दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांचा वापर, विक्री व साठा रोखण्यासाठी जिल्ह्यातील बंद पडलेले कारखाने, गोदामे येथे तपासणी करावी. तसेच यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा व इलेट्रॉनिक उपकरणांचा वापर करावा. अंमली पदार्थांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा तयार करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे दिले.
नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समिती व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, उत्पादन शुल्क अधीक्षक नीलेश सांगडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, अन्न व औषध प्रशासनचे साहाय्यक आयुक्त राजेश चौधरी, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली राठोड, वस्तू व सेवाकर अधीक्षक अंबरीश शिंदे, टपाल कार्यालयाच्या साहाय्यक अधीक्षक अमिता कुमारी, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे आदी यावेळी उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक देशमाने यांनी जिल्हा पोलिस यंत्रणांमार्फत अंमली पदार्थांचा वापर, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. जिल्ह्यातील मुरबाड व शहापूर येथील औद्योगिक वसाहतींमध्ये तपासणी करण्यात आली आहे. तसेच बाहेर देशातून येणार्या टपालावर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच आता शाळा सुरू झाल्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचे श्री. देशमाने यांनी सांगितले.
उद्योग विभागाकडून जिल्ह्यातील बंद पडलेल्या, वापरात नसलेले कारखाने, गोदामे यांची माहिती घेऊन त्यासाठी सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.
अंमली पदार्थांमुळे तरुणांचे जीवन वाया जात असून त्यांच्या कुटुंबांवर सुद्धा त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अशा पदार्थांना रोखण्याची आपली जबाबदारी असून सर्व संबंधित विभागांनी सतर्क रहावे. अंमली पदार्थांच्या वाहतूक, विक्री व सेवनावर आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा. तसेच यासाठी विशेष यंत्रणा तयार करावी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कारखाने, गोदामे आहेत. अशा ठिकाणांचा वापर अंमली पदार्थांच्या निर्मितीसाठी होण्याची शयता असते. त्यामुळे अशी ठिकाणे शोधून कारवाई करण्यात यावी. संभाव्य जागांवर स्थानिक लक्ष ठेवावे.