अतुल माने | चित्रपट समीक्षक | स्ट्रगलर
कोणताही कलाकार हा जात्याच कलेसाठी आपले आयुष्य खर्ची घालत असतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो आपली कला टिकविण्यासाठी अथक प्रयत्न करीत राहतो. याला अभिनेत्री दीपाली भालेरावसुद्धा अपवाद ठरणार नाही. लहानपणापासूनच अभिनयाचे वेड असलेल्या दीपालीचा अभिनय प्रवास हा विविध अडचणीमधून गेला असून ही वाटचाल अद्यापही कायम आहे. अभिनय क्षेत्राचा घरी कोणालाही गंध नसताना हेच क्षेत्र निवडताना दीपालीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मला लहानपणापासूनच एखाद्याची नक्कल करणे अथवा मिमीक्री करणे तसेच त्याला जोडून अभिनय करणे हे आवडत होते. शाळेत असताना यासाठी फारशी संधी मिळाली नसल्याची खंत दीपाली व्यक्त करतात. दहावी झाल्यानंतर खर्या अर्थाने या क्षेत्रात काम करण्याचा श्री गणेशा झाला तोसुद्धा एका प्रायोगिक नाटकाच्या माध्यमातून असे दीपाली यांनी सांगितले. रंगभूमीवर काम करण्याचा तो माझा पहिला अनुभव होता. विपर्यास नावाचे प्रायोगिक नाटक आणि त्यामधील भूमिका ही आव्हानात्मक होती. राज्यभर अनेक स्पर्धांच्या माध्यमातून या नाटकाचे दौरे झाले अशी आठवण दीपाली यांनी व्यक्त केली. जवळपास १०० पेक्षा जास्त प्रयोग या नाटकाचे झाल्याने प्रत्येक वेळी अभिनयाला वेगळा कस लागत होता असे स्पष्ट करून दीपाली म्हणाल्या की, रंगभूमीवर काम करणे हे सोपे नसते याची पदोपदी जाणीव त्या वेळी आपसूक होत असे. या नाटकाचे सलग दौरे झाले. याचदरम्यान ‘यांची गोष्ट’ या एका विनोदी नाटकातही काम केल्याचे सांगून दीपाली म्हणाल्या की,
त्यानंतर कोरोना आणि लॉकडाउनचे संकट सुरू झाले आणि सर्व कामे ठप्प झाली. किमान दोनपेक्षा जास्त वर्षेही अभिनयापासून दूर करावी लागली. मधल्या काही काळात फुटबॉल मान्सून या एका चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका केली असून, हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा आहे. जागो मोहन प्यारे या प्रसिद्ध मालिकेसह छोट्या पडद्यांवरील अनेक मालिकांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका मी आजपर्यंत केल्या असल्या तरी अजूनही एक आधी आव्हानात्मक अथवा चांगली भूमिका वाट्याला आली नाही. जागो मोहनमधील भूमिका करताना सहकलाकारांकडून खूप काही शिकता आले त्याचा मला नेहमी फायदाच होईल. त्याचबरोबर प्रेमा तुझा रंग कसा, माझ्या नवर्याची बायको, तुला पाहाते रे आणि तू अशी जवळी राहा या आणि अन्य सीरियलमध्ये महत्त्वाच्या भूमिका करण्याची संधी मिळाली आहे.
करिअरची सुरुवात ही रंगभूमीपासून केली असल्याने रंगभूमी हे माझे पहिले प्रेम आहे, असे सांगून दीपाली म्हणाल्या की कोणत्याही व्यावसायिक नाटकामधील आव्हानात्मक भूमिका करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ती भूमिका किती मोठी अथवा छोटी यापेक्षा त्यामध्ये किती आव्हान आहे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असल्याचे दीपालीचे म्हणणे आहे. रंगभूमी ते मोठा पडदा हे दीपालीचे स्वप्न असून, त्यासाठी अहोरात्र मेहनत घेण्यासाठी तयार असल्याचे यानिमिताने बोलताना तिने स्पष्ट केले.