त्यांचं जगणं काहीसं कष्टप्रद असलं तरी ही आदिवासी जमात प्रचंड सोशिक आणि मेहनतीत समाधान मानून राहणारी आहे. अनुभवी मुकादम आपल्या तालमीत नव्या पोरांना तयार करतात. उन्हाचा प्रहर चुकावा म्हणून भल्या पहाटे उठून कामाला जुंपणारी मंडळी सकाळी साडेदहा-अकरा वाजेपर्यंत कामं संपवून पालावर आराम करीत पहुडलेली दिसतात, ती थेट संध्याकाळी उन्ह ओसरल्यावर पुन्हा जेवूनखावून शेतावर येतात. मिठाच्या लादीवर चालून सरावलेले पाय बाहेर कच्च्या किंवा डांबरी रस्त्यांवर मात्र काहीसे चुरचुरतात. कायम पांढर्या लादीवर काम करून डोळ्यांतदेखील कचकच जाणवते. या शेतमजुरांना ग्लोव्ह्ज, गमबुट्स, सनग्लासेस यांसारखे अगदी प्राथमिक स्वरूपाचे सेफ्टी गिसर्सदेखील पुरवले जात नसल्याने हेल्थ इन्श्युरन्स, मेडिक्लेम वगैरे फार लांबच्या गोष्टी आहेत. त्यातल्या त्यात सातपाटी भागातल्या सोसायटीच्या शेतमजुरांना काही प्रमाणात या सोयी उपलब्ध होतात. तरीसुद्धा दर वर्षी न चुकता, कुठल्याही प्रकारचा आगाऊ संपर्क न साधता बरोबर पावसाळा संपल्यावर आपापल्या मुकादमासोबत हे मजूर आगरात हजर असतात. आयुष्यभर मिठावर काम करून घरगाडा हाकणारे, पोरांना हट्टाने ‘कॉलिजात’ शिकवणारे कित्येक पिकलेले म्हातारे आजही मोठ्या अभिमानाने मिठाची पोती डोईवर वाहतायत. काटक शरीरयष्टीच्या, उन्हाने काळवंडलेल्या, गालफडं बसलेल्या त्यांच्या चेहर्यांवर मला मेहनतीचं समाधान आणि रापलेल्या तांबूस डोळ्यांत आपल्या कामावर असलेली नितांत श्रद्धा दिसून येते! या सहा महिन्यांत मी तिन्ही त्रिकाळ आगरात पडलेला असे. इथे नांदणारी संस्कृतीच नव्हे तर इतिहासही मला खुणावत असे. तसं पाहिलं तर मीठशेती ही उत्तर कोकणातला एक पारंपरिक व्यवसाय आहे. इथल्या आगरातली संपन्नता पाहूनच पोर्तुगिजांनी ह्या भागात आपलं बस्तान बसवलं. इतकंच नव्हे तर इंग्रजांनी लादलेला मिठावरील कर रद्द करण्यासाठी गांधीजींनी दांडी यात्रेस प्रारंभ केला, हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असावं. त्यामुळे बहुतेक आगरांना स्वतंत्र असा भौगोलिक व सोबतच ऐतिहासिक वारसा लाभला आहे. वसई पूर्वेस रेल्वे स्टेशनहून जवळच असलेल्या या मिठागरात राजावली नावाचं गाव वसलंय आणि इथे दडल्यायत काही ऐतिहासिक वास्तू. बहुतांश आगरी वस्ती असलेल्या या भागात अनेक वर्षांपासून मीठशेती केली जातेय. या मिठागरात एक ब्रिटिशकालीन धुरांडी/चिमणी आढळते. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत इथे एक फार जुना लाकडी पूलही होता, जो दुर्दैवाने आज अस्तित्वात नाही (तरी वसईचे इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांच्या जुन्या लेखांतून त्याचे उल्लेख सापडतात). अगदी पोर्तुगीजकाळातही राजावली, गोखिवरे या गावांची इतिहासात नोंद आढळते. दुर्दैवाने भौगोलिक बदलांमुळे व वाढत्या शहरीकरणामुळे या गावातल्या ऐतिहासिक पाऊलखुणा पुसट होत चालल्यायत.. वसई पश्चिमेस नायगावकडे जाताना उमेळ्यालगत काही मिठागरं लागतात. ही मिठागरं सोडल्यावर बामणदेव मंदिराच्या आवारात काही जुने वाडासदृश पडीक अवशेष दिसून येतात. स्थानिकांकडे चौकशी केल्यास ब्रिटिशांच्या वसाहतीकरिता तसंच मिठागरातील मीठ साठवण्यासाठी त्यांचा उपयोग केला जात असे, अशी मोघम माहिती मिळते. आत गेल्यास भिंतीवरील 1889 साल कोरलेली पांढरी दगडी पाटी ठळकपणे दिसते. लाकडी वासे, भक्कम दगडी बांधकाम, लोखंडी गज असलेल्या खिडक्या व लाकडी झरोके असलेले दरवाजे लक्ष वेधून घेतात. या वास्तूला चोहो बाजूंनी झाडाझुडपांनी वेढा घातला असून सभोवताली रान माजलंय तरीसुद्धा पडीक व नामशेष होणारे अवशेष पाहून ब्रिटिशकाळात ही वास्तू किती देखणी असेल याचा अंदाज येतो. याच आगरात बसून दिव्याहून वसईच्या दिशेने येणारी शटल न्याहाळत, शनिकुमार शेलारांची जुनी आगरी लोकगीतं आळवत मी तासन्तास बसून राहायचो.
वसय गाडी, बोलते हिरवी साडी..
गाडी चाललेय गो, येगामंदी.. गाडी चाललेय गो, येगामंदी! कामण गावचे स्टेशनवरी..
आदिवाशांची वस्ती भारी.. आदिवाशांची वस्ती भारी.. ज्यूचंदरच्या बोलते बाजूला..
मीठआगर येती आमचे भेटीला.. मीठआगर येती आमचे भेटीला.. वसय गाडी, बोलते महिमा भारी..
दिवा ठेसन झालंय जंक्शन भारी.. दिवा ठेसन झालंय जंक्शन भारी.. दिवा, ठाकुर्ली, भिवंडी, वडू नवघर, पायेगाव वगैरे गावांतील तत्कालीन लोकजीवनाचा वेध घेत गाडी वसई ठेसनात येईस्तोवर संध्याकाळ होत असे आणि मी घरच्या वाटेला लागत असे!
परतीच्या कातरवेळी मात्र मन उदास असे. कारण दिवसभर अनुभवलेलं हे वैभव, निसर्गाचं देणं भविष्यात फार काही काळ टिकणार नसल्याची जाणीव होत असे. आगरातल्या व लगतच्या मोकळ्या जमिनींवर होऊ घातलेल्या भव्य टाऊनशिप्स, त्याकरिता केलेलं फेन्सिंग, भूगर्भाच्या तळापर्यंत जाऊन पायाभरणीसाठी दिवसरात्र खोदकाम करणार्या अवाढव्य मशिनरी, सिमेंट बनवण्यासाठी चोवीस तास गरगरणार्या मोठाल्या गिरण्या, रेती/विटा वाहून आणणारे धुरळा उडवणारे डंपर्स आणि या सर्वांची परिणती म्हणून आगरात निर्माण झालेला प्रचंड कोलाहल. हा कोलाहल इथली जैवसृष्टी हळूहळू नष्ट करणार.
क्रमश:- अतुल काटदरे, मु. पो. राजावली, वसई