भोली सुरत दिल के खोटे हे मास्तर भगवान यांचे गाजलेले गीत, त्यांनाही फिल्म इंडस्ट्रीतील खोट्या चेहर्यांचा फटका बसेल असे तेव्हा कुणाला वाटले होते? डोळ्यांत स्वप्न, कष्ट करण्याची ताकद आणि धाडस या जोरावर कोणीही हिंदी चित्रपटसृष्टी काबीज करू शकतो, हे मात्र त्यांनी तमाम मराठी माणसांना दाखवून दिले.
दादरच्या हिंदमातापासून अवघ्या पाच-सात मिनिटांच्या अंतरावर ‘लल्लूभाई मॅन्शन’ उभी आहे. या इमारतीने एका तार्याचा उदय आणि अस्तही पाहिला आहे. त्याचे नाव मास्टर भगवान ऊर्फ भगवानदादा.
एका गिरणी कामगाराचा, आबाजी पालव यांचा हा मुलगा. चाळीत राहणारा. परळ-दादरमध्ये बालपण गेलेले. शिक्षण तसे कमीच चौथीपर्यंत. घरची परिस्थितीही बेतास बात; पण त्याच्या मोठमोठ्या डोळ्यांत स्वप्ने होती आकाशाला गवसणी घालण्याची, सिनेमाच्या चमचमत्या दुनियेतील तारा बनण्याची. त्याच्या नजरेसमोर आदर्श होता मास्टर विठ्ठल यांचा. मूकपटातील गाजलेले अभिनेते ते. तेव्हाचे ही मॅनच. इंडियन डग्लस म्हणायचे त्यांना. त्यांची बलदंड शरीरयष्टी, त्यांच्या चित्रपटांतील त्या हाणामार्या यांचे मोठे आकर्षण होते भगवानदादांच्या मनात. शाळा सुटलेली होती, व्यायामशाळा सुरू झाली होती. मास्टर विठ्ठल यांच्यासारखे बलदंड व्हायचे होते त्यांना. त्या काळात छोटी-मोठी कामे करायचे ते आणि त्यातून वेळ काढून चित्रपटांचे स्टुडिओ गाठायचे, कोणी काम देईल या आशेवर.
ते ज्या गिरणगावात राहत होते, तो अवघा भाग तेव्हा राजकीय विचारांनी भारलेला होता. दादांनाही त्या विचाराने आकर्षित केले होते. राष्ट्र सेवा दलाची पूर्वसुरी असलेल्या हिंदुस्थानी सेवा दल या संघटनेचे काम ते करीत असत. 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहातही त्यांनी भाग घेतला होता. त्याच वर्षी त्यांना एका मूकपटात काम मिळाले. ‘सिराज अली हकीम’ या चित्रपट निर्मात्याने त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांना संधी दिली. व्हिक्टर ह्युगोच्या ‘द हंचबॅक ऑफ नोत्र-डाम’ या कादंबरीवर आधारलेल्या ‘बेवफा आशिक’ या चित्रपटातील कुबड्या तरुणाची विनोदी भूमिका त्यांनी साकारली. ती इतकी जमून गेली होती की, पुढे सहा महिने त्यांना काम मिळेना. लोक त्यांना खरोखरच कुबडा समजत होते.
पुढे त्यांना मूकपटात कामे मिळत गेली आणि 1934 मध्ये ते बोलपट निर्मितीत उतरले. त्या पहिल्या चित्रपटाचे नावही मोठे समर्पक होते हिंमत-ए-मर्दा. त्यानंतर त्यांनी हंसा वाडकर यांच्याबरोबर ‘बहादूर किसान’ या चित्रपटात काम केले. तो चित्रपट गाजला. त्या चित्रपटात त्यांचे सहायक होते रामचंद्र चितळकर तथा सी. रामचंद्र. त्यांना संगीतकार म्हणून पहिला ब्रेक दिला तो भगवानदादांनी. त्या चित्रपटाचे नाव होते ‘अलबेला.’
साल 1951. त्यात दादांची नायिका होती गीता बाली. प्रचंड गाजला हा चित्रपट. त्यातील ‘भोली सूरत दिल के खोटे’, ‘शोला जो भडके’, ‘धीरे से आजा रे अखियन में’ या गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि त्यातील दादांची नृत्यअदा; ती तर ‘आयकॉनिक’ बनली. या चित्रपटाने दादांना नामवंत केले, श्रीमंत केले. ऐश्वर्य इतके मिळाले की आता या चाळकरी तरुणाच्या मालकीचा जुहूत समुद्रकिनारी 25 खोल्यांचा बंगला होता. दारात सात मोटारींचा ताफा होता. आठवड्यातील प्रत्येक वारी वेगळी मोटार. त्याआधी 1942 साली त्यांनी आपल्या जागृती पिक्चर्स या बॅनरची स्थापना केली होती. चेंबूरला स्वतःचा जागृती स्टुडिओ उभारला होता. पण ‘अलबेला’चे सुपरहिट यश लाभले नाही त्यांना. त्यानंतर दादांनी आणखीही काही चित्रपट काढले; पण आता दुर्दैवाचा फेरा सुरू झाला होता. ते कोसळले. डोक्यावर कर्ज झाले. ते फेडण्यासाठी बंगला, गाड्या विकाव्या लागल्या आणि हा तारा पुन्हा चाळीत आला. पण त्यांची जिद्द आणि चित्रपटांवरील प्रेम असे की, त्यांनी ही इंडस्ट्री सोडली नाही. ते काम करीत राहिले. डेली पेड आर्टिस्ट म्हणून नाचत राहिले. 600 हून अधिक चित्रपटांत त्यांनी काम केले.
दादर-पूर्व येथील शिंदेवाडीतील ‘लल्लूभाई मॅन्शन’मधील दोन खोल्यांत त्यांनी शेवटचा श्वास घेतला. 4 फेब्रुवारी, 2002 रोजी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. गिरणगावातल्या चाळीतून सुरू झालेली एक यशोगाथा चाळीतच निमाली.
सौजन्य
– ना. डॉ. जितेंद्र आव्हाड
गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्र शासन