दिनमान विशेष प्रतिनिधी
शहापूर ।
ठाणे जिल्हा परिषदेच्या शहापूर पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत असलेल्या 457 प्राथमिक शाळांपैकी 108 प्राथमिक शाळांत 20 पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असल्याचे वास्तव उजेडात आले आहे.
शहापूरच्या गावपाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी गळती लागली असून, केवळ दोनच विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा शिक्षण विभागाला सुरू ठेवाव्या लागल्या आहेत.
यातील काही शाळांमध्ये विद्यार्थी नसल्याने विद्यार्थ्यांअभावी वर्ग बंद करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढवली आहे. शहापूर तालुक्यातील 110 ग्रामपंचायतींंच्या गावपाड्यांतर्गत जिल्हा परिषदेच्या एकूण 457 शाळा कार्यान्वित आहेत. यामध्ये पहिली ते पाचवी 17 हजार 751 आणि सहावी ते आठवीच्या इयत्तेत 4 हजार 116 असे एकूण 21 हजार 867 विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 1 हजार 179 शिक्षकांची नियुक्ती शाळांवर केली आहे. यातील पहिली ते पाचवी इयत्तेतील 108 शाळांत 20 पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या आहे. ही विद्यार्थी पटसंख्या पाहता विद्यार्थ्यांअभावी ग्रामीण भागातील गरिबांसाठी शिक्षणाचा एकमेव स्रोत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. विद्यार्थ्यांची वाढती गळती सुरू असताना केवळ दोन विद्यार्थ्यांवर शाळा सुरू ठेवण्याची वेळ ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर आली आहे.
शहापूर तालुक्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या म्हणजेच निव्वळ दोन विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आहेत. तर पहिली ते पाचवीच्या शाळेतील काही वर्गांत विद्यार्थी पटसंख्या नसल्याने ते वर्ग बंद पडले आहेत. या शाळांत विद्यार्थी नसल्याने शालेय इमारती ओस पडल्या आहेत.
एकीकडे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण घेता यावे या उद्देशाने राज्य सरकार शिक्षणासाठी करोडो रुपये खर्च करीत आहे. ग्रामीण भागातील लोकांनी आता मोठ्या प्रमाणावर रोजगार व नोकरीनिमित्ताने शहराकडे स्थलांतर केले. गावखेड्यांतील पालकांनी शिक्षणासाठी आपल्या पाल्याला शहरातील इंग्रजी माध्यमात धाडल्याने ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांना गळती लागली आहे.
जिल्हा परिषद आणि प्राथमिक शाळांसाठी पुरवला जाणारा शासनाचा पोषण आहार वह्या आणि पुस्तक, इमारत, किचन शेड खर्च शिक्षकांच्या पगारासाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च सरकारच्या तिजोरीला भाररूपात पडत आहे.
विद्यार्थी पटसंख्या जरी कमी होत असली तरी शासनाच्या धोरणानुसार कोणत्याही शाळा पटसंख्याअभावी बंद करता येणार नाहीत.
– भाऊसाहेब चव्हाण, गट शिक्षण अधिकारी, शहापूर
शाळा – पटसंख्या
चोंढे प्रकल्प 2
मांजरे पाडा 2
भिनार 2
भिंगुर्ले 3
दहिवली 5
उंबरखांड 6
पोंडेपाडा 6
भोईरपाडा 7
चांदरीचा पाडा 7
तुकाराम वाडी 7
उमवणे पाडा 7
सावरवाडी 8
दांड 8
मांजरे 9
फणसपाडा 9
चिखली 9
बावघर 9
आलगेवाडी 10
खर्डी दळखण 10
तोरणपाडा 10
साकुर्ली 10
पारेला 10