त्यांनी स्मृतिस्थळावर येण्याची गरज नव्हती!
दिनमान प्रतिनिधी
मुंबई|
शिवाजी पार्कवर गुरुवारी झालेल्या राड्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला कोणताही वाद किंवा गालबोट लागू नये म्हणून मी कालच स्मृतिस्थळावर गेलो आणि दर्शन घेतले. अशावेळी उबाठाच्या लोकांनी तेथे येऊन गालबोट लावण्याचे काम केले. खरंतर ते तेथे येण्याची आवश्यकता नव्हती. मी आजही तेथे मुख्यमंत्री म्हणून जाऊ शकलो असतो, पण वाद नको म्हणून मी काल गेलो, असे ते म्हणाले. बाळासाहेबांना या न आवडणार्या गोष्टी आहेत. कालची घटना ही दुर्दैवी आणि निंदनीय आहे. त्यामुळे मी याचा निषेध केला आहे.
बाळासाहेबांची शिकवण आचरणात आणण्याचे काम आम्ही करतोय. २०१९ मध्ये जेव्हा त्यांनी खुर्ची पटकावली तेव्हाच त्यांची बाळासाहेबांचे विचार गमावले, असा शिंदे यांनी टोला लगावला.
बाळासाहेबांचे स्वप्न होते की राम मंदिर बनावे. त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी हे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यामुळे बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली मिळाली आहे. बाळासाहेबांच्या शिकवणीनुसारच आपण काम करीत आहोत, असे शिंदे म्हणाले.
कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ओबीसी समाजाने कोणताही संभ्रम बाळगू नये, असेही ते म्हणाले. कुलाब्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.