दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती दलाकडून शांततेत आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र हे आंदोलन कसे पेटेल, या आंदोलनात दंगे कसे होतील, याचे नियोजन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यामध्ये ठाकरे गटाच्या पक्षाचेही काही नेते सामील होते, असा खळबळजनक आरोप शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.
आंदोलनाच्या आदल्या दिवशीच्या रात्री नागरिकांची डोकी फिरवण्याचे काम हे लोक करीत होते, असा आरोप म्हस्के यांनी केला आहे. म्हस्के यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना पळपुटे म्हणणार्या संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्यासाठी शरद पवार यांची सुपारी घेतल्याचा आरोपही म्हस्के यांनी केला.
शिवसेनेकडून गणेशोत्सवाकरिता कोकणवासीयांसाठी मोफत बससेवेची व्यवस्था करण्यात आली असून, त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी म्हस्के यांनी खा. संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांना टार्गेट केले. राऊत यांच्या टीकेवर नरेश म्हस्के यांनी पलटवार केला. शिवसेनेची वाट लावणारे अशी संजय राऊत यांची ओळख झाली असून, पक्ष संपवण्याची शरद पवार यांची सुपारीच राऊत यांनी घेतली असल्याचे म्हस्के म्हणाले. हेच संजय राऊत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर कोणत्या भाषेत टीका करीत होते हे आम्हाला बोलायला लावू नका, असा इशारादेखील म्हस्के यांनी दिला. आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्रीच सोडवू शकतात, हे जरांगे पाटील यांनी सांगितल्याने त्यामुळे विरोधकांची हवाच निघून गेली असल्याचा टोला म्हस्के यांनी लगावला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या शेतकरी संवाद उपक्रमावरही म्हस्के यांनी टीका केली. ज्या वेळी हे लोक सत्तेत होते त्या वेळी दुष्काळ पडला होता. मात्र त्या वेळीही आदित्य ठाकरे यांनी नाइट लाइफची मागणी केली होती. त्यामुळे आदित्य यांचा हा केवळ दिखावा असल्याची टीका म्हस्के यांनी केली.