दिनमान प्रतिनिधी
भाईंदर।
भाईंदर पूर्व येथील नवघर भागातील नागरी वस्तीत एका इमारतीचा सज्जा मध्यरात्री कोसळ्याची घटना घडली आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र सुरक्षेच्या द़ृष्टीने संपूर्ण इमारत पालिका प्रशासनाने मोकळी केली आहे.
भाईंदर पूर्व येथील मानव कल्याण रुग्णालयाशेजारी भानू पाल नावाची जवळपास 35 वर्षे जुनी इमारत आहे. या इमारतीत एकूण 24 खोल्या व काही दुकाने आहेत. इमारत जुनी झाली असल्यामुळे ती धोकादायक स्थितीत होती. याबाबत महापालिकेने इमारतधारकांना दोन वेळा इमारत मोकळी करण्याची नोटिसदेखील बजावली आहे. असे असतानादेखील येथील रहिवासी इमारत मोकळी करण्यास टाळाटाळ करीत होते. शुक्रवारी मध्यरात्री या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानाजवळचा सज्जा रस्त्यावर कोसळला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. त्यानंतर पालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण इमारत मोकळी केली.
सध्या इमारतीमधील नागरिकांना पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात ठेवले असून, इमारतीबाबत पुढील निर्णय घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रभाग क्रमांक 3 चे प्रभाग अधिकारी राजाराम कांबळे यांनी दिली आहे.
मुंब्य्रात प्लास्टर कोसळून मुलगा जखमी
मुंब्रा येथील अमृतनगर भागात शुक्रवारी सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने अब्दुल वहाब गुलरेझ अहमद (14) हा जखमी झाला. त्याच्यावर कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमृतनगर येथे आयेश ही पाच मजली 20 वर्षे जुनी इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरील एका सदनिकेत अब्दुल वहाब गुलरेझ अहमद हा त्याच्या कुटुंबासोबत राहतो. शुक्रवारी सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळले. त्यात अब्दुलच्या छाती, डोके आणि पायाला दुखापत झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अब्दुल याला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.