दिनमान प्रतिनिधी
डोंबिवली।
महावितरणच्या कल्याण, वाशी आणि वसई मंडलात मंगळवारी (22 नोव्हेंबर) एकाच दिवशी 1,700 कर्मचार्यांच्या 236 विशेष पथकांनी तब्बल 13 हजार 798 वीजमीटरची तपासणी करून वीजचोरांविरुद्ध महाकारवाई केली. वीजचोरीला प्रतिबंध व ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार अचूक वीजबिल या उद्देशाने पोलिस आणि सुरक्षारक्षकांच्या मदतीने आखलेल्या या महामोहिमेत महिला कर्मचार्यांचा सहभाग होता.
कल्याण व भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते दीपक पाटील, राजेशसिंग चव्हाण आणि राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवर ही कारवाई करण्यात आली. कल्याण मंडल एक अंतर्गत हाजी मलंग वीजवाहिनीवरील भाल, वसार, द्वारली, नेवाळी, धवलपाडा, पालेगाव व घारपे परिसरात 588 कर्मचार्यांच्या 76 पथकांनी एकूण 7 हजार 261 वीजजोडण्यांची तपासणी केली. यात 151 ठिकाणी वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले. याशिवाय सील तुटलेले व संशयास्पद असे 237 वीजमीटर सापडले. तसेच 74 ग्राहकांकडील नादुरुस्त वीजमीटर बदलण्यात आले.
वाशी मंडलातील वांगणी वीजवाहिनीवरील वांवजे, देवीचा पाडा, खेरना, चांदरान, तोंद्रे, पाले खुर्द परिसरात 500 कर्मचार्यांच्या 98 पथकांमार्फत 3 हजार 985 वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात 53 ठिकाणी वीजचोरी तर 24 ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर आढळून आला. 45 ग्राहकांकडील नादुरुस्त वीजमीटर बदलण्यात आले.
वसई मंडलातील धुमाळनगर वीजवाहिनीवरील धानीव, गावदेवी मंदिर परिसर, शांतीनगर, नवजीवन, मिल्लत नगर, गांगडेपाडा, राशिद कम्पाउंड, जाधवपाडा भागात 610 कर्मचार्यांच्या 62 पथकांनी 2 हजार 552 वीजजोडण्यांची तपासणी केली. यात 199 ठिकाणी वीजचोरी तर 138 जणांकडून विजेचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे आढळले. तसेच 17 ग्राहकांकडील नादुरुस्त वीजमीटर बदलण्यात आले.