डॉ, मधुरा कुळकर्णी, | ( एमडी स्त्रीरोग – प्रसूती ), आयुर्वेद | आयुष्य सुंदर आहे
आजीबाईचा बटवा ही जुन्या काळातील एक मोठी आधारभूत आरोग्य संस्थाच होती, असे म्हणणे फारसे वावगे ठरणार नाही. सध्याच्या काळात डॉक्टरांचे तुडुंब भरलेले दवाखाने बघितले की मूलभूत आरोग्याची पायमल्ली होत चाललेली प्रकर्षाने जाणवते. विशेषतः अतिशय छोट्या छोट्या आरोग्य कुरबुरींसाठी लहान मुलांसाठीही मोठमोठ्या औषधांच्या बाटल्यांचीच मागणी होते. तेव्हा या आरोग्यदूतांची खूप प्रकर्षाने आठवण होते.
तुझे आहे तुजपाशी
शीला चाळिशीच्या उंबरठ्यावरची. एका शाळेतील शिक्षिका व गृहिणी. ही गेली अनेक वर्षे आपल्या दोन्ही भूमिका उत्तमपणे पार पडत होती. चाळिशी ओलांडल्यावर मात्र मेनोपॉझच्या छोट्या-मोठ्या कुरबुरींनी ती अस्वस्थ होत होती.
अचानक येणारा खूप सारा घाम तिला सर्वाधिक त्रासाचा होता. इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीचा शरीर प्रतिसाद तिचा आत्मविश्वासही कमी करू लागला होता. अचानकच शरीरातून वाहणार्या घामाच्या ओघळांनी बेचैन होत होती शीला. दवाखान्यात आली तेव्हाही अगदी निराश झाली होती ती.
शीलाला तपासले. योग्य प्रश्न विचारून कुटुंबाचा इतिहास जाणून घेतला. व्यायाम आणि अन्य सूचना दिल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला नेहमीचा हुकमी ज्येष्ठीमधाचा उपाय सुचवला. 1 चमचा ज्येष्ठमध चूर्ण सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्याबरोबर घेऊन त्यावर थोडे हळद-दूध पिणे. हजारो स्त्री-रुग्णांना पाळी जातानाच्या काळात होणार्या उकाड्यावरचा (अचानक) उपाय म्हणून याचा उत्तम लाभ आम्ही अनुभवला आहे. त्यावर एक छोटे संशोधनही केले आहे.
1) स्मरणशक्ती सुधारणे, 2) घाम येण्याची बेचैनी कमी होत जाणे
अशासारखी लक्षणे दिसून यायला मदत होते.
शीलाने सगळ्या गोष्टी खूप मनापासून केल्याच, पण ज्येष्ठमध रसायनाचे व्रत अगदी मनोभावे पाळले. शिक्षक हा उत्तम विद्यार्थी बनतो हे सिद्ध केले. खूप वर्षांनी काही वेगळ्या कारणासाठी शीलाची भेट झाली तेव्हा तिने जो अनुभव सांगितला तो खरंच आरोग्य सिद्धांताच्या मदतीची उपयुक्तता सिद्ध करणारा वाटला. शीलाच्या म्हणण्यानुसार रजोनिवृत्तीच्या चाहुलीचे त्रास ज्येष्ठमधामुळे कमी झाले ही गोष्ट तर खरीच, पण रोजच्या रोज ज्येष्ठमध घेत राहिल्यामुळे शिक्षिकेच्या व्यवसायामुळे 1)बसणारा आवाज, 2) घशाची बोच, 3) खडू अॅलर्जीचा त्रास इत्यादी बर्याच काळापासून सतावणार्या घशासंबंधी कुरबुरी आपोआपच कमी होत गेल्या.
‘डॉक्टर, औषधांच्या साइड इफेक्ट्सची खूप चर्चा होते.
