दिनमान प्रतिनिधी
बदलापूर|
गेल्या काही वर्षांपासून ठप्प असलेल्या भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाच्या प्रक्रियेमुळे बदलापुरात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. निर्बीजीकरणाच्या प्रक्रियेसाठी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने निविदा जाहीर केली. मात्र प्रतिसादाअभावी या निविदेला मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे निर्बीजीकरणाची प्रक्रिया सुरू होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची लोकसंख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच शहरात भटक्या श्वानांची पैदासही वाढली. गृहसंकुलांच्या कचराकुंड्या, उघड्यावर बाजारपेठा, दुकाने आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांबाहेर टाकले जाणारे अन्नपदार्थ यावर भटक्या श्वानांची गुजराण होते. गेल्या काही वर्षांत या दोन्ही शहरांमध्ये निर्बीजीकरणाची प्रक्रिया ठप्प होती. अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात काही महिन्यांपूर्वी या प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र प्रभावीपणे त्याची अजूनही अंमलबजावणी होत नसल्याने भटक्या श्वानांची संख्या वाढतीच आहे.
दुसरीकडे बदलापूर शहरात कुळगाव बदलापूर नगरपालिकेला भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याचे समोर आले आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेने भटके श्वान आणि मांजरींचे निर्बीजीकरण करणे, त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देणे यासाठी निविदा जाहीर केल्या होत्या. या निविदांची मुदत २१ सप्टेंबर रोजी संपली. मात्र एकाही कंत्राटदाराने या निविदेला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिकेवर या निविदेला मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे.