दिलीप ठाकूर | चित्रपट समीक्षक | एन्टरटेन्मेट
गौतम राजाध्यक्ष यांचा १३ सप्टेंबर हा स्मृतिदिन, त्यानिमित्त…
ऐंशीच्या दशकातील गोष्ट. त्या काळात नवीन साप्ताहिक/ पाक्षिक/ मासिक कधी बरे हाती येतेय असं मनोमन वाटणार्या असंख्य वाचकांतील मी एक होतो. गिरगावातील आमच्या खोताची वाडीतील घरून बाहेर पडल्यावर खाडिलकर रोडवरील पेपर स्टॉलवर सवयीनुसार नजर टाकताच एकाच वेळेस आश्चर्याचा धक्का, कौतुक, कुतूहल, आनंद असे सगळेच एकदम वाटले. कारण ‘चंदेरी’ पाक्षिकाच्या मुखपृष्ठावरील राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांच्या ‘बोलया’ फोटोने पटकन लक्ष वेधून घेतले. खूप वर्षांनी ते फोटो सेशनसाठी का असेना पण एकत्र आलेत हे स्पष्ट होते. गौतम राजाध्यक्षचा हा फोटो आहे, हे वेगळे सांगायची काही गरजच नव्हती. एक म्हणजे ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘नमक हराम’ (१९७३) पासून राजेश खन्ना व अमिताभ यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे. राजेश खन्नाला फारच इगो प्रॉब्लेम आहे अशा अनेक स्टोरीज, किस्से, कथा, दंतकथा यावर आमची पिढी वाढलेली. मी मीडियात आल्यावर तेच डोयात घोळत होते. अमिताभचा तोपर्यंत मीडियावर बहिष्कार होता. आम्हाला त्याच्या गंगा जमुना, सरस्वती, अग्निपथ, हम, खुदा गवाह, शिनाख्त, रुद्र अशा अनेक चित्रपटांच्या मुहूर्ताला अमिताभ लाइव्ह अनुभवता येई. राजेश खन्नाच्या मीडियाबाबत कसल्याच अटी, शर्ती व नियम नव्हतेच. पण हे दोघे एकत्र आणण्याची किमया अवघड वाटत होती. तीच गौतम राजाध्यक्ष यांनी शय केली. दोघांचे एकत्र अनेक फोटो आणि स्वभाव वैशिष्ट्यांसह गौतम राजाध्यक्ष यांनी ते आपण वाचकांशी गप्पा करतो आहोत अशा शैलीत मांडले.
गौतम राजाध्यक्षचा ‘कॅमेरा’ कायमच खूप काही पाहायचा/दाखवायचा/सांगायचा/ पोहोचवायचा. त्याना ‘तिसरा डोळा’ होता जणू आणि म्हणूनच त्यांचे अनेक फोटो कायमचेच डोळ्यासमोर आहेत वा एखादी आठवण आली तरी डोळ्यासमोर येतात. आणि या फोटोंसह त्या कलाकारासोबतच्या गप्पांची वाचनीय मेजवानीच. गौतम राजाध्यक्ष फोटोत कलाकारातील माणूसपण दाखवून देत (तोपर्यंत सेलिब्रिटीज शब्द प्रचलित नव्हता आणि फोटो कितीही ग्लॅमरस असला तरी त्यात त्या कलाकाराचा बोलका चेहरा दिसे.) आणि मजकुरातून त्या कलाकाराचे मन समजून येई.
१३ सप्टेंबर २०११ रोजी अगदीच अनपेक्षितपणे गौतम राजाध्यक्षच्या निधनाचे वृत्त समजताच धक्काच बसला. त्याचं आपलं लाइट्स, कॅमेरा, स्टेडी, लूक, फोकस यांचे विश्व होते. गिरगावातील ऑपेरा हाऊस येथील झवेरी हाऊसमधील प्रशस्त घरात आपला एक फोटो स्टुडिओ होता. हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील (हाच क्रम बरोबर आहे) अनेक कलाकार येथे येऊन फोटो सेशन करीत. कधी मुंबईत आऊटडोअर्सला, तर कधी शूटिंग लोकेशन स्पॉटवर गौतम राजाध्यक्षची फोटो सेशन असत. ‘कॅमेराचा एक डोळा असणारा’ तो प्रवास असा अचानक थांबला होता. गौतम राजाध्यक्षचा जन्म १६ सप्टेंबर १९५०चा. म्हणजेच अवघे ६१ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले.
गौतम राजाध्यक्षबद्दल बरेच काही सांगता येण्यासारखे.
