दिनमान प्रतिनिधी
भिवंडी।
तालुक्याच्या टेंभिवली गावात वीटभट्टीसाठी लागणारा दगडी कोळसा एका अवजड ट्रकमधून खाली केला जात होता. त्यावेळी अचानक ट्रकच्या मागील बाजूच्या ट्रॉलीचा कॉम्प्रेसर रॉड तुटल्याने संपूर्ण ट्रॉली कोळशासह वीटभट्टी मजुराच्या गवताच्या झोपडीवर कोसळली. या दुर्घटनेत आदिवासी मजुराच्या झोपडीत झोपलेल्या तीन बालिकांचा कोळशाच्या ढिगार्याखाली सापडून करुण मृत्यू झाला. लावण्या 7 वर्ष, अमिषा 6 वर्ष आणि प्रीती आणि दोन वर्ष अशी या बालिकांची नावे आहेत. आदिवासी वीटभट्टी मजूर बाळाराम कान्हा वळवी यांच्या त्या मुली होत्या. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने इतर कामगार घटनास्थळी धावून आले. त्यांनी कोळशाच्या ढिगार्याखालून सर्व मुलींना बाहेर काढले. परंतु तोपर्यंत गुदमरून या मुलींचा जीव गेला होता.
भिवंडी तालुक्यातील दुगाडफाटा, मोहिली येथील बाळाराम वळवी हे आपल्या पत्नी चार मुलींसह वीटभट्टी मजुरीसाठी आपल्या मूळ गावाहून स्थलांतरित होऊन तालुक्यातील टेंभिवली गावात गोपीनाथ मढवी व त्यांचा मुलगा महेंद्र मढवी यांच्या वीटभट्टीवर मजुरीसाठी आले होते. वीटभट्टी परिसरतील कसाड्याच्या भोंग्यात (गवताच्या झोपडीत) हे मजूर कुटुंब वास्तव्यास होते. त्याच्या झोपडीलगतच्या मोकळ्या जागेत वीटभट्टी पेटविण्यास आवश्यक दगडी कोळसा साठविला जात असे.
नेहमीप्रमाणे कोळसा घेऊन आलेला भलामोठा हायड्रॉलिक हायवा ट्रक रिकामा करण्यासाठी मागील बाजूकडील ट्रॉली उचलण्यात आली. यावेळी त्याखालील कॉम्प्रेसर रॉड तुटल्याने ट्रॉलीतील कोळशासह ट्रॉली कोसळली व त्यातील कोळसा नजीकच्या बाळाराम वळवी यांच्या झोपडीवर पडल्याने झोपडीत एका कोपर्यात जमिनीवर झोपलेल्या तीनही मुली या ढिगार्याखाली गाडल्या गेल्या. यावेळी शौचालयास गेलेले बाळाराम, झोपडीबाहेर चुलीवर जेवण करणारी पत्नी व झोळीत झोपलेली दोन वर्षांची कीर्ती हे बचावले.
शौचालयास गेलेले बाळाराम, झोपडीबाहेर चुलीवर जेवण करणारी पत्नी व झोळीत झोपलेली दोन वर्षांची कीर्ती हे बचावले. या दुर्घटनेनंतर भिवंडी तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वीटभट्टी मजुराच्या तक्रारीवरून वीटभट्टी मालक गोपीनाथ मढवी, मुलगा महेंद्र मढवी, व्यवस्थापक सुरेश रामदास पाटील, ट्रकचालक तौफिक शेख यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मढवी व व्यवस्थापक सुरेश पाटील यांना अटक करण्यात आली असून, त्यांना 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.