दिनमान प्रतिनिधी
ठाणे ।
सुमारे 23 वर्षांनी होत असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन नागपूर येथील मानकापूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले होते. अत्यंत मानाच्या मानल्या जाणार्या या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील आठ अव्वल जिल्ह्यांचा टीम चॅम्पियनशिपसाठी सहभाग होता. तसेच वैयक्तिक स्पर्धांचा देखील सहभाग होता.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम खेळाडूंच्या अनेक लढती बॅडमिंटनप्रेमींना अनुभवास मिळाल्या. 35 पैकी एकूण 12 पदके आपल्या नावावर करीत गेली अनेक वर्षे ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षण घेणार्या खेळाडूंनी आपले वर्चस्व संपूर्ण राज्यात दाखवून दिले.
1 जानेवारी ते 6 जानेवारी 2023 या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टीम चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या पुरुष संघाने रौप्य पदकाची कमाई केली. नागपूरच्या बलाढ्य संघाचा पराभव करीत ठाणेकर खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारली परंतु अंतिम फेरीच्या चुरशीच्या लढतीत 2-2 अशी बरोबरी असताना एकेरीच्या सामन्यात ठाणे संघाला पुण्याकडून हार स्वीकारावी लागली. तसेच ठाण्याच्या महिला संघाने देखील दमदार खेळाचे प्रदर्शन केले.
उपांत्य फेरीपर्यंत सर्व सामन्यांमध्ये ठाणेकर महिलांनी प्रभुत्व राखले परंतु उपांत्य फेरीत पुण्याच्या संघाकडून अतिशय चुरशीच्या सामन्यात त्यांना हार पत्कारावी लागली व ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले. या संघाचे मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ प्रशिक्षक व छत्रपती पुरस्कार विजेते मयूर घाटणेकर यांनी उत्तम कामगिरी बजावली.
दुहेरीच्या तीनही गटांत ठाणेकरांनी पदक प्राप्त कामगिरी केली आहे. त्यापैकी दोन गटांत ठाणेकर बॅडमिंटनपटूंनी सुवर्णपदक पटकावल. पुन्हा एकदा ठाणेकर खेळाडूंनी दुहेरीतील आपले वर्चस्व सिद्ध केले. दुहेरी मिश गटात प्रतिक रानडे आणि महेक नायक या नवनिर्वाचित जोडीने सर्वांनाच आपल्या खेळीने आश्चर्यचकित करून सुवर्णपदक प्राप्त केले.
तर पुरुष दुहेरी गटात कूवाळे बंधूंनी पुन्हा एकदा बाजी मारली. गतवर्षी अनेक राज्यस्तरीय स्पर्धा विराज आणि वीप्लव कुवाळे यांनी जिंकल्या होत्या व या मानाच्या ऑलिंपिक स्पर्धेत दुहेरीचे अजिंक्यपद प्राप्त करून त्यांनी विजयी धुरा कायम ठेवली आहे. या गटात उपविजेते ठरले ठाणेकर कबीर कंझारकर आणि नुकताच ऑल इंडिया सिनियर रँकिंग स्पर्धेत सुर्णपदक मिळवणारा ठाणेकर खेळाडू दीप रांभिया या दुहेरी पुरुषांच्या गटात अंतिम सामन्यात या दोन्ही जोड्यांनी चुरशीची लढत दिली. यात दीप आणि कबीरला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तसेच महिला दुहेरीत गतवर्षात अनेक राज्यस्तरीय स्पर्धेत अव्वल ठरलेल्या अनघा करंदीकरने रौप्यपदकाची कमाई केली आहे.
सांघिक स्पर्धेत देखील उत्तम खेळाचे सादरीकरण करणार्या यश सूर्यवंशी याने वैयक्तिक गटात पुरुष एकेरीत दमदार खेळाचे सादरीकरण करून बलाढ्य खेळाडूंना नमवत ब्राँझ पदकाची कमाई केली. तसेच पहिल्यांदाच एकत्र खेळणार्या इशिता कोरगावकर व मानसी कारेकर यांनी देखील महिला दुहेरीत ब्राँझ पदक जिंकले. 35 पैकी 12 पदकांवर आपले नाव कोरून ठाणेकर खेळाडूंनी ठाणे जिल्ह्याचे तसेच ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे.
या दणदणीत विजयाबद्दल ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, अक्षय देवलकर व मयूर घाटणेकर तसेच क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आणि ठाणे बॅडमिंटन अॅकॅडमीच्या संपूर्ण टीमने त्यांचे अभिनंदन केले आहे.