रेखा, माधुरी दीक्षित यांची अनेक फोटो सेशनही त्यांची खासियत. एकदा त्यांनी ‘माधुरी दीक्षितमध्ये मधुबालाचा भास होतोय’ असं देखणे फोटो सेशन केले आणि त्याच दृष्टिकोनातून माधुरी दीक्षितकडे पाहिले गेले. ही एका कल्पक फोटोग्राफरची नजर आणि त्यातील लेखकाचे प्रमाणपत्र. टीना मुनीम, सलमान खान, शीतल मल्हार यांना ‘फोकस’मध्ये आणण्याचे क्षेय गौतम राजाध्यक्षना दिले जाते.
सोनाली कुलकर्णीने (सीनियर) गौतम राजाध्यक्षबद्दल सांगितलेली एक गोष्ट सांगतो. ती म्हणाली होती, की गौतम राजाध्यक्षांकडे पहिले फोटो शूट करण्यापूर्वी मी त्यांना एकदा भेटले. त्यांचे घर, लाकडी पायर्या हे सगळे विशेष वाटले. तेव्हा मी पुण्यात राहायची आणि माझ्याकडे असतील नसतील तेवढे कपडे घेऊन मी फोटो शूटसाठी त्यांच्याकडे मुंबईत आले. त्यांच्याशी गप्पा करताना मला थोडासा स्टाईल सेन्स आला. चमकते तेच चांगले अथवा महाग तेच उत्तम कपडे असे नव्हे, तर आपण एकाद्या कपड्याचा वापर कसा करतो, आपल्या पर्सनॅलिटीनुसार ते आहेत का, अशा अनेक गोष्टी समजल्या. मग मुंबईत मी राहायला आल्यावर आणि चित्रपटसृष्टीत हळूहळू रुळत जाताना अनेकदा अनेक प्रकारच्या फोटो सेशनचे योग येत गेले. त्यातील काही आठवणीत राहणारे आहेत, असे सोनाली म्हणाली होती.
असो. मध्यमवर्गीय मराठी माणसाला गौतम राजाध्यक्ष हे नाव अगदी जवळचे झाले ते अक्षर प्रकाशनचे ‘चंदेरी’ पाक्षिक सुरू झाल्यावर! सप्टेंबर १९८५ची गोष्ट. पहिलीच कव्हर स्टोरी रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सागर’ या चित्रपटाची. टॅब्लेट अर्थात उभ्या आकाराचे पाक्षिक आणि ग्लॉसी पेपर हा मराठी सांस्कृतिक क्षेत्राला धक्काच होता. संपादिका रोहिणी हट्टंगडी आणि त्यात गौतम राजाध्यक्षांचे एसक्लुझिव्ह फोटो आणि लेखन हे सगळेच नवीन होते.
गौतम राजाध्यक्ष तोपर्यंत स्टार डस्ट, सिने ब्लिट्स, फिल्मफेअर, इलेस्ट्रेटेड वीकली अशा ग्लॉसी मॅगझिनच्या उच्च वर्गातील वाचकांना माहीत. अशा चकाचक पेपर्सच्या पत्रकार व फोटोग्राफर्सचा हिंदी चित्रपटसृष्टीत असलेला वावर, मोठ्या स्टार्सशी असलेला खास संबंध व संवाद याचे चित्रपट रसिक व वाचकांना केवढे कुतूहल व कौतुक. हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकार वेगळ्याच विश्वात रममाण असतात, ते सहजी दिसत नाहीत अशी त्या काळात एक प्रकारची फॅन्टसी असे. मी मीडियात आल्यावर हिंदी चित्रपटाचे मुहूर्त, शूटिंग रिपोर्टिंग, प्रीमियर, पार्ट्या यात मला फिल्डवरचे फोटोग्राफर सातत्याने भेटत, तर स्वतंत्र फोटो सेशन करणारे गौतम राजाध्यक्षसारखे अधूनमधून एखाद्या मोठ्या चित्रपटाच्या मुहूर्ताला दिसत आणि त्यांच्याभोवतीच्या वलयामुळे दबून जायला होई. फोटो कॅमेर्यामागचे जादूगार म्हणजे गौतम राजाध्यक्ष अशी त्यांची प्रतिमा दिपवून टाके. राजाध्यक्षांनी आपल्या आयुष्याची सुरुवात मुंबईच्या लिंटास इंडिया कंपनीतून केली, अशी एकेक माहिती मिळत गेली. १९७४ सालापासून त्यांनी आपला फोटोग्राफीचा छंद व्यवसाय रूपात करण्याचा निर्णय घेतला. १९८० मध्ये शबाना आझमी, टीना मुनीम, जॅकी श्रॉफ, अमृता सिंग, पद्मिनी कोल्हापुरे यांचे त्यांनी काढलेले फोटो विशेष लक्षवेधक ठरले. ‘तुमचे काम बोलले पाहिजे’ त्याचा तो प्रत्यय होता. तोच कारकिर्दीला ओळख व गती देखो. गौतम राजाध्यक्ष यांच्या अतिशय प्रशस्त घरात भला मोठा दिवाणखाना, कोरीव कलाकुसर केलेले लाकडी