दिनमान प्रतिनिधी
कल्याण|
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ग्रामीण भागातील भाल, नेवाळी, द्वारली भागातील लोकसंख्या वेगाने वाढत आहे. या भागात रस्ते, पिण्याच्या पाण्यासह दिवाबत्ती व स्मशानभूमीची समस्या भेडसावत आहे. २०१८ पासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून या समस्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असताना महापालिका प्रशासनाकडून या समस्यांकडे कायमच दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत रिपाइंच्या शालिनी भोंडगे यांनी केला आहे.
केडीएमसी मुख्यालयानजीक कार्यकर्त्यांसह त्या बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. जोपर्यत समस्या सुटणार नाहीत तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचे रिपाइंचे जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते यांनी सांगितले. उपोषणाला रिपाइंच्या सुनिता चव्हाण यांनी भेट देत पाठिंबा दिला आहे. यावेळी, योगेश गायकवाड, सनी लोंढे, डॉ. विशाल निकाळजे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत अनेक वर्षांपासून भालगाव, नेवाळी, वसार, द्वारलीपाडा, द्वारली, आडवली. ढोकळी, नांदिवली गावासाठी स्वतंत्र पाण्याची जलवाहिनी टाकून कायम स्वरूपी पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा आणि येथील नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवावी. या गावांमध्ये बाहेरून आलेले अनेक नागरिक कायमस्वरूपी स्थायिक झाले असून ज्यावेळी बाहेरील आलेल्या नागरिकांचे घरातील एखादी व्यक्ती मरण पावते त्यावेळी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यास येथील स्थानिक भूमिपुत्र विरोध करतात, याकडेही लक्ष वेधले आहे.
ज्यामुळे या नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते. नाइलाजास्तव ते मृत कल्याण पश्चिमेतील बैलबाजार येथील स्मशानभूमीत सर्वसाधारण आठ किलोमीटर अंतर चालत यावे लागते. हा गंभीर प्रश्न मार्गी लावण्याकरिता या गावांच्या मध्यभागी कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्वतंत्र मोठी स्मशानभूमी बांधून येथील नागरिकांचा प्रश्न मार्गी लावून मरणानंतर होणार्या यातनेपासून मुक्ती द्यावी, अशी मागणी केली.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील भालगांव, नेवाळी, वसार, द्वारलीपाडा, द्वारली, आडवली, ढोकळी, नांदिवली आदी गावांमध्ये मोठया प्रमाणात चाळी तर निर्माण झाल्या पण नागरिकांच्या सुविधांचं काय? हा एक मोठा प्रश्न येथील नागरिकांपुढे आहे. कल्याण महापालिका हद्दीत आंबिवली गाव आनंद नगर येथील तब्बल ४२ कुटुंबे आहेत ज्यांच्याकडे स्वतःचा सात बारा असताना ही ४२ कुटुंब कधीही रिंगरोडमध्ये उद्ध्वस्त होउ शकतात त्यांचे पुनर्वसन करावे, या मागण्यांसाठी रिपाइंने हे आंदोलन केले.