दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, त्यापाठोपाठ बाळासाहेबांच्या शिवसेनेने रविवारी ठाण्यात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन ठाकरे गटाला पुन्हा धक्का दिला आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे, माजी आमदार योगेश पाटील व ठाकरे गटासह विविध पक्षांतील पुणे, लातूर, मुंबई, ठाणे आणि पालघर भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनाही बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
जि. प. सदस्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश
ठाणे जिल्हा परिषदेच्या पाच सदस्यांसह शहापूरच्या नगरसेविका व ठाकरे गटाचे शहापूरचे उप जिल्हाप्रमुख यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांच्या प्रयत्नांनी या पाचही सदस्यांनी रविवारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जि. प. सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पक्षाचे चिन्ह असलेली ढाल व तलवार प्रतीक भेट म्हणून दिले. ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य लहू थापड, मधुकर चंदे, मोहन जाधव, तुळशी नामदेव गिरा, कांचन अविनाश साबळे या पाच सदस्यांसह शहपूरच्या माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका रंजना संतोष शिंदे व ठाकरे गटाचे शहापूर उपजिल्हा प्रमुख संतोष शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे टेंभीनाका येथील आनंदाश्रमात शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), प्रकाश पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, कलाताई शिंदे, शहर प्रमुख सुभाष माने, सुभाष पवार आदी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास कार्याने प्रभावित होऊन जिल्हापरिषद सदस्यांनी बाळासाहेबांची शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद वाढविण्यासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अनेक जि.प व पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सरपंच बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यात शिंदे यांची ताकद आणखी वाढणार आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी यावेळी दिली.