फर्निचर, शोभेच्या पितळी वस्तू, वास्तूकलेची साक्ष देणारी विविध पेंटिंग्ज; याशिवाय ओळीने मांडलेली विविध विषयांवरची पुस्तके आणि दुर्गाबाई खोटेंपासून सचिन तेंडुलकरपर्यंत वैविध्यपूर्ण व्यक्तींची छायाचित्रे होती. एका लासिक आणि मनस्वी फोटोग्राफरचे हे घर आहे, हे त्यात पाऊल टाकताच लक्षात येई. त्यात त्यांचे व्यक्तिमत्त्व दिसे, हे उल्लेखनीय. आणि या वास्तूत अनेक चित्रपट कलाकार येतात या गोष्टीने तर या घराला ग्लॅमर प्राप्त झाले होते. गौतम राजाध्यक्ष अतिशय सहजपणे माधुरी दीक्षित माझ्या घरी आली. मी पहाटेच डिंपल कापडियाचे फोटो काढण्याचे ठरवले, असं लिहीत ती कवी कल्पना नव्हे तर ते मोठेच वास्तव आहे. यामुळे या घराकडे अधिकच कुतूहलाने पाहाणे होई.
आता ऐंशीच्या दशकात गौतम राजाध्यक्ष स्टाईल एस्टॅब्लिज झाली. धूसर, स्वप्नाळू जगाचा आभास निर्माण करणारे, कमालीचे जिवंत भासणारे, बोलणारे डोळे असलेले आणि आपल्याशी संवाद साधणारे हे ‘चेहरे’ गौतम राजाध्यक्ष स्टाईल फोटोग्राफीचा ट्रेडमार्क ठरले आणि त्यांचा चाहतावर्ग वाढत राहिला. ‘चंदेरी’मुळे ते महाराष्ट्रीय समाजात आपलेसे झाले. मग त्यांच्याच मुलाखती वाचायला मिळू लागल्या. त्यातून ते अधिकाधिक समजत गेले. गौतम राजाध्यक्ष म्हणजे कॅमेरा हे नाते घट्ट होते. चित्रपट कलाकार झालेच पण संगीत, कवी, साहित्यिक, राजकारणी अशांचेही त्यांचे फोटो सेशन बोलके वा लक्षवेधक ठरू लागले. त्यासह बरीच नवीन माहितीही मिळत राहिली. मराठी वाचकांना याचीच ओढ जास्त असते. ती बौद्धिक गरज गौतम राजाध्यक्ष यांच्या फोटो व लेखनातून मिळू लागली.
कसबी छायाचित्रकार, प्रभावी व्यक्तिमत्त्व, अतिशय तल्लख बुद्धी, उत्तम शब्दसौंदर्य, सकारात्मक दृष्टिकोन, अभिजात रसिकमन, उत्तम वक्ता, योग्य भूमिका या गुणवैशिष्ट्यांमुळे गौतम राजाध्यक्ष केवळ ‘स्टार फोटोग्राफर’ न राहता स्वत:च ‘स्टार सेलिब्रेटी’ बनले. हा त्यांचा प्रवास विलक्षण थक्क करणारा. हे एक प्रकारचे झपाटलेपण होते. पण त्यात कमालीचा संयम व सभ्यता होती .फोटोग्राफी हा केवळ व्यवसाय न मानता त्यांनी कला-संस्कृतीच्या विविध क्षेत्रांत मुशाफिरी करीत आपल्या या व्यवसायाला कसदार लेखनाची जोड दिली.सेंट झेविअर हायस्कूलमधील इंग्रजी माध्यमातील शिक्षण आणि बीएस्सीपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण, उत्तम बुद्धिमत्ता, जिज्ञासा हे त्यांचे वैशिष्ट्य. या गौतम यांचा स्वभाव मृदू होता. आरडाओरड नाही, असं त्यांच्याबद्दल नेहमीच कौतुकाने म्हटले गेले. ते त्यांच्या संपर्कात येणार्या सेलिब्रेटीजच्या अंतरंगात डोकावून पाहण्याआधी ती व्यक्ती कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे, त्याची आवडनिवड काय आहे, मानसिकता कशी आहे, बोलणे/बघणे/ ऐकणे/ सांगणे कसे आहे याचा वेध घेत. त्यामुळे कर्नल सॅम माणिकशॉ असो किंवा संगीतकार नौशाद, एम. एफ. हुसेन असो किंवा जर्सन डिकुन्हा, इस्मत चुगताई असो किंवा भानू अथय्या, त्यांच्याशी त्यांच्या क्षेत्राविषयी जाणून घेत, गप्पा मारत. ते या व्यक्तींचा स्वभाव खुलवत, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत आणि नेमकं त्याचंच प्रतिबिंब जेव्हा त्यांच्या छायाचित्रातून उमटत असे तेव्हा जाणकारांच्या मुखातून नकळत झक्कासची दाद येई. गौतम राजाध्यक्ष हे अशा स्तुतीतही नॉर्मल राहत हे उल्लेखनीय. आणि त्यांचा आपोआपच कार्यविस्तार झाला.
