दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
गोवरचा उद्रेक वाढत असून, आतापर्यंत या संसर्गामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात 12 बालकांना जीव गमवावा लागला. मृत्यूंचे निश्चित निदान झालेल्या बालकांची संख्या आठ असून, एक संशयित मृत्यू आहे. तर तीन मृत्यू हे मुंबईबाहेरील आहेत. दरम्यान, ठाणे शहरात पाच रुग्णांना गोवरची बाधा झाल्याचे समोर आले.
भिवंडी येथील आठ महिन्यांचा बाळाचा बुधवारी मृत्यू झाला. या बाळाला 18 नोव्हेंबर रोजी ताप येत होता. त्याच्यामध्ये गोवराची लक्षणे दिसत होती. त्याला लसीचा एक डोस देण्यात आला होता. 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून 57 मिनिटांनी त्याला पालिका रुग्णालयात दाखल करून श्वसनाचा त्रास होत असल्याने उपचार सुरू करण्यात आले. 22 नोव्हेंबर रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ठाणे शहरात गोवरसदृश लक्षणे असलेल्या 44 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी 12 जणांचा अहवाल महापालिकेला मिळाला आहे. यामध्ये पाच रुग्णांना गोवर बाधा झाल्याचे समोर आले.
नवी मुंबईत गोवर संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागामार्फत नागरी आरोग्य केंद्रनिहाय विशेष सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. महापालिकेतर्फे केलेल्या लसीकरण सत्रात गोवरसंबंधित बालकांचे आतापर्यंत 106 % लसीकरण झाले आहे.
नवी मुंबई मध्ये आतापर्यंत गोवरचे 24 रुग्ण आढळून आले आहेत. शहरामध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू असून, शहराला गोवरचा धोका नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात 3 रुग्ण आढळून आले असून, 15 संशयित आढळून आले आहेत. मुंबईसह ठाण्यात तसेच इतर शहरांमधील गोवरबाधित मुलांची संख्या वाढत असून, नवी मुंबई शहरात हे प्रमाण कमी आहे. आतापर्यंत शहरात 24 रुग्ण आढळले आहेत.