दिनमान प्रतिनिधी
मुंबई|
सरसकट कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत आपली भूमिका मांडली. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण समाप्त केले. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी जे उपोषण केले त्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो.
सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी जरांगे पाटील यांची होती. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. राज्य सरकारने महिन्याभराचा कालावधी दिला आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय पूर्वीही झाला होता. अनेकांनी आरक्षणाबाबत टीकाही केली, असे नारायण राणे म्हणाले.
सरसकट कुणबी दाखला ही ९६ कुळींची मागणी नाही, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. सरसकट दाखले करू नका. राज्य सरकारने घटनेतील १५/४चा अभ्यास करावा. सरसकट कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही. राज्यात ३८ टक्के मराठा समाज आहे. जे गरीब आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजातील वर्गाला आरक्षण द्यावे, पण कुणाचेही आरक्षण काढून हे आरक्षण देऊ नये, असेही राणेंनी नमूद केले.
उद्धव ठाकरेंवर प्रहार
या वेळी नारायण राणेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे अडीच वर्षात अडीच दिवसही मंत्रालयात आले नाहीत आणि आता महाराष्ट्र दौरे काढत आहेत, असे राणे म्हणाले.
आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नव्हे!
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अवघ्या राज्याचे राजकारण तापले असताना राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नसल्याचे स्पष्ट केले. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नव्हे तर हजारो वर्षांपासून जे दबले – दडपले गेले होते, त्यांना समान पातळीवर आणण्याचा कार्यक्रम आहे, असे ते म्हणाले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका मराठी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना हे मत व्यक्त केले. सद्यस्थितीत वेगवेगळ्या समाज घटकांकडून आरक्षणाची मागणी होत आहे. पण आरक्षण हा काही गरिबी हटाव कार्यक्रम नाही. हजारो वर्षांपासून जे दबले-दडपले गेले होते. त्यांना समान पातळीवर आणण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था आहे, असे छगन भुजबळ म्हणाले