गौतम यांचे विविध क्षेत्रांतील निवडक ६८ ‘मैत्र’ त्यांच्या ‘फेसेस’ (मराठीत ‘चेहरे’) या पुस्तकातून भेटले. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात रेखा आणि जया बच्चन हजर होत्या आणि त्यांच्या भेटीचा फोटो पुस्तकाला ‘फोकस’ मध्ये आणणारा ठरला. अशा गोष्टींनी गौतम राजाध्यक्ष या नावाभोवतीचे वलय वाढत राहिले.
गौतम राजाध्यक्ष अतिशय बहुस्तरीय, चतुरस्र व्यक्तिमत्त्व. त्यांनी शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण घेतलं होते. कंठसंगीतामध्ये त्यांना विशेष रुची. पं. रमेश जुळे यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. ‘ऑपेराज’च्या सोबतीने त्यांच्या घरातल्या भिंतींमधून भारतीय शास्त्रीय संगीतही झिरपलं. या संगीत प्रेमामुळेच ते मंगेशकर कुटुंबीय, पं. भीमसेनजी, पं. रविशंकर, नौशाद, हृदयनाथ मंगेशकर त्याचबरोबर लता मंगेशकर, जावेद अख्तर, कैफी आझमी, गुलझार, शांताबाई शेळके आदी सर्जनशील साहित्यिकांशी संवाद साधू शकले. त्यांच्या अष्टपैलुत्वाची ओळख यातून वाढत जाते. गौतम राजाध्यक्षनी आपला कार्यविस्तार आणखीन वाढवत, पटकथाकार म्हणूनही पाऊल टाकले. संजय सूरकर दिग्दर्शित ‘सखी’ हा मराठी चित्रपट, राहुल रवैल दिग्दर्शित ‘बेखुदी’ (काजोलचा पहिला चित्रपट) आणि ‘अंजाम’ (हा चित्रपट निर्मिती अवस्थेत खूप रखडला. शाहरुख खान व माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका होत्या.) यांचे पटकथा लेखन गौतम राजाध्यक्षचे होते. तर त्यांच्या फोटोचीही प्रदर्शने भरत आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असे. पुणे शहरातील फर्ग्युसनच्या मैदानात असेच एकदा भरलेल्या त्यांच्या फोटो प्रदर्शनास पुणेकरांनी उत्तम दाद दिली. कोणत्याही संवेदनशील कलाकाराचा हुरुप वाढावा अशीच ही गोष्ट. कलेच्या क्षेत्रात पाऊल टाकणार्यांनी आदर्श ठेवावा असेच हे व्यक्तिमत्त्व. मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकलेल्या अनेक अभिनेत्रींना गौतम राजाध्यक्षनी आपले फोटो सेशन करावे असे वाटे, ही त्यांच्या कामाला मिळालेली दादच. आणि ते होताच त्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढे आणि त्या अधिकच ग्लॅमरस दिसत. ही एक प्रकारची जादूच आणि कल्पक फोटोग्राफरचा ‘तिसरा डोळा’.
या चौफेर व विपुल प्रवासात ते अनेक पुरस्कारांनी गौरवले जाणे स्वाभाविकच. फॅशन फोटोग्राफी सन्मान, महाराष्ट्र भूषण, कुसुमाग्रज पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. त्या शाबासकीत ते अडकले नाहीत.
गौतम राजाध्यक्ष म्हणताच लता मंगेशकर, आशा भोसले, गुलजार, रेखा, स्मिता पाटील, माधुरी दीक्षित यांचे एसक्लुझिव्ह बोलके फोटो आठवणारच आणि अनेक कलाकारांच्या काही वेगळ्या मुलाखती, गोष्टी, किस्सेही नक्कीच आठवणार.
त्यांनी कॅमेर्याची जणू लेखणी केली आणि लेखणीचा कॅमेरा. एखादे व्यक्तिमत्त्व असे अगदीच वेगळे आणि तेच तर मोठे यश असते.