दिनमान प्रतिनिधी
उरण|
तालुक्यातील चिरनेर गावात भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीत शिरलेल्या दहा फूट अजगराने जिवंत मांजर गिळली. या अजगराला सर्पमित्रांनी जंगलात सोडून जीवदान दिले.
मंगळवारी चिरनेर येथील किशोर पाटील या नागरिकाच्या अंगणात तब्बल दहा फूट लांबीचा अजगर आढळून आला. यामुळे फ्रेंड्स ऑफ नेचर या सर्पमित्र संघटनेला ताबडतोब पाचारण करण्यात आले. या वेळी जयवंत ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन दहा फूट लांबीचा अजगराला पकडले. मात्र या सापाने अंगणातील मांजरीच्या पिल्लाचे भक्ष्य केल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
या सापाची सुखरूप सुटका करण्यात आली. या दहा फूट लांबीचा अजगर सापाचे वजन हे सुमारे २० किलो असून, त्याला गावाजवळ असलेल्या जंगलात सोडण्यात आले. मागील सुमारे आठवडाभरात फ्रेंड्स ऑफ नेचर संघटनेमार्फत विषारी नाग, मण्यार अशा सुमारे २३ विविध सापांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. यामध्ये दुर्मीळ असलेला फॉस्टन कॅट स्नेक (मांजर्या) सापाचाही समावेश असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.