लहान बहीण पायल हीसुद्धा नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस द्वितीय वर्षाला शिकत आहे. त्या ज्या गावात राहतात ते अजूनही मागासलेले आहे.
घनदाट जंगलाशिवाय दुसरं जग माहीत नसलेल्या अतिमागास माडिया आदिवासी समाजाची कोमल मडावी ही पहिली डॉक्टर. महाराष्ट्राच्या नकाशात भिंग लावून पाहिले तरी जे गाव सापडणार नाही अशा अतिदुर्गम भागात राहणार्या कोमलचा डॉक्टर बनण्याचा संघर्षमय प्रवास हा निश्चितच प्रेरणा देणार आहे.
झिंगानूर महाराष्ट्राच्या नकाशात भिंग लावून पाहिले तरी हे गाव सापडणार नाही, इतकं अतिदुर्गम भागात गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलात लपलेलं हे एक छोटंसं गाव. दहा-दहा दिवस विजेचा पत्ता नाही, येण्या-जाण्यासाठी वाहतुकीची सोय नाही आणि त्या गावातील एका छोट्याशा झोपडीत राहणार्या एका कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तर एकदमच बेताची. अशाही परिस्थितीत तिने शिकण्याची जिद्द कायम ठेवली. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिले, उरात स्वप्नपूर्तीचा ध्यास ठेवला, कठोर परिश्रम केले आणि त्याचे फळ अर्थातच तिला मिळाले.
मनात जिद्द असेल तर आपोआप परिस्थितीवर मात करता येते, हे दुर्गम भागातील माडिया जमातीच्या कोमलने दाखवून दिले. गडचिरोलीपासून जवळपास 300 किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम अशा झिंगानूर गावातील कोमलने मडावीने गेल्याच वर्षी एमबीबीएसची (चइइड) परीक्षा उत्तीर्ण केली आणि ती माडिया समाजातील पहिली एमबीबीएस महिला डॉक्टर बनली आहे. ध्येयाने पछाडलेल्या कोमलची जिद्द निश्चितच समाजाला प्रेरणा देणारी आहे. यापूर्वी माडिया समाजामध्ये डॉ. कन्ना मडावी यांनी पहिला पुरुष डॉक्टर होण्याचा मान मिळवला होता.
संपूर्ण राज्यात गडचिरोली जिल्हा मागासलेला समजला जातो. पण इथे बौद्धिक क्षेत्रात शिखर गाठणारे आणि क्रीडा क्षेत्रात आपला नावलौकिक मिळविणारे कमी नाहीत. जिथे वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांचा अभाव आहे, अशा भागात जन्म घेतलेल्या डॉ. कोमल श्यामला कासा मडावी हिने या घनदाट रानात आरोग्यसुविधेअभावी अनेक यातना सहन करणारे नागरिक बालपणापासूनच पाहिले. म्हणून तिने डॉक्टर होऊन या लोकांची सेवा करण्याचा निर्धार केला. कोमलचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण झिंगानूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी सिरोंचा येथील धर्मराव विद्यालयात प्रवेश केला. अनेक अडचणींचा सामना करीत उत्तम गुणांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिची एमबीबीएससाठी यवतमाळ जिल्ह्यातील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाली.
या महाविद्यालयातून तिने एमबीबीएसची अंतिम वर्षाची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करीत डॉक्टर पदवी प्राप्त केली. मनात जिद्द असली तर काहीही शक्य होऊ शकते, हे कोमलने दाखवून दिले. तिने आपल्या यशाचे श्रेय तिचे आईबाबा तसेच शिक्षणात मदत व मार्गदर्शन करणारे झिंगानूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, सिरोंचातील धर्मराव विद्यालयाचे शिक्षक, वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक व वर्गमित्र, मैत्रिणींना दिले आहे. आपल्याला एम. एस. (र्डीीसशेप) व्हायचे असून, त्यानंतर गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात आपल्या आदिवासी बांधवांची सेवा करायची आहे, अशी इच्छा डॉ. कोमल मडावी व्यक्त करते.
कोमलला शाळेत असताना फक्त माडिया भाषा बोलता येत होती. त्यामुळे तिच्या शिक्षणाची सुरुवात भाषेच्या अडचणीने झाली. मात्र, तिने परिस्थितीचा बाऊ करणं टाळत भाषेच्या अडचणीवरही मात केली. तिच्या शिक्षकांनी तिला यात मदत केली. कोमल आपल्या यशाचं श्रेय आईवडील आणि प्रत्येक टप्यावर मार्गदर्शन करणारे शिक्षक, प्राध्यापक आणि मित्र-मैत्रिणींना देते.
मुलींनी आईवडिलांच्या कष्टाचं सोनं केलं
कोमलची आई आरोग्यसेविका, तर वडील शेती करतात. आई आरोग्य विभागात कार्यरत असल्यामुळे आपल्या मुलींनी डॉक्टर बनावे, अशी कोमलची आई श्यामला यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेला साथ मिळाली ती कोमलच्या वडिलांची. कोमलच्या वडिलांनी तानी (ढररपळ) चित्रपट पाहिल्यामुळे आपल्या मुलींनी शिकून काही तरी बनावे, असे त्यांना वाटत होते. एका रिक्षावाल्याची मुलगी कलेक्टर बनू शकते, तुम्ही चांगल्या पदावर का जाऊ शकत नाही? ही प्रेरणा त्यांनी आपल्या मुलींना दिली. शिक्षणाकडे पाहण्याचा त्यांचा हा विशाल दृष्टिकोन मुलींना प्रेरणादायी ठरला. त्यांनी आनंदाने आपल्या मुलींसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव केली. कोमलचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तिला नागपूरला पाठवले. नागपुरातील कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालय येथे 11 वी, 12 वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एमबीबीएसची प्रवेश परीक्षा दिली. त्यामध्ये कोमल चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. तिला वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे प्रवेश मिळाला. आता तिने 61 टक्के मार्क्स घेत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे आणि माडिया समाजातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. आता मुलीने पोस्ट ग्रॅज्युएशन करावे, अशी इच्छा तिच्या आईने बोलून दाखवली.
कोमलची लहान बहीण पायल हीसुद्धा नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस द्वितीय वर्षाला शिकत आहे. या दोन्ही बहिणी ज्या गावात राहतात ते गाव अजूनही मागासलेले आहे. दिवसातून एकदाच गावात बस जाते. पावसाळ्यात बससेवाही बंद असते. दहा-दहा दिवस विद्युत सेवा खंडित होते. तरीही दोघींनीही जिद्दीने शिक्षण घेतले. गडचिरोली जिल्हा मागासलेला, त्यात माडिया समाज अतिशय पिछाडीवर आहे. अशा समाजातून कोमल पहिली महिला डॉक्टर होणे हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. तसेच आईवडिलांचा आंतरजातीय विवाह आणि आता दोन्ही मुलींचे डॉक्टर होणे झिंगानूर गावाला वैचारिकरीत्या विकसित सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठरते.
(‘बाईमाणूस’वरून साभार)