डॉ. भास्कर धाटावकर |
अमेरिकेचे शेजारी कॅनडा, मेक्सिको देश असून सागरी सीमा कॅनडा, बहामास आणि रशियाला लागून आहेत. अमेरिकेन राज्यसंस्था फेडरेशन स्वरूपाची असून, एकूण पन्नास राज्यांचा समावेश आहे.वॉश्गिटन डीसी ही राजधानी आहे. व्हाइट हाऊस हे अमेरिकेन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय प्रशासकीय रचनेत ससंद, अध्यक्ष व न्याय ह्या तीन शाखा सत्तेचा समतोल राखीत असतात. अध्यक्ष पदाची मुदत चार वर्षे असून फक्त दोन टर्म अध्यक्ष पदी राहता येते. जगभरातील लोक या बलशाली देशात आपले नशीब आजमवण्यासाठी येत असतात.विस्तृत भूमी, सागरागत प्रचंड गोड्या पाण्याच्या नद्या, सरोवरे, सुपीक भूमी यामुळेच अमेरिकेतील वैभवाची चढती कमान आपणांस नेहमीच दिसून येते.
या अमेरिकेन जनतेची काही रोचक आणि गमतीशीर तथ्ये आपणाबरोबर शेअर करीत आहे. अमेरिकेत वाबाश आणि इंडियानामध्ये प्रथम विजेचा वापर करण्यात आला. अमेरिकेन लोकांचे श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेत 5 करोड 26 लाख कुत्रे आहेत. येथे दरसेकंदाला एक घर आगीचे भक्ष ठरते. अमेरिकेन लोक कागदाचा वापर सर्वाधिक म्हणजे 8 करोड 50 लाख टन कागद दरवर्षी स्वच्छतागृहापासून किचनमध्ये सर्वत्रच वापरत असतात. 1950 नंतरच्या सर्वेक्षणानुसार 40% बालकांचा जन्म अविवाहित मात्यापित्यापासून होतो, ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे.
न्यूयॉर्क सर्वात लोकसंख्येचे शहर तर दुसर्या क्रमांकावर लॉस एंजेल्स आणि तिसर्या स्थानावर शिकागोचा नंबर लागतो. अटलांटा हे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय व्यस्त विमानतळ असून, दर सेकंदाला येथून आकाशात विमान झेप घेत असते. आज भारतीयांचा अमेरिकेत टक्का चांगलाच आहे.आपल्या भारतीयांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्वच क्षेत्रांत मानाची आणि अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. मात्र 1924 पर्यंत भारतीयांना नागरिकत्व घेण्याचा अधिकार मिळत नव्हता. आणि अद्यापही अमेरिकेत महिला राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोचलेली नाही.
अमेरिकेतील संविधान पायाभूत कायदा यात अमेरिकेतील केंद्रातील सरकारची रचना, कामकाज व अधिकाराची व्याख्या करण्यात आली आहे. 4 जुलै 1776 रोजी ब्रिटिश जोखडातून स्वतःची सुटका करून आपले स्वातंत्र्य घोषित केले. सप्टेंबर 17 इ. स. 1787 मध्ये फिलाडेल्फि या येथे भरलेल्या संविधान अधिवेशनात तेरा राज्यांनी एकत्रित येऊन नागरिकांच्या वतीने तयार केलेले संविधान स्वीकारण्यात आले. हे संविधान अंमलात आल्यावर त्यात सत्तावीस वेळा बदल करण्यात आले. यापैकी दहा बदलांना अमेरिकन नागरिकांचा हक्कनामा असे संबोधतात.
सुप्रसिद्ध विचारवंत थॉमस पेनने दिलेल्या रूपरेषाचा आधार घेऊन हे संविधान तयार करण्यात आले आहे.
लोकांचे लोकांकरिता लोकांनी चालविलेले राज्य असे सुटसुटीत स्वरूप ठेवण्यात आले.
अध्यक्षीय पद्धतीचा स्वीकार करण्यात येऊन राष्ट्राध्यक्ष हे प्रमुख असतील. राष्ट्रीय प्रशासकीय रचनेत संसद, अध्यक्ष व न्याय ह्या तीन शाखा सत्तेचा समतोल राखतात.अध्यक्षाची निवडणूक दर चार वर्षांनी होते आणि फक्त दोनच टर्म निवडणूक लढविता येते. 50 राज्यांतील जनता अध्यक्ष निवडतात.
अमेरिकेतील संविधानाचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्वसामान्य जनतेचे हित समोर ठेवून ईश्वर, दैवी आशीर्वाद, धर्म, धर्मगुरू, राजा यांना टाळण्यात येऊन थॉमस पेनच्या विचारधारेचा आधार घेऊन हे संविधान तयार करण्यात आले आहे. कायदे बनविण्याचा अधिकार सार्वभौम असलेल्या काँग्रेसकडे असून त्यांच्या मान्यतेनुसार ते अध्यक्षांकडे स्वाक्षरीसाठी जाते. लोकप्रतिनिधी सदस्य दर दोन वर्षांनी वेगवेगळ्या राज्यांतून निवडले जातात.
सिनेट सदस्यांना त्यांच्या कामासाठी मानधन दिले जाते. काँग्रेसकडे नवा कर, कर्ज उभारणे, अंतर्गत शांतता राखणे त्यासाठी वेळ पडली तर लष्कराला पाचारण करणे असे महत्त्वाचे अधिकार आहेत. अशा प्रकारे अमेरिकेचा राज्यशकट अनेक काळ चालू आहे. अमेरिकेची ही अध्यक्षीय लोकशाही पद्धत जगासाठी आदर्शवत ठरू शकते. इथल्या सर्व राज्यांना समान अधिकार आणि स्वतःचे निर्णय घेण्याची पूर्णपणे मोकळीक आहे. अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अशी अनेक राज्ये आहेत, जी निर्णायक ठरलेली आहेत. त्यामुळे या राज्यांच्या मतदानाचा ठसा अध्यक्ष पदावर कायम उठतो.
क्रमशः
(लेखक हे महाराष्ट्र शासनामधील निवृत्त पुराभिलेख संचालक आहेत.)