शंकर जाधव
डोंबिवली|
अक्षय्य थैली माझ्या हाती, प्लास्टिकपासून कायमची मुक्ती. जुनी होता, खराब होता टाकून नाही द्यायची, परत देऊन विनामूल्य नवीन थैली घ्यायची, असा संदेश तुम्हाला कल्याण-डोंबिवलीत मोफत मिळणार्या कापडी पिशव्यांवर वाचायला मिळाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण डोंबिवलीतील काही व्यावसायिकांनी एकत्र येऊन पर्यावरणस्नेही अक्षय्य थैली म्हणजेच कापडी पिशव्या मोफत वाटण्याचे ठरवले आहे.
पर्यावरणीय दृष्टीने प्लास्टिक पिशवी वापरणे अत्यंत धोकादायक आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार प्लास्टिक पिशवी वापरू नये, असे सांगण्यात आले. असे असले तरी अनेक दुकानदार, विक्रेते प्लास्टिक पिशव्या सर्रास ग्राहकांना देतात. अनेक नागरिक चक्क प्लास्टिक पिशवी मागून घेतात. या गोष्टींना आळा बसण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे वैद्य यांनी सांगितले. हा उपक्रम सहा महिने चालवणार असून या चळवळीत आणखी कोणी सहभागी झाले तर वर्षभरही हा उपक्रम राबवणार असल्याचे सांगताना घरातील प्लास्टिकचा कचरा कमी होईल अशी आशा आहे, असे ते म्हणाले.
रजनीगंधाचे विपुल वैद्य, प्रथमेश नॉव्हेल्टीचे अमोल पाटणकर आणि ऑर्गोवॅलीचे नितेश महाडिक हे सर्व व्यावसायिक एकत्र येऊन हा उपक्रम राबवत आहेत. असे उपक्रम आपण राबविले पाहिजे आणि समाजासाठी काही तरी करण्याची संधी शोधली पाहिजे, असे पाटणकर म्हणाले. तर महाडिक यांनी ही फक्त एक छोटी सुरुवात केली आहे. या उपक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, जेणेकरून ही चळवळ उभी राहील. यामुळे प्लास्टिकमध्ये अडकलेला पृथ्वीचा श्वास आपण मोकळा करू शकतो, अशी भावना व्यक्त केली.
आपल्याकडील पिशवी फाटली, जुनी झाली किंवा खराब झाली तर टाकून द्यायची नाही; ती पुन्हा या व्यावसायिकांना आणून द्यायची आणि त्याऐवजी ते दुसरी पिशवी तुम्हाला मोफत देतील, असे व्यावसायिक विपुल वैद्य यांनी सांगितले.