दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
ओमकार रहाटेने सौख्य मढवीचा सात धावांनी पराभव करीत स्पोर्टिंग लब कमिटीने मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने आयोजित पुरुषांच्या ३६व्या खंडू रांगणेकर स्मृती एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धेत पदार्पणालाच विजेतेपद संपादन केले.
सेंट्रल मैदानावर रंगलेल्या स्पर्धेत ओमकारने प्राथमिक लढतीपासून दमदार वाटचाल केली होती. उपांत्य फेरीच्या लढतीपर्यंत ओमकारने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना उणे धावसंख्येवर पराभुत केले होते. निर्णायक लढतीत ओमकार प्रथम फलंदाजीस आला. त्याने नेहमीच्या शैलीत फलंदाजी करत निर्धारित ६ चेंडूत १४ धावा केल्या. या दरम्यान तो दोन वेळा बाद झाल्याने त्याच्या एकूण धावसंख्येतून सहा धावा वजा करण्यात आल्या. या ८ धावांचा पाठलाग करताना सौख्यला सहा चेंडूत ४ धावा करता आल्या. त्यात तो एकदा बाद झाला. त्यामुळे एकूण धावसंख्येतून तीन धावा वजा झाल्यामुळे केवळ एक धाव सौख्यच्या खात्यात जमा झाली.
तिसर्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत रवी विश्वकर्माने अश्विन माळीचा पराभव केला. रवीच्या नाबाद ५ धावांना उत्तर देताना अश्विनला सहा चेंडूत चारच धावा करता आल्या. त्याआधी उपांत्य फेरीत ओमकारने अश्विन माळीची स्पर्धेतील वाटचाल संपुष्टात आणली होती. तर सौख्यने रवी विश्वकर्माला पराभूत केले होते.
संपूर्ण स्पर्धेत तीन झेल आणि चपळ क्षेत्ररक्षण करणार्या अमन सहानीला मोतीराम माणिक मोरेकर स्मृती उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.