दिनमान प्रतिनिधी
कल्याण|
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रेर घोटाळ्यानंतर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याचा दावा केला जात असला तरी दररोज वेगाने उभ्या राहत असलेल्या बांधकामांमुळे मूलभूत सुविधांवर ताण पडत आहे. या अनधिकृत बांधकामांवर आळा घालण्यासाठी या बांधकामांना २.५ पट कर आकारणी करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख आणि एमसीएचआयचे सदस्य रवी पाटील यांनी केली आहे.
शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी बाळासाहेबाची शिवसेना पक्षाला वेळ देण्याची मागणी पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. त्या वेळी आयुक्तांकडे कोणत्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे, याबाबतचे निवेदन त्यांनी दिले आहे. यात त्यांनी अनधिकृत बांधकामांबाबत आग्रही भूमिका मांडली आहे.
कल्याण डोंबिवली शहरात बीएसयूपी, स्वच्छता, अनधिकृत बांधकाम, बंद पथदिवे, सांडपाण्याने भरून वाहणारी गटारे, दुरवस्था झालेली उद्याने, रखडलेला रिंग रोड, डम्पिंगचा प्रश्न, शाळांची दुरवस्था, परिवहनचे सक्षमीकरण, स्मार्ट सिटीतून संथ गतीने सुरू असलेली कामे यासारख्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. पालिकेत प्रशासकराज असून, पालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे प्रशासक म्हणून कार्यभार हाकत आहेत. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर या विकासकामांकडे विशेष लक्ष दिले जाईल अशी अपेक्षा होती, मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. दैनंदिन समस्यांशी नागरिकांना झुंजावे लागत असून, प्रशासकाचा प्रशासनावर अंकुश नसल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिक उघडपणे करीत आहेत.
काय आहेत मागण्या?
- बीएसयुपीतील घरे पात्र लाभार्थ्यांना तसेच पुनर्वसनग्रस्तांना दिली जावी.
- फुटपाथ स्वच्छतेकडे लक्ष देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केली जावी,
- अनधिकृत बांधकामांवर २.५ पट कर आकारणी करावी,
- रिंग रोडच्या सद्यःस्थितीची माहिती नागरिकांना द्यावी,
- मुंबई-ठाण्याच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिका शहराचे सुशोभीकरण करावे,
- महापालिका शाळांच दर्जा वाढविण्यासाठी सीबीएससी, आयसीएसई बोर्ड सुरू करावे,
- परिवहन यंत्रणा सक्षम करावी,
- स्मार्ट सिटीच्या कामाचा वेग वाढवावा यासारख्या विषयांवर चर्चा करण्यासाठी रवी पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे वेळ मागितला आहे.