दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया एफसीआय इंटर झोनल अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या सार्थक रोकडेने दिमाखदार कामगिरीने सर्वांनाच आपल्या खेळाची दखल घेण्यास भाग पाडले आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या या भव्य स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडूंनी वेगवेगळ्या टीम्समध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धा सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही गटांत खेळवण्यात आल्या. त्यात दोन्ही गटांमध्ये सार्थक रोकडेने चमकदार कामगिरी केली. या कामगिरीचे फळ म्हणून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वेस्ट झोनल टीममध्ये सार्थक रोकडेची निवड करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या स्तरावर निवड होण्याची ही सार्थकची पहिलीच वेळ आहे. त्यासाठी त्याचे कौतुकही होत आहे.
सार्थकने आपल्या संघासाठी उत्तम खेळाचे सादरीकरण करून त्यांनी उपांत्य फेरीत धडक मारली. पुरुष दुहेरीत संघाचे नेतृत्व करताना सार्थकने उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या लढतीत चुरशीची झुंज दिली, परंतु साऊथ झोनच्या संकल्प गुराला आणि अल्विस फ्रान्सिस यांच्याकडून त्यांना हार स्वीकारावी लागली.
ठाणे पालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण अकादमीचे ज्युनियर बॅडमिंटनपटूसुद्धा चमकदार कामगिरी करीत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या व गेली अनेक वर्षांपासून होणार्या मानाच्या मनोरा राज्यस्तरीय खुल्या स्पर्धेत ठाणेकर अंजना नायर हिने १३ वर्षांखालील वयोगटात रौप्य पदक पटकावले. लहानपणाासूनच ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमध्ये धडे गिरवणार्या अंजनाने गतवर्षी हीच स्पर्धा वेगळ्या वयोगटात जिंकली आणि आता रौप्य पदक प्राप्त करून तिने सातत्य कायम ठेवले आहे. अन्वेशा सिंग हिला उपांत्य फेरीत २२-२० असे नमवून अंजानाने अंतिम फेरीत धडक मारली. परंतु अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत तिला हार पत्करावी लागली.
या पदकासह शालेय स्पर्धांमधील उत्तम कामगिरीसाठी अंजनाचा श्री. रविशंकर विद्यामंदिर शाळेने ट्रेंडसेटर ऑफ दी इयर असा गौरव केला आहे.
या दोघांच्याही विजयाबद्दल ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, अक्षय देवलकर व मयूर घाटणेकर तसेच क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आणि अकॅडमीच्या टीमने त्यांचे अभिनंदन केले.
वैयक्तिक गटात सार्थकने पुन्हा एकदा उत्तम खेळाचे सादरीकरण करीत सर्वांना आपल्या खेळाची दखल घेण्यास भाग पाडले. त्याने उपांत्य फेरीत धडक मारीत दुसर्या मानांकित जोडीला म्हणजेच कौशिक पाल व दप्तीमन चौधरी यांना २१-१५, २१-१७ असे सहज हरवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. परंतु अंतिम सामन्यात त्यांना अतिशय अटीतटीच्या सामन्यात मनीष रावत आणि मयंक बहल यांच्याकडून २१-१७, २१-१५, १९-२१ अशा सेटमध्ये हार पत्करावी लागली.