले, उद्या सेटवर आल्यावर ज्याच्या फोटोला हार घातलेला दिसेल त्याचा चित्रपटात मृत्यू असेल. दुसर्या दिवशी सकाळीच अंधेरीतील मोहन स्टुडिओत राजेश खन्नाच्या फोटोला हार दिसला. हे अमिताभला न आवडल्याने तो काही दिवस हृषिदांशी बोलत नव्हता. पिचर हिट झाल्यावर अमिताभची तारीफ वाढताच तो सुखावला. यश असे अनेक बाबतीत टॉनिक देत असतेच. विकीची व्यक्तिरेखा शीघ्रकोपी असल्याचे प्रेक्षकांना कदाचित रुचणार नाही, अशीही अमिताभची भीती त्याच्या चिडण्याला थेटरात भारी रिस्पॉन्स मिळताच कुठे गेली हे त्यालाही समजले नाही. पब्लिक हैं, वो सही रिस्पॉन्स देती हैं…
राजेश खन्नाच्या चरित्रातील यावरचा किस्सा बरंच काही सांगतो. लिबर्टीतील मिनी थिएटरमधील खास त्याच्यासाठीची ‘नमक हराम’ची ट्रायल संपताच तो हृषिदांना म्हणाला, एक नये सुपर स्टार ने जन्म लिया हैं, मेरा टाईम खत्म हुआ… स्वत:ची वाटचाल आणि दुसर्याचं यश याकडे अशा खिलाडूवृत्तीने राजेश खन्नाने पाहिलं, पण गॉसिप्स मॅगझिनमधून याची चर्चा न होता इतरच गोष्टी चघळल्या गेल्या.
हृषिदांनी ‘नमक हराम’नंतर राज कपूर व राजेश खन्नाच्या ‘नौकरी’ (१९७९) वर काम सुरू केले. पण पिचर फारच रखडले. नि पडद्यावर येताच पडलेही. अमिताभसोबत हृषिदांनी याच काळात ‘मिली’, ‘बेमिसाल’, ‘जुर्माना’, ‘आलाप’ हे चित्रपट केले.
‘नमक हराम’चा प्रवास पाहताना मला कुठेतरी असे वाटते, की हृषिदांनी कळत- नकळतपणे अमिताभला झुकते माप दिले. चित्रपट फ्लॅशबॅकने सुरू न होता लायमॅसला सोमूचा मृत्यू दाखवला असता तर इम्पॅट जास्त राहिला असता. चित्रपट विकीच्या व्यक्तिरेखेतून सुरू होतो याचाच अर्थ तोच या गोष्टीचा नायक असाही होतो. आणि मित्राच्या मृत्यूची जबाबदारी तो घेतो याचाच अर्थ तो हीरो ठरतो. अमिताभला साहाय्यक भूमिकेचा फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाला हा ‘विजय’च.
चित्रपटात रेखा आहे, पण गोष्टीत ती तेवढ्यात तेवढीच आहे. कामगार वस्तीत चंदरच्या शेजारी राहणारी नटखट तिखट श्यामा. एकदा विकी या वस्तीत आल्यावर तिला पाहतो आणि तिच्या रूपावरून सोमूला छेडतो. चिडवतो. याशिवाय चित्रपटात सिमी गरेवाल (एका दृश्यात ती विकीला म्हणते, तुम्हारे चिल्लाने में रोने की आवाज आती हैं). असरानी (कामगार धोंडू), वगैरे कलाकार आहेत. त्यात शेरोशायरीमध्ये रमणारा रझा मुराद भाव खाऊन जातो. जीने की आरजू में मरने जा रहे हैं लोग, मरने की आरजू में जीने जा रहा हू मैं… दो जाम या गम दे तुमको, शराब भी पी जाती हैं और आंसू भी पी जाते हैं… फूटपाथ पर सड़क ही हैं आशिया हमारा, रहने को घर नहीं सारा जहां हमारा… जिगर की चोट हैं दोस्त दौराही नहीं जाती, लपट हैं आग की होठों पे फिर लायी नहीं जाती. रझा मुरादने असं काही उच्चारवात हे साकारले, या चित्रपटाने ओळख दिली. अंतराअंतराने हे शेर येतात. मैं शायर बदनाम हे गाणेही खरंतर रझा मुरादवर चित्रित होणार होते. पण राजेश खन्नाने ते आपल्यावर वळवून घेतले, हाही एक भारी किस्सा.
राजेश खन्नानेही गुलजार यांच्या संवादाना अतिशय अर्थपूर्णरीत्या साकारलंय. बारिश की बूंदों से डरनेवाले तुफान का मुकाबला नहीं कर सकते…जिस दिन एक मजदूर काम पर नहीं आता, उसके घर पर चूल्हा नहीं बल्कि उसका पेट जलता हैं… जहां यार नहीं वहां प्यार नहीं, जहां प्यार नहीं वहां यार नही… अमिताभही एकदा हमे खिलाने वाले हाथ अभी पैदा नहीं हुये या संवादात टाळ्या तर कौन हैं वो मायका लाल… अख्खं थिएटर आपलसं करतो.हा एक संवाद अमिताभ बच्चनचं युग आणण्यास वेग लावणारा ठरलाय.
‘नमक हराम’ची पन्नाशी अशी बहुस्तरीय आणि बहुचर्चित. एका लासिक चित्रपटाचे उत्तम व्यावसायिक यश हेच. मुंबईत मेन थिएटर नॉव्हेल्टीत रौप्यमहोत्सव साजरा करतानाच चित्रपटाबाबत सतत कसली ना कसली चर्चा होत राहिली. ती पन्नास वर्षे आजपर्यंत सुरूच आहेत.
यानिमित्त पुन्हा एकदा ‘नमक हराम’ पाहतो.