काही औषधांच्या साइड बेनिफिट्सचीही माहिती समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. एक त्रास कमी करायला जावे व त्यामुळे आपोआप इतरही त्रास कमी होत जावे ही गुपित गोष्ट सगळ्यांना समजली पाहिजे.’ शीला असे म्हणाल्यावर मसाल्याच्या डब्यातल्या अनेक पदार्थांचे औषधी अनुभव डोळ्यांसमोर येऊ लागले.
1) ओवा : बाळंतिणीसाठी ओवा+बडिशेप+ज्येष्ठमध+सैंधव+ बाळंतशेपा असा मुखवास वरदान ठरतो. (विड्याबरोबर उत्तमच)
1) कंबरदुखी व पोटदुखी कमी होते. 2) खोकला व त्यातून पडणारा दुर्गंधी कफ यांचा त्रास कमी होतो. 3) इवल्याशा दिसणार्या या ओव्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्नचे प्रमाण तर खूप आहेच; पण तो उत्तम अँटिऑक्सिडंटही आहे. म्हणूनच बाळंतपणात सर्वांगीण आरोग्यासाठी उत्तम
बाह्य उपचार : ओव्याची पुरचुंडी बांधून (कपड्यामध्ये) तव्यावर गरम करून त्याचा वास घेतल्यावर सर्दीचा त्रास कमी होतो. बाळाच्या छाती-पोटाला या ओव्याचा शेक काळजीपूर्वक केला तर वायू कोंडल्यामुळे येणार्या अस्वस्थतेत उतारा पडता.
2) जिरे : मसाल्याच्या डब्यात मुख्यतः पांढर्या जिर्याची वर्णी लागते. 1) जुलाब-उलट्या होत असताना मध+तूप+जिरे एकत्र करून घेतलेले उपयोगी पडते. 2) 1/1 चमचा धणे+जिरे रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी घेतल्यास लघवीच्या त्रासावर उतार पडतो. 3) विशेषतः नवीन लग्न झालेल्या तरुणांसाठी हे धणे+जिरे पाणी उत्तम वरदान आहे. 4) बाळंतपणात अंगावरचे दूध वाढण्यासाठी व गर्भाशयाची सूज कमी होण्यासाठीही गूळ+जिरे उपयोगी पडते. 5) डोळे+मेंदूचे काम उत्तम चालू राहण्यास जिरे+तूप प्रयोग चांगला. विशेषतः रक्तवाहिन्या व हृदयाला संरक्षक असे फ्लावोनाइड्स जिर्यातून मिळतात.
लॅमोनिन या जिर्यातील घटकामुळे यकृतातील एन्झाइम्स काम करू लागतात व कॅन्सरला दोन हात दूर राहायला मदत होते. विशेषतः प्रोस्टेट कॅन्सर दूर राहतो, असेही संशोधन आहे.
हिंग : 1) तुपात परतून वापरलेला हिंग औषधी होतो. 2) पोटातल्या कृमींवर हिंग उपयोगी पडतो. 3) लहान मुलांना चिमूटभर हिंग कोमट पाण्यातून पोटावर लावल्यास पोटदुखी कमी करतो. 4) भूक लागण्यास मदत होणे, पाचक हे हिंगाचे मुख्य गुण आहेत. 5) उष्ण प्रकृतीच्या माणसांनी हिंग जपून वापरावा. 6) हिंगाचा उग्र वास त्यातील तेलामुळे असतो. त्या तेलामुळेच पोटातील वायू ढेकरामार्फत बाहेर पडतो. 7) हिंगाच्या तंतूमयतेमध्येच डिंक व रेझीन्सही असतात. त्यामुळे आतड्यातील वायू खालून सरायलाही मदत होते. 8) हिंग्वाष्टक चूर्ण या औषधात हिंग, जिरे, सैंधव असे सारेच पदार्थ आहेत. ते वैद्यकीय सल्ल्याने वापरता येऊ शकते.
