दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक ज्या भागातून निवडून येतात त्या कळवा व मुंब्रा परिसरात विकासासाठी शिवसेनेने मिशन हाती घेतले आहे. आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 55 कोटी रुपयांचा विशेष निधी आणून ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर येथे निधीची पेरणी सुरू केली आहे. हा निधी मिळाल्याने राष्ट्रवादी, एमआयएमच्या नगरसेवकांनी खासदार शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानल्याने राजकीय वर्तुळात फक्त शिवसेनेचे मिशन कळवा-मुंब्रा याचीच पुन्हा एकवार चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे कळवा-मुंब्रा परिसराचे प्रतिनिधीत्व करतात. या भागातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक ठाणे महापालिकेत निवडून जातात. हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघात कळवा-मुंब्रा परिसर येतो. राज्यात सत्ताबदलानंतर ठाण्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे.
राज्यातील सत्ताबदलानंतर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी कळवा-मुंब्रा भागावर लक्ष केंद्रीत करून तेथील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना गळा लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कळव्यातील नगरसेवक जितेंद्र पाटील यांच्या इतर पदाधिकार्यांना पक्ष प्रवेश देऊन त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना धक्का दिला होता. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजन किणे यांच्या नेतृत्वाखाली मुंब्य्रातील काही नगरसेवक बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सूरू आहे. असे असतानाच, कळवा आणि मुंब्रा परिसराच्या विकासासाठी खासदार शिंदे यांनी 55 कोटींचा विशेष निधी आणला. हा निधी मिळवून दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजन किणे, अनिता किणे, मोरेश्वर किणे, साजिया अन्सारी यांचे दिर राजू अन्सारी, एमआयएमचे माजी नगरसेवक आजमी शाह आलम शाहिद यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत.
कळवा व मुंब्रा परिसराच्या विकासासाठी 55 कोटींचा विशेष निधी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंजुर करून घेतला आहे. यामुळे तेथील नगरसेवकांनी पक्षीय बंध झुगारून खासदार शिंदे यांचे आभार मानत सत्कार केला.
– नरेश म्हस्के, राज्य समन्वयक, शिवसेना
विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदार संघात हा निधी दिला जात आहे. पण, त्यातून नागरिकांची कामे होणार असतील तर ही चांगली बाब आहे.
– आनंद परांजपे, ठाणे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस