दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना करियर निवडीसाठी ठाण्यात मार्गदर्शन केंद्र उभारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपाचे ठाणे शहर उपाध्यक्ष डॉ राजेश मढवी यांनी केले आहे. धनगर प्रतिष्ठान आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात ते बोलत होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ, ठाणे यांच्या वतीने दहावी, बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा ठाण्यातील जांभळी नाका येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी भाजपाचे ठाणे शहर उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी, माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी, समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब दगडे, दिलीप कवितके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला अध्यक्षा माधवी बारगीर आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजातील दहावी, बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ. राजेश मढवी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आकड्यांची लढाई न करता शिक्षण घेताना डोळ्यासमोर ध्येय ठेवणे गरजेचे आहे. असे झाले तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. यासाठी आई, वडील व गुरू याना कधीच विसरू नका. विद्यार्थ्यांना आपल्या समाजाचा इतिहास माहिती असणे गरजेचे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या थोर व्यक्ती या समाजाच्या होत्या. त्यांनी संपूर्ण देशात समाजहिताची कामे केली. त्यामुळे आजदेखील त्यांचे नाव गर्वाने घेतले जाते. त्यांचा आदर्श मुलांनी घेणे गरजेचे आहे.
दहावी, बारावीनंतर पूर्वीच्या काळी कमी संधी उपलब्ध होत्या, परंतु आता विविध क्षेत्रांत मुलांना संधी उपलब्ध आहेत. परंतु विद्यार्थ्यांना त्यांची माहितीच नसते. त्यासाठी ठाणे महापालिकेने दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना करियर निवडीसाठी ठाण्यात मार्गदर्शन केंद्र उभारावे, अशी मागणी केली.