दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
प्रेमप्रकरणातून गर्भवती झालेल्या एका विद्यार्थिनीने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तांत्रिक यंत्रणांचा वापर करून आरोपीला अटक केली. सध्या या आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार ७ फेब्रुवारीला उघड झाला होता. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी मृत विद्यार्थिनी ही गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. या वेळी मुलीच्या मोबाइलच्या मदतीने पोलिसांनी सचिन जयस्वार या २० वर्षीय तरुणाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची त्याने कबुली दिली. प्रेमसंबंधातून आमच्यात शारीरिक संबंध झाले आणि त्यातून ती गर्भवती झाल्याचे सचिनने पोलिसांना सांगितले. सचिनने दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी सचिन जयस्वार याच्या विरुद्ध बलात्कारासह पोक्सो व आत्महत्येस प्रवृत्त करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक केली.
आरोपी सचिन आणि मृत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे आधीपासून प्रेमसंबंध होते. आरोपी सचिनने यापूर्वीही याच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणी चितळसर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्या प्रकरणातून जामिनावर सुटका झाल्यानंतर आरोपीने या विद्यार्थिनीला पुन्हा लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यात ती गर्भवती झाली. घरी याबाबत काय सांगायचे याच नैराश्यातून तिने आत्महत्या केली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.