मेथी बी : 1) गुडघेदुखी, वाताचे आजार यावर पाण्यात भिजवून घेतलेले (प्रमाणात) मेथी दाणे उपयोगी पडतात. 2) जाडेपणा/वाढलेली चरबी कमी करायला सुद्धा व मधुमेहातही मेथीचा औषध उपयोग आहे. 3) उष्ण प्रकृतीच्या माणसांना जास्त प्रमाणात घेतलेली मेथी त्रासदायक होऊ शकते. 5) सॅपोनिन्स नावाचे रसायन द्रव्य कॅन्सरविरोधी लढण्यात मदत करते. 6) मेथी दाणे 3-4+1 चमचा हिरवे मूग यांना भिजवून मोड येऊ लागण्याच्या अवस्थेत चाऊन खावेत. (चहाचा1 चमचा) भिजवले मेथीत सर्व जीवनसत्वांचे प्रमाण वाढलेले आढळून येते.
धणे : 1) कोथिंबिरीचे फळ म्हणजेच धणे होय. 2) धण्याचे पाणी अजीर्ण, उलटी, पोटदुखी, मूळव्याधीवर उपयोगी पडते. 3) नागिणीमुळे होणार्या आगीवर कोथिंबीर वाटून लावल्यास बरे वाटते. 4) तोंड आले असेल तर कोथिंबीर रसाने गुळण्या करतात. 5) धण्याची साले काढून दुधातील खीर बनवून घेतली तर स्मरणशक्ती वाढण्यास, चक्कर कमी होण्यास उपयोगी पडते. 6) हृदयाला व डोळ्याला कोथिंबीर आरोग्य टिकवण्यास मदत होते. 7) कॅराटिन व विटॅमिन सी या आवश्यक घटकांमुळे धणे शरीर-मनासाठी खूप आवश्यक आहे.
केशर : 1) स्त्रियांसाठी केशर हे वरदान आहे. 2) केशरमध्ये क्रोसिन, जेनटीओबायोस या कॅरीटोनॉइडसमुळे अँटिऑक्सीड गुणधर्म आढळतात, जे विशेषतः आतड्याच्या कॅन्सरविरोधी काम करतात. 3)स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित होण्यास व गर्भधारणा होण्यासाठी केशराचा उपयोग होतो. 4) कुंकुमादि तेल – या केसरापासून बनवलेल्या तेलामुळे कांती सुधारायला मदत होते. 5) केशरच्या 8-10 कांड्या पाण्यात रात्रभर भिजवून ठेवून गुळाबरोबर आठवडा दिले जाते. लहान मुलांमध्ये गोवर बाहेर पडल्यानंतर याचा उपयोग होतो.
बडिशेप : 1) पीसीओडी किंवा मुलींच्या पाळीच्या तक्रारींमध्ये बडिशेप सकाळी चावून खाल्ली असता उपयोग होतो, असा अहवाल संशोधनातून पुढे येत आहे. 2) डोळ्यांची व बुद्धीची ताकद वाढवण्यासाठी बडिशेप ज्येष्ठमध ओव्यासह घेतलेली चांगली. 3) लघवीची जळजळ कमी करायला बडिशेपचा काढा उपयोगी पडतो. 4) बडिशेप भाजून केलेली पावडर गरम पाण्यासह घेतली असता बाहेरचे खाद्यपदार्थ पचले नसतील, मुरडा आला तर उपयोगी पडते.
मोहरी : फोडणीमध्ये हजेरी लावणारी मोहरी भूक लागायला व पचन होण्यासाठी उपयोगी असते. तज्ज्ञांच्या सल्ल्याने मोहरीचा बाह्य लेपही फायदेशीर होतो. मुख्यतः अन्नपदार्थांतलेच औषधी गुण शोधले तर औषधांचा वापर कमी होऊ शकतो, ही भारतीय आरोग्य संस्कृती आपण जाणून घेतली पाहिजे.
औषधाला अन्न बनवता की
अन्नाचेच औषधी गुण जाणता
गुपित दडलंय स्वयंपाकघरात
शोधून आपले आपण पाहता
आरोग्याची सताड दारे
आनंदाचे चांदणे पसरता
हृदयाचे गूज ऐकता
समाजक्रांतीचे बीज पेरता!