दिनमान प्रतिनिधी
अंबरनाथ।
अंबरनाथच्या कोणार्क बिजनेस पार्क परिसरात एका ट्रेलरचा उच्च दाबाच्या वाहिनीशी संपर्क झाल्याने तो ट्रेलर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. तर या ट्रेलरचा चालक विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास अंबरनाथमध्ये एक ट्रेलर कोणार्क बिजनेस पार्क परिसरात वजन काट्यावर वजन करण्यासाठी आला होता. त्यानंतर हा ट्रेलर पुन्हा कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर परतत असताना बिजनेस पार्कच्या कमानीजवळ असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीशी या ट्रेलरचा संपर्क झाला. त्यात विजेचा धक्का लागून ट्रेलरच्या चालकाचा मृत्यू झाला आहे. तर विजेचा संपर्कात आल्याने ट्रेलरने देखील पेट घेतला. या आगीत ट्रेलर पूर्णपणे जळाले असून अंबरनाथ अग्निशामक दलाने ही आग पंधरा मिनिटांत आटोक्यात आणली. मात्र विजेचे उच्च दाबाची विद्युत वाहिनी एवढ्या खाली आलीच कशी असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे.